दोन्ही हातांनी लिहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतातील एकमेव शाळा !

३ इडियटसमधील विरू सहस्रबुद्धे आठवतात..? एकाच वेळी दोन्ही हातांनी हातांनी लिहू शकणारा माणूस. सिनेमात काय काहीही होऊ शकतं पण तुम्हाला जर सांगितलं की भारतात एक शाळा अशी आहे की, ज्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना आपल्या दोन्हीही हातांनी अगदी व्यवस्थितपणे लिहिता येतं तर..? हे अविश्वसनीय वाटत असलं तरी अगदी खरंय.

नेमकी आहे कुठे ही शाळा..?

मध्यप्रदेशमधल्या सिंग्रोली जिल्ह्यातील बुधेला या दुर्गम भागातील ‘वीणा वादिनी पब्लिक स्कूल’ या शाळेचं वैशिष्ट्ये असं की शाळेत शिकणाऱ्या जवळपास ३०० विद्यार्थ्यांपैकी २०० विद्यार्थी असे आहेत की जे आपल्या दोन्हीही हातांनी सारख्याच सहजपणे लिहू शकतात.

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना मातृभाषेव्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी,उर्दू,स्पॅनिश,संस्कृत आणि रोमन या ६ भाषा अवगत आहेत. उर्वरित १०० विद्यार्थी देखील हे कौशल्य आत्मसात करताहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे दलित आणि भटक्या समाजातील आहेत.

हे नेमकं शक्य कसं झालं..?

जगभरातली बहुतांश लोकं ही ‘उजवी’ आहेत. म्हणजे ते आपली बहुतेक कामं उजव्या हाताने करतात. खूपच थोडी लोकं ‘डावी’ आहेत. जे आपली कामं मुख्यतः डाव्या हाताने करतात. पण मग हे असं एकाच वेळी दोन्ही हाताने सारख्याच क्षमतेने काम करण्याचं हे कौशल्य या मुलांमध्ये नेमकं कुठून आलं असा प्रश्न तुम्हाला पडलेला असणारच.

या शाळेतील मुलांना अशा पद्धतीने विकसित करण्यामागे एका पारखी माणसाची मोठी भूमिका आहे. भारतीय सैन्यसेवेतून निवृत्त झालेले व्ही.पी. शर्मा हे ते पारखी होतं.

bv both2
व्ही.पी. शर्मा

झालं असं की व्ही.पी. शर्मा यांच्या असं वाचनात आलं की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या दोन्हीही हातांनी लिहू शकत असतं. हे समजल्यानंतर याच गोष्टीतून प्रेरणा घेत त्यांनी अशाप्रकारच्या मुलांना घडविण्याचा विडा उचलला आणि ८ जुलै १९९९ रोजी एक शाळा सुरु केली.

मध्यप्रदेशातील सिंग्रोली जिल्ह्यातील बुधेला या अतिशय दुर्गम भागातील गावापासून ५ किलोमीटर अंतरावर त्यांनी ही शाळा सुरु केली. शाळेला नांव दिलं ‘वीणा वादिनी पब्लिक स्कूल’ शाळा सुरु केल्यानंतर त्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक मुलांना दोन्ही हातांनी लिहायचं प्रशिक्षण द्यायला सुरु केलं.

कसं होतं प्रशिक्षण..?

१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी  ही शाळा चालवली जाते. विद्यार्थी ज्यावेळी शाळेत प्रवेश घेतो त्यावेळी पहिला महिनाभर त्याला एकाच हाताने लिहायला सांगितलं जातं. महिनाभरानंतर दुसऱ्या हाताने लिहायला सांगितलं जातं. हा कालावधी पूर्ण झाला की मग दोन्ही हातांनी एकत्रितपणे लिहिण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पहिलीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी तिसरीत येईपर्यंत दोन्ही हातांनी लिहायला शिकलेला असतो, अशी माहिती व्ही.पी. शर्मा देता.

सातवी किंवा आठवीत येईपर्यंत विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाच वेळी अगदी सारख्याच सहजतेने आणि वेगाने लिहायला लागलेला असतो. त्यासाठी ४५ मिनिटांच्या शैक्षणिक तासात १५ मिनिटे लिखाणाच्या सरावावर खर्च केली जातात.

‘वीणा वादिनी पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या या अद्भुत कौशल्याची दखल जगभरातील माध्यमांकडून घेण्यात आली आहे. त्यांचं हे कौशल्य सर्वांनाच थक्क करणारं आहे. कारण जगभरातील लोकसंख्येच्या केवळ १ टक्के लोकांकडेच अशाप्रकारची क्षमता आढळून येत असताना या शाळेतील जवळपास सर्वच मुले अगदी सहजतेने हे काम करताना बघायला मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.