टिप टिप बरसां पाणी.. गाण्याला आज पंचवीस वर्ष पुर्ण झाली.

सगळ्या नव्वदच्या भिडूनों आजचा दिनविशेष काय माहित आहे का? जयंती, पुण्यतिथी नाही म्हणत आम्ही.

आज आहे मोहराचा पंचविसावा वाढदिवस.

सुनील शेट्टी, अक्षय कुमार, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, गुलशन ग्रोव्हर अशी अनेक मोहऱ्यांची मांदियाळी होती. पिक्चर म्हणजे फुल अॅक्शन, कॉमेडी मसाला होता. पण आजही मोहरा म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात या सिनेमामधली गाणी.

परेश रावलचा डबल गॉगल असलेला प…. नी… सा.. प…नी… सां….

तू चीज बडी है मस्त मस्त असो (ओरिजिनल नुसरत फत्ते अली खान) किंवा आपल्या राउडी सुनिल अण्णा शेट्टीला न शोभणाऱ्या नाजूक डान्सवाला आणि पंकज उधासचा मुलायम आवाजवाला ‘ना कजरे की धार’ असो (ओरिजिनल कल्याणजी आनंदजी) या गाण्यांनी रेकॉर्ड मोडून टाकले होते.  मुंज असो किंवा लग्न जिथे जाईल तिथे ही गाणी वाजत होती.

पण एक गाण होतं जे नाईनटीजवाल्या लेकरांना विसरा म्हटल तरी विसरता येत नाही

टीप टीप बरसा पाणी…. 

आता गाण्याचा सिनेमाच्या स्टोरीत हेतू काय होता माहित नाही. धुवांधार पाउस सुरु आहे. त्यात भिजलेली पिवळ्या शिफॉन साडीतली कमनीय मादा आपल्या कोटशर्ट रुपी ठोंब्या नराला पावसात नाचून मिलनासाठी तयार करत असते. पण मादाने काय डान्स केलेला??

अवधूत गुप्तेच्या शब्दात सांगायचं झालं तर फोडलेल.

ती मादा होती रविना टंडन,

खरं तर या सिनेमामध्ये आधी दिव्या भारती असणार होती. पाच दिवस शुटींग देखील झालेलं पण दुर्दैवाने दिव्या भारतीचा मृत्यू झाला, आणि नवीन हिरोईनसाठी शोध सुरु झाला. मिस इंडिया ऐश्वर्या राय वगैरे नी नकार दिल्यावर रविनाला साईन करण्यात आले. बड्या बड्या दिग्गज कलाकार असणाऱ्या फायटिंग वाल्या सिनेमात आपला काय चान्स असणार असेचं तिला वाटत होते. पण तिच्या जवळ दुसरे सिनेमे पण नव्हते. तिने होकार दिला.

पूर्ण पिक्चरमध्ये तिचा रोल काय होता माहित नाही. पण या गाण्यांनी तिला एवढ फेमस केलं की मोहरा मधल्या इतर कोणत्याही हिरो पेक्षा या सिनेमाचा सगळ्यात जास्त फायदा तिला झाला.

रविना अवघी वीस वर्षाची होती. तिला सांगण्यात आलं की एक पावसाच गाण आहे. अंगात 103 डिग्री ताप होता तरी पाच दिवस फिल्मीस्तान स्टुडियो मध्ये त्याच शुटींग करण्यात आलं होतं. सरोज खान नृत्यदिग्दर्शिका होती. कोणालाही माहित नव्हतं की हे गाण पुढ जाऊन एवढा राडा करणार आहे. बाकीच्या गाण्याप्रमाणे एक गाणे म्हणून त्यांनी याच शुटींग केलं.

इरोटिक रेन डान्स हा प्रकार राज कपूर यांच्या जाण्यानंतर कोणी एवढ्या कलात्मक रीतीने हाताळला नव्हतं. रविना एवढा सेक्सी डान्स करत असेल हे ही यापूर्वी कोणाला माहित नव्हतं. असं म्हणतात की त्या काळात या गाण्यातला हिरो अक्षयकुमार आणि रविना टंडन यांच्या खरोखरचा रोमान्स सुरु होता म्हणून हे गाण एवढ भारी झालय.

कारण काही का असेना टीप टीप बरसा पाणीने धुमाकूळ घातला. एवढच काय आज पंचवीस पावसाळयानंतरही २०१९च्या पावसाळ्यात हे गाण तेवढचं सेक्सी वाटते. परवा बातमी आली की हे गाण पुन्हा येतंय.अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या सूर्यवंशी या सिनेमात हे गाण असणार आहे. अक्षय कुमारने एक ट्विट करून याची अधिकृत घोषणा केली.

तो म्हणाला,

“I would’ve definitely been disappointed if any other actor would’ve recreated Tip Tip Barsa Paani, a song which has been synonymous with me & my career.”

पण बिचाऱ्या अक्कीला ट्विटरवरच्या लोकांनी एक कडवा सच सांगितलं,

“सर अत्यंत आदराने आपल्याला आम्ही सांगू इच्छितो की या गाण्यात कोणीही तुम्हाला आठवत नाही. हे गाण फक्त आणि फक्त पिवळ्या साडीतल्या रविना टंडनसाठी पाहिलं जात. “

आमच्या लहानपणी अशी चर्चा होती की हे गाण दादा कोंडके यांच्या ढगाला लागली कळ वरून घेण्यात आलं आहे. आम्हाला काही खरं खोट माहित नाही. पण दोन्ही गाणी तोडीस तोड होती. आता पर्यंत भारतात पावसावरची लाखो गाणी येऊन गेली असतील, अजून ही येत आहेतच पण नव्वदच्या मुलांच्या मनावरचा भार हलका केला ते टीप टीप बरसानेच. असो या गाण्यानं एकच चोख केलं लोकांना प्रेमात हलकं केलच पण प्रेमाचा रंग गुलाबी नाही तर पिवळा पण असू शकतो हे सांगितलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.