उद्धव ठाकरे म्हणाले होते, “राजकारणाचा कंटाळा येईल तेव्हा फोटोग्राफीसाठी जंगलात जाईन”

प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा असणारे उद्धव ठाकरे वयाच्या ४० व्या वर्षी राजकारणात आले. त्याचं कारण म्हणजे त्यांचं फोटोग्राफीवर असणारे प्रेम. आतापर्यंत त्यांचे पंढरीची वारी, पाहावा विठ्ठल, महाराष्ट्र देशा सारखी फोटोग्राफीवरची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 

उद्धव ठाकरे यांना लहानपणापासून कॅमेराची आवड आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते म्हणाले होते…

“फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. कोणी काहीही म्हटलं तरी मी फोटोग्राफी सोडू शकत नाही”

वाईल्ड लाईफ आणि नेचर फोटोग्राफी हे उद्धव ठाकरे यांचे आवडते विषय आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेकदा उद्धव यांच्या फोटोंचं प्रदर्शन होत असतं. या प्रदर्शनांमधून होणारी कमाई ते शेतकरी आणि गरजवंतांसाठी मदत म्हणून देतात. २००८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या ‘हडसन बे’ मध्ये  शून्य तापमानामध्ये पोलर बिअर आणि कम्बोडियाच्या मंदिराचे फोटो काढले होते.    

राज्यातील सध्याच्या परिस्थितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या महिन्यात शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र त्यांना कधी काळी राजकारणाचा कंटाळा आल्यावर काय करणार? असं विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तरं फार काही सांगून जाणारं आहे. 

ही गोष्ट आहे २००८ मधली. 

एनडीटिव्हीच्या वतीनं एक शो करण्यात आला होता. त्यात ‘नेत्यासोबत २४ तास’ अशी या संकल्पना होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत या शोचा एक एपिसोड करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफी, राजकीय नेतृत्व याबद्दल भाष्य केलं होतं.

२००३ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली २००९ ची विधानसभा निवडणूक लढविण्यात येणार होती. तसंच शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री पदाचा उमदेवार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव घेण्यात येतं होतं. त्यामुळे पक्षात नाराजी असल्याची चर्चा होती. 

यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते, “मी याबद्दल एक शब्दही बोललो नाही. आमच्या इथं खुल्या मनाने गोष्टी होतात आणि पक्षात अनुशासन आहे. बाळासाहेब सुद्धा सांगतात की, अगोदर निवडणुका जिंका आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल याबद्दल विचार करा”. 

नेतृत्वाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात की, “दोन प्रकारचं नेतृत्व असतं. एक ते जे स्वतः समोर येतात. दुसरं म्हणजे तुमचा करिष्मा आम्हाला हवाय म्हणून तुम्ही आम्हाला हवे, असं जेव्हा पक्ष सांगतो. मग यानंतरच वंशवादाचा जन्म होतो. तसंच जनेतला अधिकार आहे कोणाला स्विकारायचं, कोणाला नाकारायचं.” असं ठाकरे म्हणाले होते. 

मात्र त्यानंतर राजकारण, त्यातील भानगडी, वादविवाद या गोष्टींचा कंटाळा आल्यावर काय करणार? असं विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते,

मला ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येईल त्यावेळी कॅमेरा घेऊन जंगलात निघून जाईन. 

उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा त्यांच्या फोटोग्राफीची होते. त्यांनी काढलेला वाघाचा पहिला फोटो मातोश्रीत लावण्यात आला आहे.  

उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या फोटोंचं ‘महाराष्ट्र देशा’ नावानं पुस्तक काढण्यात आलं आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील २७ मोठ्या किल्यांचे एरियल व्ह्यूचे फोटो आहेत. त्यात शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड, विशाल गड, पुरंदर आणि दौलताबाद हे किल्ले आहेत. सोबतच या पुस्तकात राज्यातली प्रमुख मंदिरं आणि हाजी अली दर्गा हे फोटोदेखील आहेत.

एरियल फोटोग्राफी ही अवघड समजली जाते. वेगवेगळ्या अँगलने फोटो काढण्यासाठी हेलिकॉप्टरला  दोन्ही साईडचे दरवाजे नसतात. यासाठी सुरक्षा मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते. हे काम किचकट असतं. त्यामुळे एरियल फोटोग्राफी चॅलेंजींग समजली जात असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. 

 हे ही वाच भिडू  

  

Leave A Reply

Your email address will not be published.