इटालियन वंशाच्या आहेत म्हणून या नेत्यांनी सोनिया गांधींचं पंतप्रधानपद असं रोखलं होतं

१५ मे १९९९ चा दिवस होता. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक लावण्यात आली होती. बैठकीत सोनिया गांधी बोलण्यास उभ्या राहिल्या.

आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये त्यांनी एक कागद बाहेर काढला आणि  सोनिया गांधी यांनी तो वाचायला सुरवात केली. 

“माझा जन्म परदेशातला असून, निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास त्याचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल, याचा विचार एकत्रितपणानं करायला हवा. ‘भाजप’नं विदेशी जन्माचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतो आहे. यावर प्रत्येकानं आपलं मत प्रांजळपणानं मांडावं. “

या प्रस्तवावर बोलण्यास सर्वप्रथम उभे राहिले जेष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग.

””तुमचा जन्म परदेशातला असला, तरी तुम्ही लग्नानंतर हा देश स्वीकारला आहे. तुमच्या सासूबाई इंदिरा गांधी आणि पती राजीव यांची निर्घृण हत्या झाल्यानंतरही तुम्ही देश सोडून जाण्याचा विचारही केलेला नाही. देशाला जसं तुम्ही मनोमन स्वीकारलेलं आहे, तसंच देशानंही तुम्हाला मनापासून आपलं मानलेलं आहे. तुम्ही राष्ट्रमाता आहात. देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व तुम्हीच करायला हवं.” असं म्हणत सोनिया गांधी पंतप्रधानपदी उभ्या राहण्यास अगदी योग्य उमेदवार असल्याचं मत अर्जुन सिंग यांनी नोंदवलं.

त्यामुळे आता काँग्रेसच्या परंपरेनुसार गांधी घराण्याच्या विरोधात कोणी जाणार नाही हा बैठकीचा मूड जवळपास सेट होण्याच्याच मार्गावर होता. त्यामुळे त्यानंतर ए. के. अँटनी, गुलाम नबी आझाद, अविका सोनी यांनी अर्जुन सिंग यांच्या भूमिकेला पुष्टी देत आपली निष्ठा गांधी घराण्याशी आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी हेच देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व करण्यास योग्य व्यक्ती असल्याची री ओढली. या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर पी ए संगमा बोलण्यास उभे राहिले.

संगमांची भूमिका आधीच्या भाषणांपैकी वेगळी आणि विरोधात जाणारी होती.

“सोनिया गांधी परकीय आहेत, हा आरोप शंभर टक्के होईल, जन्मानं भारतीय असणाऱ्या असंख्य व्यक्ती पक्षात असताना आपण त्यांचा विचार न करता एका विदेशी व्यक्तीचा विचार करतो, याचा अजिबातच परिणाम होणार नाही, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण आपण या टीकेला कसं उत्तर द्यायचं, याची व्यूहरचना करायलाच हवी. ” असं मत संगमा यांनी मांडली.

पुढे तारिक अन्वर यांनी देखील संगमा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र यानंतर उभ्या राहिलेल्या नेत्यांच्या भूमिकेने सोनिया गांधी यांचं देशाचं नेतृत्व करण्यासाठी सहजासहजी स्वीकारलं जाणार नाही हे फिक्स झालं.

हे नाव होतं शरद पवार.

शरद पवार यांनी देखील संगमा यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवलं. त्यासाठी त्यांनी मुंबईतल्या एका किस्स्याची जोड देउन आपली भूमिका मांडली.

”काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेलो असताना, एका विद्यार्थिनीनं प्रश्न केला होता, “शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ‘काँग्रेस’ला जन्मानं भारतीय असलेला एकही नेता दिसत नाही का?” नव्या पिढीतल्या एका मुलीनं हा प्रश्न करावा, याचा अर्थ हा विषय जनमानसात पोचला होता. तो अग्रभागी राहील. सातत्यानं मांडला जाईल. त्याच्यातून समज-गैरसमज निर्माण होतील”

अनेक काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींच्या परदेशी मुळाला असणारा विरोधी पक्षातून असलेला विरोध लक्षात येत होता मात्र त्याचवेळी स्वपक्षीयातून होणारा विरोधाची मात्र त्यांना कल्पना नव्हती.

हा संपूर्ण किस्सा सांगायचं कारण म्हणजे ऋषी सुनाक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड होणं.

एका भारतीय वंशाच्या माणसाची ब्रिटनच्या अध्यक्षपदी निवड होण्याचा आनंद पूर्ण देशभर व्यक्त केला जात आहे. मात्र त्याचवेळी सोनिया गांधी यांच्या रूपाने एका इटालियन वंशाच्या व्यक्तीला भारताचं पंतप्रधानपद स्विकारण्यास मात्र विरोध करण्यात आला याची आठवण करून दिली जात आहे.

सोनीया गांधींच्या इटालियन वंशाच्या असलेल्या अनेक नेत्यांकडून विरोध केला जात होता त्यामध्ये  पक्षांतर्गत विरोधकही मागे नव्हते. तारिक अन्वर, संगमा आणि शरद पवार यांनी पुढे सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांची भूमिका अधिकच स्पष्ट केली.

”९८ कोटी लोकसंख्या असणाऱ्या आणि शिक्षण, क्षमता ही संपत्ती असणाऱ्या या देशात कुणा भारतीय नागरिकाव्यतिरिक्त अन्य कुणी या देशाचे नेतृत्व करावे, हे पटण्यासारखे नाही ”

असा पुनरुच्चार केला.

सोनिया गांधी यांच्या विरोधात मत नोंदवल्याने या तिघांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. मात्र सोनिया गांधींच्या पंतप्रधान होण्याला विदेशी मुळामुळे असणारा विरोध काही केल्या कमी होण्याचा नाव घेत नव्हता.

१९९९ला  वाजपेयी सरकार एका मताने पडल्यानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालवले जात होते.

मात्र त्याला मोठया प्रमाणात विरोध होत होता. पक्षांतर्गत विरोध थोपवायच्या प्रयत्नात असलेल्या सोनिया गांधी समर्थकांना धक्का बसला तो मुलायम सिंग यादव यांच्या विरोधामुळॆ बसला होता.

मुलायम सिंग यादव यांनी देखील सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाला विरोध दर्शवला.

”जन्माने विदेशी व्यक्तीला पंतप्रधासाठी कदापि पाठिंबा देणार नाही”

अशी भूमिका मुलायम सिंग यादव यांनी घेतली. मुलायम सिंग यांच्या २० खासदारांचा पाठिंबा काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी अत्यावश्यक होता मात्र मुलायम सिंग यांनी विरोध केल्याने ते अवघड झालं होतं त्याला शरद पवार यांच्या बंडामुळे चांगलाच धक्का बसला.

त्यानंतर सोनिया गांधी यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं ते २००४ ला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत.

यूपीएने विजय मिळवला तेव्हा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. ज्याला भाजपने कडाडून विरोध केला होता. यादरम्यान भाजपने सोनिया गांधी विदेशी वंशाच्या असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामध्ये सुषमा स्वराज आघाडीवर होत्या.

यावेळी सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या ,

‘मी संसदेत जाऊन बसले तर मला कोणत्याही परिस्थितीत सोनिया गांधी यांना माननीय पंतप्रधान म्हणून संबोधावे लागेल, जे माझ्यासाठी शक्य नाही. माझा देशाबद्दलच्या स्वाभिमानाला यामुळे ठेच पोहचेल. मला या राष्ट्रीय लज्जेत सहभागी व्हायचे नाही. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यास मी मुंडन करेन, पांढरी साडी नेसेन, जमिनीवर झोपेत आणि कोरडे हरभरेकोरडे हरभरे खाऊन दिवस काढेन.

२००४ मध्ये सोनिया गांधी यांना त्यांच्या विदेशी मुळामुळे पंतप्रधानपदापासून रोखण्यासाठी अजून दोन नावं समोर येतात ती म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती ए पी जी अब्दुल कलाम आणि आपल्या कॉन्स्पिरसी थिअरीजमुळे चर्चेत राहणारे सुब्रमन्यम स्वामी.

स्वामी यांच्या दाव्यानुसार त्यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळामुळे त्यांना देशाचं पंतप्रधान करता येणार नाही, ते देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे अशा आशयाचं पत्र त्यांनी राष्ट्रपती कलाम यांना लिहलं होतं. आणि त्यामुळेच कलाम यांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी मधल्या काळात त्यांनी एका rti इन्क्वायरीचा देखील दाखल दिला होता.

मात्र कलाम यांनी हा दावा खोडून काढला होता. 

” ठरलेल्या वेळी म्हणजेच ८.१५ वाजता, श्रीमती सोनिया गांधी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह राष्ट्रपती भवनात आल्या. या भेटीत त्यांचं स्वागत केल्यानंतर त्यांनी मला विविध पक्षांची पाठिंब्याची पत्रे दाखवली. त्यावर तुम्ही सांगाल त्यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सज्ज आहे असं मी त्यांना म्हणालो. तेव्हा सोनिया गांधी यांनी मला सांगितले की १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि निष्कलंक प्रतिमा असलेले काँग्रेस पक्षाचे विश्वासू नेते डॉ. मनमोहन सिंग यांना त्या पंतप्रधान म्हणून नॉमिनेट करू इच्छितात. हे माझ्यासाठी निश्चितच आश्चर्यकारक होते. यासाठी राष्ट्रपती भवन सचिवालयाला डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती आणि त्यांना लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देणारे पत्र पुन्हा तयार करावे लागले.”

१७ आणि १८ मे २००४ मध्ये पंतप्रधानपदावरून झालेल्या ड्राम्यावर कलाम यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. मात्र शेवटी या सगळ्या गोंधळात आणि विरोधात सोनिया गांधी यांनी ”आपल्या अंतरात्म्याचा” आवाज ऐकत पंतप्रधान स्वीकारण्यास नकार दिल्याचं म्हटलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.