शिंदे -ठाकरे गटातटात आणखी एक कुटुंब फुटलं…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंकडे  साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेक मंत्री, आमदार, खासदार,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नसल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

पण या सगळ्यातही सेनेतली काही जुनी खोडं ठाकरेंसोबत राहिलीत जशी कि, लिलाधर डाके, मनोहर जोशी, सुभाष देसाई अशी मंडळी. पण सेनेतली नवी पिढी शिंदेंचा मार्गावर जाण्याचा विचार करतेय. 

सांगण्याचं निमित्त म्हणजे,  ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाई यांचे स्वागत केले. अर्थातच हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय.

बाळासाहेब ठाकरे हेच माझं दैवत आहे. शिवसेना या दोन शब्दांना सोडून माझ्यासमोर तिसरं काही आलं नाही. शिंदे साहेबांनी आणि आम्ही आधीपासूनच एकत्र काम केलं आहे. त्यांना जवळून बघितलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी लहान कार्यकर्ता म्हणून काम करतोय. हे नवं सरकार स्थापन झालं तेव्हाच मी हा निर्णय घेतला होता, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण देसाई यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत गेले आहेत. 

चारच महिन्यांखाली भाजप नेते भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत होते. प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरीचे आरोप केले होते. पण आता भूषण देसाईंचा पक्ष प्रवेशाला त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचं कनेक्शन आहे का अशी चर्चा चालू आहे. 

असो,  बाप लेक असूनही एक ठाकरेंच्या साथीला तर दुसरा शिंदेंकडे त्यामुळे असं राजकारण घडणारी देसाई बाप-लेकाची दुसरी जोडी ठरतेय,

सुभाष देसाई ठाकरेंकडे तर भूषण देसाई शिंदेंकडे…

bhashan desai will join shinde camp, ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का, निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या सुपुत्राचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश! - maharashtra political happening ...

बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना गाजवणारं नाव म्हणजे माजी मंत्री सुभाष देसाई. १९९० मध्ये देसाई पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर सलग तीनवेळा आमदार, विधान परिषदेची आमदारकी, मंत्रीपद आणि शिवसेना नेतेपद अशा अनेक भूमिका देसाई यांनी बजावल्या.

शिवसेनेत झालेली बंड आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक निष्ठावान सहकारी गेलेले असतानाही देसाईंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांनी शिवसेनेतच राहणं पसंत केलं. थोडक्यात सुभाष देसाई शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

पण याच सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भूषण देसाई लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या राजकारणामुळे घरातही फूट पडण्याचं हे काय पहिलं उदाहरण नाहीये, तर सुभाष देसाई-भूषण देसाई यांच्यानंतर खासदार गजानन किर्तीकर यांच्या घरातही फूट पडल्याचं आपण पाहिलंय. 

गजानन कीर्तिकर शिंदेंकडे आहेत तर अमोल कीर्तिकर ठाकरेंकडे…

Shinde Group Mp Gajanan Kirtikar talk About Son Amol Kirtikar

गजानन कीर्तिकर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले नेते. आजही शिवसेनेत असणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते.  सलग ४ वेळेस आमदारकी, मंत्रिपदे मिळवत त्यांनी लोकसभेत एंट्री मारली. २०१४ ला काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा पराभव करुन वायव्य मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.  

तर २०१९ मध्ये ५ लाख ७० हजार ६३ मतं घेत कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केलेला. संजय निरुपम यांना ३ लाख ९७ हजार ७३५ मतं मिळालेली. महत्वाचं म्हणजे गजानन कीर्तिकर राष्ट्रीय कार्यकारणीचा भाग आहेत. 

आता अमोल कीर्तिकरांबद्दल जाणून घेऊया,

गजानन कीर्तिकर जरी शिंदेंकडे गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिलेत.  अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या आजपर्यंतच्या संपूर्ण राजकीय प्रवासात त्यांच्यासोबत राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. युवासेनेच्या असताना त्यांच्याकडे युवासेना सरचिटणीस पद होतं, सद्या अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात उपनेते या पदावर आहेत.

पण त्यावर अमोल कीर्तिकर यांची पुढील भूमिका काय आहे असं विचारलं असता त्यांनी, “मी शिवसेनेसोबतच राहणार आहे. बाकी माझ्या वडिलांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहील. माझी आणि वडिलांची राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी राजकारणातील कटुता कौटुंबिक जीवनात येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन, असे अमोल कीर्तिकर म्हणाले होते. 

ठाकरेंची शिवसेना सोडताना गजानन कीर्तिकरांनी स्पष्ट केलेलं कि, “आपण मुलावर कोणतंही बंधन घातलं नाही. मी अमोलला सांगितले की मी शिदे गटात चाललोय तुला यायचे असेल तर ये, पण तो नाही बोलला. त्याच्यात आणि माझ्यात कुठला वादही नाही” असं गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केलेलं.

एक मात्र खरंय या पिता-पुत्रांमध्ये राजकीय वाट चोखाळण्यावरून कुटुंबात मतभेद असल्याचं चित्र नक्की आहे. यापूर्वी देखील शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदेंना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे तर उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हाने अधिक खडतर होताना दिसत आहेत. 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.