बिहारचा पाब्लो : १३०० गाड्यांचा ताफा घेवून तो जेलमधून बाहेर पडला.

या डॉनची ओळख म्हणजे बिहारचा पाब्लो. म्हणजे बिहारी लोकांना पाब्लो एस्कोबार माहित असण्याचा संबध नसल्यानं तिथं त्याची अशी ओळख कोणी करुन दिली नाही. पण आम्ही त्याच्याबद्दल वाचल्यानंतर वाटलं अरे हा तर आपला पाब्लो. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल कुठे पाब्लो शेठ आणि कुठे हा, कुठे कोलंबिया आणि कुठे बिहार..? 

बिहारसारख्या राज्यात त्याला जेवढा स्कोप मिळाला, तेवढं कांड त्याने केलेच की.

दिनांक सप्टेंबर २०१६. 

एक व्यक्ती जामीनावर जेलमधून सुटला. सांगणाऱ्यांनी सांगितलं १३०० गाड्यांचा ताफा घेवून तो जामीनावर सुटला. गाड्या कमी जास्त असू शकतील. पण हजाराच्या सुमारास गाड्या होत्या हे पत्रकार देखील सांगतात.

जेलमधून जामीन घेवून एवढ्या मस्तीत जाणारा साधासुधा गुंड नव्हता तो होता माजी आमदार, माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन. 

१९८० चं दशक. बिहारचा सिवान जिल्हा. जिल्हा ओळखला जायचा तो राजेंद्र प्रसाद आणि ताजमहल विकणारा ठग नटवरलाल. १९८६ ला इथल्या लोकल पोलिस स्टेशनमध्ये पहिल्यांदा त्याच्यावर केस दाखल करण्यात आली. त्यानंतरच्या काळात काय झालं तर त्यानं दोघांना अॅसिडमध्ये अंघोळ घालून मारून टाकलं, आपल्या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीच्या ८ कार्यकर्त्यांचा खून केला, जग बदलायचं म्हणून JNU मधून त्याच्या विरोधात निवडणुक लढायला आलेल्या एका विद्यार्थांचा जाहिर खून करण्यात आला.. 

अजून कित्येक गोष्टी त्याने आपल्या माथ्यावर घेवून मस्तीत मिरवल्या. 

८० चा उतरार्ध होता. तेव्हा राज्याच्या राजकारणात लालू प्रसाद यादव नावाची शक्ती निर्माण होवू लागली होती. तर हिकडं सिवानमध्ये एक तरुण पोरगं आपल्या कामकाजामुळे नाव मिळवत होतं. त्याच्यावर केस दाखल होत होत्या पण तो आत जाणाऱ्यामधला नव्हता. त्या काळात तो २३ वर्षाचा तरुण असा गब्बर झाला होती की त्याच्याकडे AK 47 सारख्या रायफल असायच्या. या शक्तीच्या जोरावर तो २३ व्या वर्षी आमदार झाला.

आमदार होण्यासाठी २५ वर्ष हवी असताना त्याने २३ व्या वर्षी आपल्या पदरात माळ पाडून घेतली होती. त्यानंतर पुढच्या दोन टर्म तो आमदार आणि चार टर्म खासदार राहिला. 

लोक जनतेची कामे करुन निवडून येतात.शहाबुद्दीनच काम उलटं चालायचं. तो लोकांना दमात ठेवायचा. त्याची सत्ता होती तोपर्यन्त या भागात कोणी गाडी खरेदी करु शकलं नव्हतं. घरात जेवढी रक्कम जास्त येईल तितकी जास्त खंडणी गोळा व्हायची.  घरातलां मुलगा बाहेर असेल तर त्याची माहिती शेजारच्यांना देखील नसायची.

तो कमवतो याचा जराजरी अंदाज आला तर खंडणीची रक्कम वाढायची. त्या काळात प्रत्येक घरातून खंडणी गोळा केली जायची. ती दिली नाही तर चौकात जाळण्याची धमकी असायची व ती पुर्ण देखील केली जायची. 

बाहुबली टाईप जो प्रकार असतो तो शहाबुद्दीनचा होता. त्याच्याकडे कित्येक गोष्टी सापडल्या होत्या. पण तो खासदार होता. याच काळात वेगवेगळ्या केसेस त्याच्यावर दाखल होण्याचे प्रसंग घडत. पण साक्षीदार ? कित्येक साक्षीदार शहाबुद्दीनेच ढगात पाठवले होते. 

पण या सगळ्या गोष्टी उलटू लागल्या त्या २००१ च्या एका मुस्काडीनंतर.

शहाबुद्दीनने २००१ साली एका पोलिसाला मुस्काड लावली. हात बांधून बसलेली पोलिस त्या मुस्काडीनंतर पेटून उठली. SP साहेबांनी शहाबुद्दीनला अटक करण्याचे आदेश दिले. पोलिस अटक करण्यासाठी गेली. युद्ध व्हावं तशी चकमक झाली. दोन्ही बाजूने गोळीबार झाला आणि यात आठ माणसं मारली गेली. 

त्याला अटक करण्यात आली. जून्या केसेस बाहेर काढण्यात आल्या. त्यातलीच एक केस होती एका कम्युनिस्ट नेत्याचा केलेला मर्डर हि केस होती १९९९ ची. तीच केस पुन्हा ओपन झाली. त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. पण हा सासुरवास फक्त नावाला होता. तो हॉस्पीटलमध्ये असायचा. तिथे त्याचे पर्सनल बॉडीगार्ड असायचे. सगळा कारभार तिथूनच चालायचा. सरकारी हॉस्पीटलला त्याने खाजगी बंगला करुन टाकलेला.

जेल मध्ये गेल्यानंतर २००४ ची इलेक्शन झाली. या फंटरने ती इलेक्शन जेलमधून लढली. झोपल्या जागेवरुन साहेब निवडून आले. २००४ साली खंडणी प्रकरणात सतीश आणि गिरीश या दोघांना अॅसिडने अंघोळ घालून मारून टाकण्यात आलं. केसेसचा पाढा वाढायला लागला. 

२००५ ला त्याला तडीपार करण्यात आलं तेव्हा हे साहेब खासदार होते. त्याच जोषानं ते आपली दबंगगिरी टिकवून होते. २००९ साली इलेक्शन कमीशनला पण असल्या माणसाचा कंटाळा आला. त्यांनी देखील आत्ता तू राहूदे म्हणून निवडणुक लढवायला त्याच्यावर बंदी आणली. तेव्हा त्याने आपल्या बायकोला इलेक्शनला उतरवलं. त्याची बायको ओमप्रकाश यांच्याकडून हरली. हे तेच ओमप्रकाश होते ज्यांना शहाबुद्दीन ने कधीकाळी रस्त्यावरुन पळवून मारलेलं. 

२००४ साली केलेल्या दोघांच्या खुनाबद्दल तो आत होता. २०१५ साली सिवान कोर्टाने दिलेली शिक्षा सुप्रीम कोर्टाने देखील कायम ठेवली आणि या साहेबांना कायमच आत टाकण्यात आलं. 

आयुष्यभर दंतकथा म्हणून राहिलेल्या शहाबुद्दीनचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूची बातमी पक्की होईपर्यंत तीही दंतकथाच वाटत होती…

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Ananta says

    Very good

Leave A Reply

Your email address will not be published.