आता ‘द केरला स्टोरी’ येतोय ज्यात ३२ हजार मुलींच्या तस्करी, धर्मांतराबद्दल दावे केलेत

देशभरात पिक्चरच्या नावाने चांगलाच बाजार उठलाय. कित्येक दिवसांपासून ‘द काश्मीर फाईल्स’ वर चालू असलेला वाद अजून शांत व्हायचं नाव घेत नाही तितक्यात दुसऱ्या एका पिक्चरच्या टिझरने  वातावरण आणखी तापवलं आहे. ते म्हणजे ‘द केरला स्टोरी’ .

 

The Kerala Story चा टिझर रिलीज झाला आणि ट्विटर #TheKeralaStory ट्रेंड करत आहे. 

टिझर पाहून स्टोरीचा अंदाज लागतो तो म्हणजे, केरळमधील हजारो महिलांची तस्करी करून त्यांना सिरीयात नेऊन इसिसच्या अतिरेक्यांसाठी सेक्स स्लेव्ह बनवण्यात आले, तसेच त्यांचे जबरदस्तीने केलं गेलेलं धर्मांतर. 

आता टिझर मध्ये असा दावा केला आहे कि, केरळच्या ३२ हजारांपेक्षा जास्त मुलींची, महिलांची तस्करी करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेला विकण्यात आलं आहे. इतकंच नाही तर हे रॅकेट केरळ राज्याला इस्लामिक राज्यामध्ये रूपांतरित करण्याच्या मोठ्या ऑपरेशनचा भाग असल्याचं या पिक्चरच्या टिझरमध्ये दाखवलं आहे. 

तसेच टिझरमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांच्या भाषणाची क्लिप दाखवली आहे. त्यात त्यांनी ‘पॉप्युलर फ्रंट’वर आरोप करत केरळला मुस्लिम राज्य बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना येत्या २० वर्षात केरळ हे मुस्लिम राज्य बनवायचे असल्याचं विधान करतांना आपण बघू शकतो.

बॉलिवूड प्रोड्युसर विपुल अमृतलाल शहा यांनी हा चित्रपट निर्मित केला आहे तर सुदिप्ता सेन यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून त्यांनीच हा चित्रपट डिरेक्ट केला आहे.

हा टिझर रिलीज करत विपुल शहा सांगतात कि, “हि कहाणी म्हणजे एक शोकांतिका आहे. जी तुम्हाला हादरवून सोडेल. जेंव्हा सुदिप्तोने येऊन मला त्याचा ३-४ वर्षांचा रिसर्च दाखवला तेंव्हा मी पहिल्यांदा रडलो आणि लागलीच ठरवलं कि हा चित्रपट करायचा. आम्ही पिक्चरमध्ये जे काही दाखवलं आहे त्या घटनांची अतिशय खरी, निष्पक्ष आणि सत्य कथा दाखवली आहे”.

तर सुदिप्तो सेन यांच्या सांगण्यानुसार,  

२००९ पासून केरळ आणि मंगरूळमध्ये सुमारे ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर करून त्यांना सीरिया, अफगाणिस्तान मध्ये नेण्यात आलं. तर काहींना ISIS मध्ये नेण्यात आलं आहे.. ही वस्तुस्थिती मान्य करूनही, सरकार ISIS प्रभावित गटांच्या नेतृत्वाखालील अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय कटांविरुद्ध कोणत्याही निश्चित कृती योजनेचा विचार करत नाही आणि केला नाही.

तसेच सुदिप्तो यांनी दावा केला आहे कि, संशोधनादरम्यान अपहरण आणि तस्करीकरून ज्या मुली बेपत्ता झाल्या होत्या त्यातील काही मुली अफगाणिस्तान आणि सीरियाच्या तुरुंगात सापडल्या होत्या. यातील बहुतांश मुलींचे ISIS च्या दहशतवाद्यांशी लग्न लावून देऊन त्यांना एकप्रकारे लैंगिक गुलाम बनवण्यात आले होते.

आता सुदिप्तो करत असलेल्या दाव्यांमध्ये ‘३२ हजार’ हा आकडा कितपत खरा आहे याबाबत अजून काही ठोस आकडेवारी जरी मिळत नसली तरी केरळच्या महिलांच्या तस्करीचा विषय पाहिला तर काही बातम्या हाती लागतात…

२०१८ मार्चच्या अखेरीस ची एका बातमीने सगळं केरळ हादरून गेलं होतं. 

केरळच्या पठाणमथिट्टा येथील एका महिलेने केरळ हायकोर्टात सांगितलं होतं कि, बेंगळुरूमध्ये भेटलेल्या मोहम्मद रियास नावाच्या व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि व्हिज्युअल रेकॉर्ड करून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने तिचं धर्मांतर केलं. व्हिजिटिंग व्हिसावर तिला सौदी अरेबियात नेण्यात आले.

पण तिला जेंव्हा सेक्स स्लेव्ह म्हणजेच लैंगिक गुलाम म्हणून विकण्यात येत होतं तेंव्हा ती पळून जाण्यात यशस्वी झाली आणि भारतात परतली.  तिच्या सांगण्यानुसार या तस्करीच्या या रॅकेट मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI या संघटनेतील काही नेते देखील सामील आहेत ज्यांचे चेहरे ती ओळखू शकते…बरं हीच केस नाही तर अशा अनेक केसेस आपल्याला बातम्यांमध्ये दिसून येतात. 

यासाठी केरळ पोलिसांनी शोधकार्य हाती घेतले होते. 

सप्टेंबर २०१२ मध्ये केरळ पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगने राज्यात ऍक्टिव्ह असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती गोळा करण्यासाठी मायक्रो टीमची स्थापना केली.  जून २०१४ मध्ये सायबर सेलचा वापर करत टीमने सोशल मीडियावर वॉच ठेवायला सुरुवात केली. तसेच जे सेक्स रॅकेट मोबाईल नंबर एस्कॉर्ट सर्व्हिस देतात असे नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली.

जुलै २०१५  मध्ये देखील तत्कालीन राज्याचे पोलिस प्रमुख टी. पी. सेनकुमार यांच्या नेतृत्वात ऑनलाइन लैंगिक तस्करीविरुद्ध ऑपरेशन सुरू ठेवले. ऑगस्ट २०१५ मध्ये पोलिसांना कोचू सुंदरिकल नावाच्या  FB पेजबद्दल तक्रार मिळाली. पोलिसांनी ॲडमिनिस्ट्रेटरला ट्रॅक करायला सुरुवात केली.  सप्टेंबर २०१५ दरम्यान पोलिसांनी त्याला ऑपरेशन बिग डॅडी असे नाव दिले. 

१७ सप्टेंबर २०१५ मध्ये कोल्लममधील ऑपरेशनमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा समावेश आहे.  १७ नोव्हेंबर २०१५ मध्ये नेडुम्बसेरी ऑपरेशनमध्ये बंगळुरू मध्ये अल्पवयीन जोडप्यासह १२ जणांना पकडले. १४ जानेवारी २०१६ मध्ये २० वर्षीय जिष्णू विजयनला राजधानीत अटक केली ज्याने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थिनींना आपल्या जाळ्यात अडकवले होते.

त्यानंतर २०१६ च्या इंडिया टुडे च्या एका बातमीनुसार,

तत्कालीन राज्याचे पोलिस प्रमुख टी. पी. सेनकुमार यांनी सांगितले होते कि, केरळमध्ये दर महिन्याला सुमारे ६०० बेपत्ता व्यक्तींची तक्रारी नोंदवल्या जातात. त्यात निम्म्या महिलाच असतात असं पोलीस तपासात उघड झाले आहे. पण त्यातल्या ७ टक्के बेपत्ता महिलांचा शोध लागला नसल्याची माहिती दिली. 

त्यानंतर थेट १२ जानेवारी २०१९ मध्ये कोचीच्या समुद्रकिनाऱ्यावर ४० पेक्षा जास्त व्यक्तींची तस्करी झाल्याचा संशय केरळ पोलिसांना आलेला मात्र त्यानंतर काहीही पाठपुरावा झाला नसल्याच्या बातम्या आल्या.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार,

२०२० मध्ये केरळच्या सायरो-मलबार चर्चच्या फादर थलाचेल्लूर यांनी असा आरोप केलेला कि, केरळमध्ये लव्ह जिहाद चालते. दक्षिणेकडील राज्याच्या ख्रिचन महिलांना इस्लामिक स्टेटच्या जाळ्यात अडकवून त्यांना दहशतवादी ऍक्टिव्हिटीज साठी वापर केला जातो असा या आरोपाचा आशय होता.

केरळ मध्ये या घटना घडतात आणि पोलीस प्रशासन त्याचा गांभीर्याने तपास करत नाहीत, सरकारी तपासात काहीही ठोस आधार सापडत नाही असे आरोप पोलिसांवर होत आलेत. या चर्चच्या आरोपांवर विश्व हिंदू परिषदेने देखील इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर आरोप केले कि त्यांच्याच मार्गदर्शना खाली हे रॅकेट चालते.

केरळमध्ये लव्ह जिहादचे अड्डे आहेत. धर्मांतरित हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचा वापर अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादासाठी केला जात आहे असे आरोप केले होते.   

पण या आरोपांनंतर पीएफआयचे प्रदेश अध्यक्ष नजीरुद्दीन एलामराम यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्या होत्या कि, फॅसिस्ट हिंदुत्ववादातून हे आरोप होत असून त्यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलेलं. 

मात्र विपुल शहा यांच्यावर मात्र आरोप होतायेत कि, त्यांनी काढलेला ‘द केरला स्टोरी देखील ‘द काश्मीर फाईल्स’ सारखाच प्रोपगंडा पिक्चर आहे. पण अजून तर फक्त टिझर आलाय पिक्चर अजून बाकीये त्यामुळे हा पिक्चर आल्यानंतर स्टोरी काय हे कळेलच..

हे हि भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.