गेले ३०० हुन अधिक वर्षे पुण्याचे रक्षण करणारी पुण्याची ग्रामदेवता ‘ तांबडी जोगेश्वरी ‘

पुर्वी महाराष्ट्रातील बहुतांश गावात सरहद्दीवर ग्रामदेवतांची मंदिरे बांधली जात. ग्रामदेवतांच्या छत्राखाली आपला गाव सुरक्षित राहील अशी ग्रामस्थांची श्रद्धा असायची. आपल्या गावावर कोणतेही संकट येणार नाही. मग ते संकट साथीच्या रोगाचे असो, किंवा परकीय शत्रूचे असो की चोर दरोडेखोरांचे असो. अशी संकटे ग्रामदेवता वेशीच्या आत येऊच देणार नाही अशी भावना लोकांमध्ये असायची. आणि जर संकट आले तर गावावर देवी कोपली असे समजले जायचे.

आजही बऱ्याच ठिकाणी अशी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. तर काही मंदिरांचे अवशेष आजही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. आजही अनेक गावात ग्रामदेवता त्या त्या गावाच्या वेशीवर उभी आहे. तसेच पुण्याची पण एक ग्रामदेवता आहे तिचे नाव तांबडी जोगेश्वरी.

गेली ३०० हून अधिक वर्ष ती या पुण्याचे रक्षण करीत आहे.

पुण्यातील आंबील ओढ्याच्या काठी कोणी एका पाटलांची जमीन होती. ती जमीन पुढे जीवाजी खाजगीवाले यांना दिली गेली. याच जमिनीतील शेतात या देवीची मूर्ती होती. खाजगीवाले यांनी या मूर्तीचे मंदिर बांधले तेच आजचे जोगेश्वरी मंदिर (आज जिथे मंदिर आहे, तेथूनच आंबिल ओढा वाहत मुठा नदीला मिळत). 

ही मूर्ती स्वयंभू आहे असे म्हणतात. पुराणांमध्ये ‘तां नमामि जगदधात्री योगिनी पर योगनी’ अश्या शब्दात या मूर्तीचे वर्णन केलेले आढळते. योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोगेश्वरी हे नाव निर्माण झाले. 

योगिनी, योगेश्वरी आणि जोगेश्वरी या एकाच जांभळाचे तीन रंग आहेत. पुराणात माहिष्मती नगरात महिषासुराचे बारा सेनापती होते. त्यात ताम्रसुर नावाचा एक सेनापती होता. त्याचा वध या देवीने केला त्यामुळे ह्या देवीला ताम्र जोगेश्वरी म्हणू लागले. पुढे जाऊन ताम्र चे तांबडी जोगेश्वरी झाले. तर या देवीची मुळ मुर्ती तांबडा शेंदूर लावलेली होती म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी म्हणतात असे सुद्धा सांगितले जाते.

या देवीची मूर्ती सुबक आणि सुरेख आहे. पुराणात वर्णन केलेल्या वर्णनाशी देवीचे वर्णन अगदी तंतोतंत जुळते.

मूर्तिकार कोण आहे हे न कळल्यामुळे ही मूर्ती स्वयंभूच आहे अशी लोकांची खात्री झाली. ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे. जोगेश्वरी, माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा या सर्व देवींचे एकत्रित असे स्वरूप या मूर्तीमध्ये बघायला मिळते. देवीच्या वरच्या दोन हातांपैकी डाव्या हातात डमरू व उजव्या हातात त्रिशूळ आहे. खालच्या दोन हातात मुंडके व कमंडलू आहे. मूर्तीच्या पार्श्वभागी एक दगड आहे.

सुमारे ३०० वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. मंदिराचे शिखर तीन थरांचे असून पहिल्या थरावर लहान लहान कमानदार कोनाडे तयार केलेले आहेत. दुसरे दोन थर मोठ्या कळसावर असून मोठ्या कळसावरही दुसरा लहान थर आहे. गाभाऱ्यात वरच्या भागात रेखीव आणि घडीचे दगड वापरलेले दिसतात. आजच्या मंदिरात मंदिराच्या चारही कोपर्‍यात चार छोटी मंदिरे आहेत. महादेव, गणपती, विष्णू, शंकर असे हे चार दैवत आहेत. देवीच्या मंडपा समोरील चौकात दगडी कासव असून होमाचे होमकुंड पण आहे. देवीच्या मंडपामध्ये पुर्विकडील दोन कोपऱ्यात उभी नाग असलेली दगडी शीला आहे तर दुसऱ्या कोपऱ्यात विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे.

पुर्वी या देवीसाठी पेठेतील वाणी व कसब्यातील महार यांना शिधा व पानसुपारीचा मान असत.

विजय दशमीच्या दिवशी खुद्द पेशव्यांची खासी स्वारी देशमुख व शितोळे या सरदारांसह दर्शनाला येत. पूर्वी लग्न किंवा मंगलकार्याची पहिली अक्षदा याच देवीला दिली जायची. लग्नाच्या वरातीचा घोडा या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नसे. देवीचे दर्शन घेतल्याशिवाय नवविवाहितांना घरात प्रवेश दिला जात नसे. दुसर्‍या बाजीरावांच्या लग्नाची अक्षदा सुद्धा प्रथम याच जोगेश्वरीला दिली गेली होती.

पुण्याच्या दैदीप्यमान इतिहासातील सुवर्णपान असलेली ही देवी पुनवडी ते पुणे स्मार्ट सिटी अश्या घडलेल्या दैदिप्यमान विस्ताराची साक्षीदार आहे.

  •  कपिल जाधव
हे हि वाच भिडू
Leave A Reply

Your email address will not be published.