ड्रायव्हरने चॅलेंज दिलं, आयुक्तांनी बसचं इंजिन खोलून परत जोडून दाखवलं..

टी.एन. शेषन. अर्थात तिरुनेलै नारायण अइयर शेषन. भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त. निवडणूक आचारसंहिता अगदी काटेकोर पणे राबवणारे देशातील पहिले आयुक्त अशी ओळख. कर्तव्य बजावत असताना राजकीय व्यवस्थेच्या हातातील खेळणे होण्यास नकार देत एकट्याच्या जीवावर, आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत त्यांनी देशात सर्वात मोठ्या राजकीय सुधारणा घडवून आणल्या.

ते पदावर असताना अस म्हणतात की भारतीय राजकारणी केवळ दोन जणांना घाबरत. त्यात पहिला देव आणि दुसरे शेषन. त्यांचे ‘आय इट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट’ हे वाक्य खूप चर्चेत राहिले. त्यामुळे शेषन यांना ‘अल-कायदा’वरून ‘अल-शेषन’ म्हटले जाऊ लागले.

पण निवडणूक आयुक्त ही त्यांनी अगदी शेवटच्या टप्प्यात पार पाडलेली जबाबदारी होती. १९९० ला ते या पदावर आले होते.

त्यापुर्वीच सांगायचे तर शेषन १९५५ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बॅचचे टॉपर. ट्रेनिंग पिरेयड संपवून पहिल्यांदा १९५७ मध्ये कोईमतुरचे जिल्हाधिकारी आर. सी. जोसेफ यांच्या हाताखाली प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले.

आव्हान स्वीकारणे हे गोष्ट ते इथेच शिकले. रुजू झाले त्याच वेळी दुसरी लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीच्या कामात मग्न असताना जोसेफ शेषन यांना म्हणाले होते की, निवडणुकीत काही चुकलं, तर मी तुला जबाबदार धरीन. वरिष्ठांचा हा इशारा गांभीर्याने घेत शेषन यांनी केवळ दीड महिन्यात निवडणूक प्रक्रिया समजून घेतली.

त्यानंतर पुढे उपजिल्हाधिकारी, ग्रामविकास खात्यात सचिव, असा प्रवास करत ते चेन्नईमध्ये परिवहन आयुक्त म्हणून आले.

परिवहन खात्यातील अनुभव सांगताना ते आपल्या चरित्र ‘शेषन- ॲन इंटिमेट’ स्टोरी मध्ये लिहितात,

मी परिवहन आयुक्त म्हणून २ वर्ष केलेले काम हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम पोस्टिंग मानतो. या पोस्टिंग दरम्यान ३ हजार बस आणि ४० हजार कर्मचारी माझ्या नियंत्रणात होते. पण केवळ एवढे कर्मचारी नियंत्रणात होते म्हणून ते हे पोस्टिंग सर्वोत्तम मानतो असे नाही तर इथे आलेले अनुभव खूप काही शिकवून गेले. 

हे सर्व अनुभव त्यांनी या पुस्तकात कथन केले आहेत. आव्हान स्विकारताना ते इथे देखील डगमगले नाहीत.

परिवहन आयुक्त म्हणून काम करत असताना एक दिवस ते वर्कशॉपची पाहणी करायला आले. शेषन यांना एका ड्रायव्हरने विचारले,

ड्रॉयव्हर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुख्य अडचणी तुमच्या नजरेतून काय आहेत?

शेषन यांना या प्रश्नाचे उत्तर देण्यात काहीश्या अडचणी निर्माण झाल्या. पण त्यांनी ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तो ड्रायव्हर शेषन यांना म्हणाला,

जर बसच्या इंजिनमधील तुम्हाला काही समजत नसेल, बस कशी चालवतात याची काहीच माहिती नसेल तर तुम्ही बसच्या आणि आमच्या समस्यांना कास समजून घेणार? आमच्या समस्या तुमच्या पर्यंत पोहचल्याच नाहीत तर आम्हाला न्याय कसा देणार?

शेषन यांना हे शब्द काहीसे लागल्या सारखे झाले. आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलं.

ते आता दिवसातील जास्तीत जास्त वेळ वर्कशॉपमध्ये घालवू लागले. बघत बघत काम शिकून घेतले. यानंतर ते फक्त बस चालवायला शिकलेच नाही तर एक दिवस त्यांनी इंजिनला बस मधून काढून पुन्हा फिट करून दाखवले.

आता वेळ होती दुसऱ्या आव्हानाची. ही देखील त्यांनी लिलया पार पाडली. त्यांनी एक दिवस रस्त्यात मध्येच बस थांबवली. ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि स्वतः स्टेअरिंगचा ताबा घेत प्रवाश्यांनी भरलेली बस जवळपास ८० किलोमीटर चालवत नेली.

असे आव्हानांची आवड असणारे आणि ते स्वीकारायला मागे पुढे न बघणारे शेषन पुढे देखील आव्हानात्मक पदांवर काम करत राहिले. १९६५ मध्ये ते मदुराईचे जिल्हाधिकारी झाले. १९६८ मध्ये अणुऊर्जा विभागात सेक्रेटरी म्हणून मुंबईला आले.

१९७६मध्ये एम.जी. आर मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेषन यांना तमिळनाडूत बोलावले. १९७८ मध्ये शेषन यांनी ओएनजीसीमध्ये काही काळ काम केले.

त्यानंतर ते काही काळ रजेवर गेले. १९८० मध्ये इंदिरा गांधी सत्तारूढ झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अवकाश विभागात काम करायला सुरुवात केली. १९८५ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले. शेषन यांची दिल्लीला बदली झाली. आधी वनखाते, संरक्षण खाते, मंत्रिमंडळाचे सचिव आणि मुख्य निवडणूक आयुक्त अशी त्यांच्या कारकिर्दीची पुढे चढती कमान राहिली.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.