आणि सुपरस्टार झालेल्या माधुरी दीक्षितनं आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ त्या व्यक्तीला दिला…

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे रुपेरी पडद्यावर आगमन राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटातून झाले. हा सिनेमा राजश्रीच्याच १९७२ साली आलेल्या ‘उपहार’चा रिमेक होता. तपस पॉल हा तिचा नायक होता.
माधुरीने अभिनयात करीयर करायचे अजिबात ठरवले नव्हते. विलेपार्लेच्या साठे महाविद्यालयातून तिने मायक्रोबॉयोलॉजीमध्ये पदवी देखील मिळवली होती. पदार्पणातील सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतरचे तिचे चारपाच सिनेमेदेखील अयशस्वी ठरले. आवारा बाप, हिफाजत, उत्तर दक्षिण, मोहरे… अशा अपयशी सिनेमाची रांगच लागली.
गौतम राजाध्यक्ष यांना मात्र माधुरीच्या चेहऱ्यातील, अभिनयातील स्पार्क लक्षात आला होता. या ग्रेसफुल चेहऱ्याला त्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणखी खुलवले. ‘डेबोनेर’ या मासिकाच्या कव्हरवर गौतम यांनी माधुरीची छायाचित्रे प्रसिध्द केली. तिच्या चेहऱ्यातल्या ग्लॅमरला दुनियेसमोर आणले.
यातूनच १९८६ साली तिला एन. चंद्रा यांचा ‘तेजाब’ हा चित्रपट मिळाला. यातील ‘मोहिनी’ची भूमिका ती अक्षरशः जगली. ११ नोव्हेंबर १९८८ दिवाळीच्या मुहूर्तावर ‘तेजाब’ रुपेरी पडद्यावर झळकला. या मोहिनीच्या भूमिकेने तिला खऱ्या अर्थाने ‘स्टारडम’ मिळवून दिले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या ‘एक दो तीन…’ या गाण्यातून माधुरी रसिकांच्या हृदयाची राणी झाली.
रसिक अक्षरशः माधुरीसाठी पागल झाले. या चित्रपटातील हर एक प्रसंग हा आज कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो.
या चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर माधुरी अमेरिकेला तिच्या बहिणीच्या लग्नासाठी गेली. इकडे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. पहिल्या आठवड्यापासूनच या सिनेमाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ‘मोहिनी’,’ मोहिनी’ म्हणत थिएटर मध्ये लोक दौलतजादा करू लागले. खूप वर्षांनंतर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा असा हंगामा पाहायला मिळाला.
त्यावेळी संपर्काची साधने एवढी सहज उपलब्ध नसल्यामुळे माधुरीला अमेरिकेत या चित्रपटाची यशाची फारशी कल्पना आली नाही. तिचा सेक्रेटरी राकेश नाथ उर्फ रिंकू याने एकदा फोन करून सिनेमा हिट झाला आहे एवढे सांगितले, पण माधुरीने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण तिला सिनेमा अयशस्वी होण्याची सवय झाली होती.
सिनेमा एखादा आठवडा चालेल असे तिला वाटले. त्यामुळे ‘तेजाब’कडे फारसे लक्ष दिले नाही. ‘तेजाब’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर माधुरी दीक्षित भारतात परत आली.
भारतात परत आल्यानंतर विमानतळावरच तिला काहीतरी वेगळे जाणवू लागले. टर्मिनल्सवरून येत असताना लोक तिच्याकडे वळून वळून बघत होते आणि आपापसात कुजबुजत होते. तिच्यासाठी हा सारा प्रकार नवीन होता.
विमानतळाच्या बाहेर आल्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसली आणि मुंबईच्या रस्त्यावरून तिची कार धावू लागली. पाहते तर काय रस्त्याच्या बाजूला असलेल्या होर्डिंगवर सगळीकडे तेजाबची पोस्टर्स आणि माधुरी दिक्षित दिसू लागली. तिच्यासाठी हा अनुभव सर्वस्वी वेगळा होता.
पुढे एका सिग्नलला जेव्हा तिची कार थांबली त्यावेळी एक फुले विकणारा पोरगा तिच्याकडे पाहत होता. शेवटी त्याने न राहवून तिच्या कारच्या काचेला ‘टक टक’ केले.
तिने काच खाली केल्यानंतर त्याने विचारले,
“आप माधुरी दीक्षित हो ना ? प्लीज ऑटोग्राफ दिजीये!”असे म्हणत त्याने कागद आणि पेन तिच्याकडे दिला.
माधुरीने आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ हा त्या फुलवाल्याला दिला!
त्या फुलवाल्या पोराने ताज्या फुलांचा गुच्छ तिला दिला! घरी आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचे जंगी स्वागत केले. प्रचंड मोठा जनसमुदाय तिच्या स्वागताला घराबाहेर उपस्थित होता. माधुरीच्या आता लक्षात येवू लागले … ती लोकप्रिय तारका बनली आहे. अ स्टार इस बॉर्न!
हे ही वाच भिडू:
- माधुरी दीक्षितचं शूटिंग होणारं घर शाहरुखने प्रचंड खस्ता खाऊन विकत घेतलं, तेच ते ‘मन्नत.’
- माधुरीची सिरीयल तयार होती पण दूरदर्शनने तिला चांगली दिसत नाही म्हणून रिजेक्ट केलं….
- त्या एका आयडियामुळे माधुरीच्या धकधकची सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटका झाली.