बाकीचे नेते राजकारणासाठी फेसबुक वापरतात, तर तामिळ नेते सिनेमा…

उडल मन्नीक्कू .. उयीर तामिळहक्कु…

शरीर देणार मातीसाठी आणि जिंदगी देणार तामिळसाठी…!

हा साधा डायलॉग आहे पिच्चरचा… पण या डायलॉगने तामिळनाडूमध्ये सरकारं उलटीपालटी केली होती.

आपण बघायचे म्हणून पिच्चर बघत असू, तामिळ माणूस जगायचं म्हणून पिच्चर बघत असतोय. हा वारसा त्यांना तामिळनाडूच्या इतिहासानंच दिला आहे.

याची सुरुवात होते पेरियार यांच्यापासून….

द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक. पूर्ण नाव एरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर.

पेरियार यांच्या कामातून तयार झालेली संस्था म्हणजे द्रविड कळघम. जातीव्यवस्थेत असणाऱ्या उतरंडीला त्यांचा विरोध होता. अस्पृश्यता हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. पण त्या सोबतच ‘द्रविड नाडू’ नावाचे दक्षिणेकडील लोकांचे वेगळे राष्ट्र प्रस्थापित व्हावे म्हणून त्यांनी काम केलं. यामागे ब्राह्मणवादाच्या कचाट्यातून लोकांची सुटका व्हावी हा हेतू होता.

त्यांनी केलेलं मोठं काम म्हणजे आपल्या विचारांना स्थानिक सांस्कृतिक कलेची दिलेली जोड. त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवायला संगीत आणि नाटक अशा विविध साधनांचा अवलंब केला.

यात दोन माणसे प्रामुख्याने सहभागी होती – अण्णादुराई आणि करुणानिधी… पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराई यांचा पेरियार यांना  पूर्ण पाठिंबा होता.

अण्णादुराईंनी १९३७ पासून पूर्ण ताकदीने पेरियारयांच्या द्रविडर कळघम् चे काम सुरु केले. पण त्यांचा मुख्य ओढा हा चित्रपटांकडे होता.

१९१८ मध्ये कीचक वध हा पहिला तामिळ सिनेमा रिलीज झाला होता. अर्थात हा एक मूकपट होता पण त्याचा स्थानिक जनतेवर मोठा प्रभाव पडला. हिंदीत आलम आरा हा बोलपट आल्यानंतर अवघ्या ९ महिन्यात एच एम रेड्डी यांनी “कालिदास” हा बोलपट रिलीज केला.

३१ ऑक्टोबर १९३१ चा दिवस होता. त्या दिवशी दिवाळी होती.

कालिदास रिलीज झाला आणि चेन्नईत जी मोजकी थिएटर्स होती त्याच्याबाहेर मैलांनी रांगा लागल्या.

लोकांना हव्या त्या किमतीत हा चित्रपट बघायचा होता. या नव्या कलेने तामिळ माणसांवर मोहिनी टाकली होती. या गोष्टी अण्णादुराई आणि करुणानिधी यांच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या.

१९३९ पासूनच मद्रास राज्यात सरकारने चित्रपटांवर कर लावायला सुरुवात केली. यावरूनच तेव्हाच्या तामिळ सिनेमाची व्याप्ती लक्षात येते.

अण्णादुराई आणि करुणानिधी यांच्या प्रयत्नातून कॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आकारास येण्यास सुरुवात झाली. अण्णादुराई स्वतः तमिळ् भाषेतील एक निष्णात लेखक म्हणून ओळखले जायचे. आपल्या शैलीदार भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. त्यासोबत मुतुवेल करुणानिधी हेही चांगले लेखक होते.

अण्णादुराई यांनी सिनेमाचा वापर आपले राजकीय विचार समाजात रुजवण्यासाठी केला. आपला अजेंडा सिनेमाच्या मार्फत पुढे रेटत त्यांनी या माध्यमाला वापरायला सुरुवात केली.

“मी माझे स्क्रीनप्ले तामिळ जनतेला शिक्षित करण्यासाठीच लिहितो” असं अण्णादुराई यांनी स्पष्ट सांगितलं होतं.

गाजलेली इटालियन फिल्म बायसिकल थीफ या गाजलेल्या चित्रपटाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. समाजची वास्तविकता अगदी खरेपणाने सिनेमात दाखवता येऊ शकते हे त्यांना कळून चुकले.

१९४९ च्या वेलाईकरी या सिनेमातून त्यांनी नेहरू-गांधी यांच्या विचारसरणीवर हल्ला चढवला.

आज नेते जसे फेसबुक-ट्विटर याचा वापर करत आहेत तसे तेव्हा सिनेमाचा वापर होई. अण्णादुराई यांनी पेरियार यांचे विचार सिनेमा वापरून लोकांपर्यत पोचवायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या तामिळ चित्रपटांतून हे बिंबवले गेले. १९३६ पासूनच असे चित्रपट येण्यास सुरुवात झाली. देवी देवतांना प्रश्न विचारणे, त्यांचे मूर्तिभंजन करणे आणि त्यातून समाजाची जागृती करणे अशी कामे त्यांनी केली.

सुरुवातीला गांधीवादाची तत्त्वे दाखवणारा तामिळ सिनेमा हळूहळू रॅडिकल बनत गेला. साधं उदाहरण बघा –  

सेवासदन या १९३८ च्या पिच्चरमध्ये सुब्बुलक्ष्मी या नटीने मेन रोल केला होता. लग्न व्यवस्था ही किती फालतू आहे असा या चित्रपटाचा विषय. त्या काळात असे चित्रपट काढून तामिळ इंडस्ट्रीने सामाजिक बदल घडायला हवेत या बाजूने बोलण्यास सुरुवात केली.

अण्णा स्टोरी लिहायचे आणि त्यावर करुणानिधी पल्लेदार धमाकेबाज डायलॉग आणि स्क्रिप्ट लिहीत. यातून समाजभान आणि जातींवर प्रहार केला जात असे.

‘काँग्रेस सोडून आपल्याला अस्तित्व आहे. तामिळ माणूस म्हणून आपली वेगळी ओळख आहे’ हे लोकांना त्यातून समजलं.

१९४७ साली आलेला चित्रपट म्हणजे राजकुमारी. यासाठी करुणानिधी यांनी जबरदस्त डायलॉग लिहिले. त्यातून जन्म झाला तो तामिळनाडूच्या पहिल्या सुपरस्टारचा – तो म्हणजे मरुदुर गोपालन रामचंद्रन. आपण ज्यांना एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर म्हणून ओळखतो हे तेच.

पेरियार यांच्या विचारांचा यावर प्रभाव होता. त्यांच्या विचारांमधून अनेक पक्ष पुढे आले. द्रविड मुन्नेत्र कळघम् हा राजकीय पक्ष याच विचारांतून पुढं आला. द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड लोकांच्या विकासासाठीची संघटना.

पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. पेरियार यांच्या द्रविडार कळगम् या पक्षापासून वेगळे होऊन सी.एन. अण्णादुरै यांनी इ.स. १९४९ साली द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्ष स्थापन केला खरा.

पण या पक्षातील अनेक नेतेमंडळी ही प्रामुख्याने सिनेमाशी नाते ठेवणारी होती.

कन्नदासन या महान तामिळ कवी आणि पिच्चरचे लिरिक्स लिहीणाऱ्या माणसानं तर स्पष्ट सांगितलं होतं,

“काँग्रेस पक्षाने सिनेमाला नावं ठेवली. आमच्या द्रमुक पक्षाने फक्त सिनेमाला वापरून घेतलं, एवढंच!”

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस सोडून देशात कुणीच निवडणूक जिंकत नसे. त्या काळात भारतातल्या एखाद्या राज्यातल्या विधिमंडळाच्या निवडणुका स्वबळावर जिंकून आपली राजवट स्थापण्याची विक्रमी कामगिरी करणारा हा पहिला राजकीय पक्ष बनला. याच्यामागे त्यांच्या सिनेमाचा मोठा हात होता.

१९५० साली खेडोपाडी वीज पोचली आणि सिनेमाने द्रमुकचा प्रचार घरोघर केला.

तामिळ संस्कृतीचा प्रचंड वारसा आणि ब्राम्हण्य विरोधी भविष्यातील एका विवेकी राष्ट्राचा पाया या दुहेरी गोष्टींची सांगड तामिळ सिनेमाने घातली.

एक पक्ष जिथं कधीच पोचू शकला नसता तिथं हा सिनेमा जाऊन पोचला आणि त्याने द्रमुक पक्षाचे मतदार तयार केले.

इतकेच काय, काँग्रेस नेते कामराज यांनी असे चित्रपट काढून निवडणूक जिंकणं चुकीचं आहे म्हणून विरोधही नोंदवला होता. “नट येऊन काय राजकारण करणार” अशी खिल्ली त्यांनी उडवली होती.

पण अण्णादुराई-करुणानिधी-एमजीआर यांच्या जोडीने तामिळनाडू ढवळून काढला. त्याच्या सिनेमांना द्रमुक सिनेमा म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. करुणानिधी यांनी लिहिलेला १९५२ सालचा ‘पराशक्ती’ हा सिनेमा याचं उत्तम उदाहरण होता. त्याआधी एकेका तामिळ पिच्चरमध्ये ५५ पर्यंत गाणी असायची. याने ती परंपरा मोडली. देवी आणि धार्मिक परंपरांना प्रश्न विचारणारी ही असामान्य फिल्म होती. सुरुवातीला ती चक्क बॅन करण्यात आली होती.

पिच्चरच्या एका गाण्यात ‘एलोरम वळहा वेंडूम’ मध्ये चक्क पेरियार यांना दाखवण्यात आलं होतं.

ते स्वतः कार्यक्रमाला आले आहेत असं दाखवण्याइतपत वास्तववादी चित्रण यात होतं.

हा चित्रपट रिलीज झाल्यावर तामिळ माणसाच्या राजकीय आकांक्षाचे प्रतीक बनला.

या चित्रपटातून जात आणि समाजाच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उठवायचं कामच आम्ही करत होतो

— एस. पूंजू, दिग्दर्शक

करुणानिधी यांच्या स्क्रिप्ट्स कमाल करत होत्या. एमजीआर यांचा अभिनय आणि त्यांच्या डायलॉगने जनता अक्षरशः वेडी झाली होती.

तोवर चित्रपटात हिरो फक्त ब्राह्मणी टोनमध्ये शुद्ध तामिळ बोलत असायचा. करुणानिधी-अण्णा यांचा हिरो रांगडी, कष्टकरी जनतेची गावठी तामिळ भाषा बोलत असे.

म्हणून आम तामिळ जनतेला एमजीआर हा आपल्यातला माणूस वाटू लागला.

एक दलित समाजातील मुलगा येतो आणि गुंडांशी लढून मोठमोठ्या ब्राह्मण व्हिलन्सना धूळ चारतो हे चित्रण तेव्हा सामान्य जनतेसाठी क्रांतिकारी होतं.

यामुळेच एमजीआर हे प्रचंड मोठे नेते होऊ शकले. इतके कि पुढे त्यांनी थेट करुणानिधी यांनाच आव्हान निर्माण केलं.

“आम्ही एम.जी.आर. चा चेहरा दाखवतो तेव्हा आम्हाला ४० हजार मतं मिळतात.. आणि तो एक शब्द बोलतो तेव्हा ४ लाख!”

असं अण्णादुराई एकदा म्हणाले होते. ते शब्दशः खरं होतं. एमजीआर आणि करुणानिधी या दोघांमध्ये अण्णादुराई यांच्या मृत्यूनंतर वाद झाले. १९७२ साली त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रामचंद्रन यांनी ‘अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम’ या त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली. 

“हा पक्ष एखाद्या बऱ्या पिच्चरसारखा १०० दिवस चालेल”अशी खिल्ली करुणानिधीयांनी उडवली होती.

इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन टर्मसाठी मुख्यमंत्री होते. याच्यामागे मुख्य रोल होता त्यांच्या डायलॉग्सचा… पक्षाच्या झेंड्याच्या रंगाची लाल-काळी कपडे घालून ते असे डायलॉग म्हणत –

“देवळे आणि मुर्त्या पवित्र असतीलही पण त्याच्या मुखवट्याआड लपलेल्या दांभिक चोरांचं काय करायचं?”

“देवाचा वापर करून आपल्याला लुटलं म्हणून कुणाला नावं ठेवू? देवाला की त्याच्या पुजाऱ्याला?” किंवा “गांधीयोडा पैयां गांधी या सर? गोडसे ओड पैयां गोडसे वा सर” म्हणजे –

“गांधींची मुलं पुन्हा गांधी नाही होऊ शकली पण गोडसेची सगळी पोरं पुन्हा गोडसे झाली ना?”

असे प्रश्नार्थक डायलॉग जनतेला विचार करायला भाग पाडतात.

तामिळ समाजाच्या घडणीत चित्रपटांनी अशी मोठी भूमिका बजावली.  “आपण हरलो तरी तामिळ माणसांसाठी आपल्याला लढायचं आहे!” असं लिहून करुणानिधी यांनीसुद्धा तामिळ राजकारण गाजवलं. एमजीआर यांच्यानंतर जयललिता यांनीही हे राजकारण सुरु ठेवलं.

१९९५ साली रजनीकांतनेही आपल्या चित्रपटांतून राजकारण दाखवायचा प्रयत्न केला होता. ही परंपरा आता कमल हसन आणि इतर नटांच्या माध्यमातून सुरूच आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.