बायकोने मारलेल्या टोमण्यामुळे भडकलेल्या इंजिनियरने पहिला मेड इन इंडिया मिक्सर बनवला !

आपल्या आधीची पिढी नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावातल एकत्र कुटुंब सोडून शहरात आली होती. संसार नवा, शहर नवं. या सगळ्याशी जुळवून घेता घेता नाकी नऊ आलं होतं. व्हॅलेंटाईन डे, गिफ्ट डे वगैरे प्रकार नव्हते.

नोकरी आणि घर दोन्ही आघाडीवर लढणाऱ्या आईसाठी बाबाने कौतुकाने घेतलेलं पहिलं गिफ्ट म्हणजे मिक्सर ग्राईंडर !

गोष्ट आहे मुंबईची. एक सुखवस्तू कुटुंब होतं. नवरा सत्यप्रकाश माथुर इंजिनियर. माधुरीताईना त्यांनी एक जर्मनीतून मिक्सर आणून दिलेला होता. ब्राऊन कंपनीचा. त्याकाळची ही जगातली फेमस कंपनी. इंग्लंडच्या राणीच्या स्वैपाकघरातसुद्धा हेच जर्मन ब्राऊन मिक्सर असायचे.

माधुरी माथुरसाठी मिक्सर म्हणजे अपूर्वाई होती. भारतातल्या सर्वसामान्यघरात कोणाला मिक्सर म्हणजे काय हे देखील माहित नव्हत. त्यामुळे ते कस वापरायच हे देखील माधुरीना सांगणार कोणी नव्हत. स्वतःच स्वतः प्रयोग करायचे.

अशाच एका प्रयोगात खोबर बारीक करताना हा जर्मन मिक्सर जळून बंद पडला.

आता आली पंचाईत. ज्या देशात कोणी मिक्सर पाहिलाच नाही त्या देशात तो दुरुस्त कसा होणार. बऱ्याच दुकानदारांनी माधुरीमाथुर ना सांगितल की हा मिक्सर फक्त जर्मनीतच दुरुस्त होईल. आता शेवटचा उपाय म्हणून त्यांनी घरच्या इंजिनियरला कामाला लावले. सत्य प्रकाश माथुरनी आपल धूळ खात पडलेलं टूलकीट बाहेर काढल.

मोठमोठ्या मशीनशी झटपट करणारा भारताचा इंजिनियर मिक्सरच्या मागे लागला.

खूप कष्ट घेतले. रात्रंदिवस एक केले पण मिक्सर काही दुरुस्त झाला नाही. बायकोचे बरेच टोमणे खाल्ले. आपले इंजिनियर मात्र खवळले. शिकताना कितीपण केटी वायडी असू देत आता इगोवर आल्यावर भारतीय इंजिनियर शांत बसत नाही. बायकोच्या टोमण्यामुळे तापलेल्या गड्याने थेट पहिला मेड इन इंडिया मिक्सर बनवला.

सुमित मिक्सर.

सुमित म्हणजे चांगला मित्र. भारतीय महिलांचा स्वैपाकघरातला मित्र म्हणजे सुमित मिक्सर. या मिक्सरच वैशिष्ट्य म्हणजे याची मोटर एवढी पॉवरफुल होती की मसाले वाटायचे आहेत, खोबरं बारीक करायचं आहे, इडलीच पीठ भिजवायचं आहे, ताक घुसळायच आहे प्रत्येक गोष्टीचा तो रामबाण उपाय ठरला. जर्मन मिक्सरला जे जमत नव्हत ते सुमित मिक्सरने करून दाखवलं.

साल होतं १९६३, सत्यप्रकाश माथुर यांनी पॉवर कंट्रोल आणि अप्लायन्स कंपनी स्थापन केली.

सिमेन्स कंपनीतील चार कर्मचारी त्यांना जॉईन झाले. पुढच्या दोन वर्षात त्यांनी मिक्सरच मेड इन इंडियन मोटर बनवली होती आणि १९७० पर्यंत त्यांनी कोरेडे मिश्रण आणि ओले मिश्रण हे दोन्ही बारीक करण्यासाठी एकाच भांडे बनवले. स्वयंपाकघरातले ५०% कष्ट कमी झाले.

भारतीय महिलावर्गासाठी सुमित मिक्सर म्हणजे देवदूतच ठरला. इडली,डोसे, खोबऱ्याची चटणीवर जगणाऱ्या दक्षिण भारतीयांना तर देवच!!

सत्तरच्या दशकात दर महिन्याला ५० हजार मिक्सर खपत होते. एक काळ सुमित मिक्सरने गाजवला. पुढे हळूहळू इतर कंपन्या स्पर्धेत आल्या. जागतिकीकरणाच्या नंतर तर परदेशी कंपन्यांनी देखील उडी घेतली. भारतीय मार्केटमध्ये तगड्या मिक्सरची लाईन लागली.

पुढे तर स्मार्ट किचनचा जमाना आला. फिलिप्स, मॉर्फी, प्रेस्टीज, बॉश अशा अनेक नामवंत कंपन्याच्या स्पर्धेत सुमित काहीसा मागे पडला. पण आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरात हा लाल पांढरा मिक्सर कुठे तरी अडगळीत पडलेला दिसतो. आजही दिवाळीला खास मसाले वाटण्यासाठी सुमित मिक्सर माळ्यावरून खाली उतरतो. त्याचा दणदणीत आवाज आपली धुगधुगी अजून संपलेली नाही हे जाणवून देतो.

हे ही वाच भिडू.