थेटरात चहा विकणाऱ्या दहावी नापास गुज्जू मुलानं बालाजी वेफर्सचं साम्राज्य उभा केलं.

सत्तरच्या दशकातली गोष्ट. जामनगर जवळ धूनधोरजी नावाचं एक खेड आहे. गुजरातचा दुष्काळी भाग. वरूणदेवाच्या कृपेवर शेती चाललेली. अशातच बहात्तर सालचा भयंकर दुष्काळ पडला. पिकं मेली. अन्नपाण्याविना जनावर सुद्धा खुर घासू लागली. माणसांची अवस्था काही वेगळी नव्हती. गावच्या गाव उठू लागली. असच एक शेतकरी कुटुंब होतं पोपटभाई विराणी यांचं.

आपलं अख्ख आयुष्य काळ्या मातीत राबण्यात पावसाची वाट बघण्यात गेल. अशी वेळ आपल्या मुलांवर येऊ नये असं पोपटभाईनां नेहमी वाटायचं. त्यांना चार मुलं होती. चौघेहीही शिक्षणात खूप हुशार होती असं नाही पण कमीत कमी गुजराती संस्कृती प्रमाणे धंदा तरी करतील या अपेक्षेने विराणीनी थेट आपलं शेत विकल, त्यातून आलेले पैसे मुलांच्या हातात कोंबले आणि त्यांना शहराचा रस्ता पकडायला लावलं.

मेघजीभाई, भिकूभाई, चंदूभाई आणि कानूभाई  विराणी हे तिघे राजकोटला आले. त्यांनी म्हणजे मोठ्या दोघांनी शेतीची अवजारे, कीटकनाशके याचा धंदा करून बघितला पण अनुभव नसल्यामुळे तो चालला नाही. मोठ नुकसान आलं. वडिलांनी शेत विकून दिलेले पैसे सगळे तोट्यात गेले.

विराणी भावांना बसलेला हा खूप मोठा सेटबॅक होता. 

एका भाड्याच्या खोलीत राहायला होते. तिथलं भाड भरायला ५० रुपयेही नसल्यामुळे तिकडून रातोरात समान गुंडाळून पळून गेले. मित्राच्या ओळखीने एका जागी राहण्याची  सोय झाली.

मग सरळ मोठ्ठे रिस्क नसलेले व्यवसाय करायचं ठरल. एका कॉलेजमध्ये कँटीनचं कॉंट्रॅक्ट घेतलं. ते काही विशेष चालत होतं असं नाही. सगळ्यात धाकटा चंदूभाई हा एका थिएटरच्या कँटीनमध्ये कामाला लागला. दहावीपर्यंत शिक्षण झालेलं. यापेक्षा वेगळी नोकरी मिळने शक्यही नव्हत.

चंदूभाई मेहनती होता. दिवसभर कँटीन सांभाळायचा. पण रात्रीच्या शो नंतर सोड्याच्या बाटल्या गोळा करणे, एक्स्ट्रा इन्कमसाठी थिएटरचे पोस्टर लावणे, रात्री सिक्युरिटी गार्डचं काम करणे हे सगळ करायचा. पैसा कमवायचा तर राबण्यात कमीपणा मानायचा नाही हे त्याच्या गुजराती रक्तात भिनलेलं होतं. त्याची मेहनत बघून थिएटरच्या मालकाने त्याला व त्याच्या भावांना १००० रुपयात कँटीन चालवायचा ठेका दिला.

त्यांनी मन लावून धंदा सुरु केला. वेगवेगळे प्रयोग केले.

फक्त चहा पकोडा सँडविच कोल्डड्रिंक मिळणाऱ्या कँटीनमध्ये चटकमटक खायला ठेवायला सुरवात केली. त्यात बटाटा वेफर्सची लोकांना खूप मागणी असायची. इंटरव्हल मध्ये घेतलेले चार आण्याचे वेफर्स सिनेमा संपेपर्यंत पुरायचे.

विरानींच्या या डोकेबाजपणा मुळे पहिल्याच वर्षी फायदा झाला.

तरी त्यांना काही अडचणीचा सामना करायला लागत होता.सगळ्यात मुख्य अडचण होती वेफर्सच्या सप्लायरची. ते कधीच वेळेवर यायचे नाहीत. सिनेमा बघायला आलेले प्रेक्षक वेफर्स मिळाळे नाहीत तर वैतागायचे. बऱ्याचदा बाचाबाची व्हायची. तीन वेळा वेफर्स सप्लायर बदलून पाहिले पण सगळ्यांची हीच बोंब. घरगुती वेफर्स बनवणारे प्रोफेशनली काम करू शकत नव्हते.

चंदूभाईच्या मनात आलं जर आपणच वेफर्स बनवायला सुरु केलं तर?

तो पर्यंत आणखी दोनतीन ठिकाणी कँटीन चालवायचं कॉंट्रॅक्ट मिळालं. कुटुंब थोड स्थिरस्थावर झालं. मोठ्या भावांनी एक घर घेतलं. डोक्यावर छत आलं. एक सेन्ट्रल किचन सारखं तिथून मसाला सँडविच बनवून सगळ्या कँटीन मध्ये पाठवल जात होतं. चंदूभाईंच्या डोक्यातली वेफर्सची आयडिया जात नव्हती.

इतर भाऊ त्याच्यात वेळ जाईल म्हणून त्यांना हे काम करू देत नव्हते. अखेर चंदू भाईनी दिवसभर काम करून आल्यावर रात्री वेफर्स तळायला सुरवात केली. भाऊ त्याच्यावर हसायचे आणि म्हणायचे,

“एवढ सगळ व्यवस्थित चालू असलेला धंदा सोडून आमचा येडा चंदू वेफर्स तळायच हलक काम करतोय !!”

चंदूभाईचे इरादे मोठे होते. त्याला त्या छोट्याशा राजकोटच्या आकाशाला भेदणारी भरारी मारायची होती.

त्याला मध्यमवर्गीय धंदावाला राहायचं नव्हत. सूटबूट टायवाला बिझनेसमन व्हायचं होतं. तेही त्या वेफर्सच्या जीवावर.
वेफर्सला नावही दिल होतं, बालाजी वेफर्स.

वेफर्सनी त्याला खरच वेड लावलं होतं. लोकांना त्याचे वेफर्स आवडले. मग त्याने त्यात प्रयोग करून बघितले. ग्राहकांचा फीडबॅक घेतला, तसे बदल केले. आपल्याच घराच्या कम्पाऊंडमध्ये एक शेड मारली आणि तिथे हा प्रयोग चालवू लागला. आता शेजारी पाजारी, नातेवाईक दोस्त मंडळी सुद्धा हसू लागली. वेड्याच्या इस्पितळात दाखवा म्हणू लागली. 

वेफर्सचे सॅम्पल घेऊन सगळीकडे भटकू लागला. काही जन ऑर्डर द्यायचे. पण बऱ्याचदा तुमचा माल खराब मिळाला म्हणून पैसे कमी द्यायचे, कधी नोटाच मुद्दाम फाटक्या द्यायचे. असले वाईट अनुभव येऊनही चंदूभाईची चिकाटी कमी झाली नाही. माल जास्त दिवस टिकावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू लागला. तोटा उचलला. चुकीतून शिकत पुढचं गेला.

हळूहळू बालाजी वेफर्स लोकांना आवडू लागलं. दुकानदार त्यांची मागणी करू लागले. चंदूभाईंच्या चांगल्या सर्व्हिसमुळे हे दुकानदार जोडलेही जाऊ लागले. त्यांच नेटवर्क राज्यभर पसरलं. पण चंदूभाई खुश नव्हते.

एकदिवस त्याने मोठी रिस्क घ्यायचं ठरवलं.

वेफर्स बनवायची मशीन घ्यायचं. पण मशीन खूप महागड होतं. त्याची किमत स्वतःला विकल तरी परवडणारी नव्हती. चंदूने खूप रिसर्च केला. कोणीतरी सांगितलं की पुण्यात सेम तशीच मशीन बनवून मिळते तेही निम्म्या किंमतीत. चंदूने पुण्याहून ती मशीन मागवली. वाजडी येथे प्लांट उभा राहिला.

या वेफर्सच्या धंद्यात एवढा पैसा खर्च केलेलं पाहून मोठे भाऊ मेघजी संतापले. त्यांच आणि चंदूभाईच मोठ भांडण झालं. मेघजीभाईनी वेफर्स उद्योगाशी आपला संबंध तोडले. बाकीचे दोन भाऊ चंदूबरोबर ठाम राहिले.

पण मेघजीभाईच म्हणन बरोबर निघाल. ते मशीन काही कधीच चालल नाही. उलट ते मशीन दुरुस्त करायला येणाऱ्या इंजिनियरवर पन्नास पन्नास हजार रुपये खर्च होऊ लागले. पण चंदूभाईनी हार मानली नाही. लढा थांबवला नाही.

अशातच १९९१ साल उजाडलं. डॉ.मनमोहनसिंग यांनी भारतात जागतिकीकरण आणलं.

बऱ्याच परदेशी कंपन्यानी भारतात पाऊल ठेवलं. यात वेफर्सच्या कंपन्यादेखील होत्या. अंकल चिप्स आणि लेय्ज या दोन जगभरातल्या चिप्समधल्या दादा कंपन्या. आल्या आल्या त्यांनी केबल टीव्हीवरून जाहिरातीचा मारा सुरु केला. या कंपन्याच्या तडाख्यात देशी वेफर्सवाले उडून जाणार असच वाटत होतं.

झालं ही तसच. घरगुती वेफर्सवाले बुडाले. अनेकांना वाटल बालाजीला ही आपली कंपनी गुंडाळावी लागणार. पण तसं घडल नाही. चंदूभाईनी गुजरात मध्ये आपलं नेटवर्क एवढ जबरदस्त बनवल होतं की लेज आणि अंकल चिप्सला लोकल मार्केटमध्ये त्यांच्याशी सामना करावा लागला. इथल्या मार्केटची चव आणि नस चंदूभाईना सापडली होती.

जागतिकीकरणाचा बालाजीला उलटा फायदा झाला. लायसन्सची बंधने, लालफितीचा कारभार कमी झाला. वेगवेगळी मिशिनरी कमी किंमतीत उपलब्ध झाली. चंदूभाई विराणी दुप्पट जोमाने कामाला लागले. 

बालाजी गुजरातच्या बाहेर पडला. त्यान भारत जिंकलं.

महाराष्ट्र, गोवा, राजस्थान करत करत देशभरातल्या दुकानात फक्त बालाजीचे वेफर्स दिसू लागले. नुसत्या हवेच्या पिशव्या असणाऱ्या लेज पेक्षा अस्सल मातीची चव असणारे मसालेदार बालाजी वेफर्स कधीही भारी असच पब्लिकच मत होतं. परदेशी ब्रांड सोबत पारले सारखे देशी कंपन्यादेखील बालाजीच्या यशाला शिवू शकल्या नाहीत.

आज चंदूभाईना वेफर्सचा सुलतान म्हणलं जातं. वेफर्सबरोबर गुजराती गाठीया शेव याला सुद्धा त्यांनी मार्केट मिळवून दिलंय. आज त्यांची कंपनी हजारो कोटींची बनली आहे. शेकडो कामगार तिथे काम करतात. थेटरात चहा समोसा विकणाऱ्या दहावी शिकलेल्या तरुणाच एक वेड स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं.

पण यानंतर चंदूभाई विराणी शांत बसलेले नाहीत. भारत तर जिंकला आता अमेरिकेत जाऊन तिथे लेज आणि अंकल चिप्सला हरवायचं आहे. गुजराती लोकांच काही सांगता येत नाही. काय माहित खरच करूनही दाखवतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.