दहावी नापास महिला वर्षाला १२०० शेतकऱ्यांना उद्योग देते.

सातारा जिल्ह्यातील म्हसवड नावाचं गाव. या गावात राहणारी दहावी नापास असलेली एक सामान्य गृहिणी. जिने केवळ संसाराला हातभार लावायचा म्हणून उद्योग थाटण्याचे स्वप्न पाहिले. ते तिने सत्यात उतरवले आणि यावरच न थांबता अनेक महिलांना सोबत घेऊन त्यांचे  संसार प्रकाशात आणले.

ती महिला आहे  माणदेशी फाऊंडेशनच्या फार्म टू मार्केट प्रकल्पाच्या प्रमुख वनिता पिसे. आज जाणून घेऊया वनिता ताईंच्या जिद्दीची कहाणी.

मी वनिता पिसे. माझ शिक्षण दहावी पर्यंतच झाल. संसाराला हातभार लागावा म्हणून  २००३ मध्ये कृषी बचत गटामार्फत एक म्हैस घेण्यासाठी मी कर्ज घेतलं. घरात मालकांचं कापड दुकान होतं पण त्याला फार चांगले दिवस नव्हते. बचत गटातून मिळालेलं १५ हजार रुपयांचं कर्ज मी सहा महिन्यात फेडलं. त्यामुळे आर्थिक स्वावलंबनाचा आत्मविश्वासही आला. यानंतर अनेक महिलांना एकत्र करून कृषी बचत गट स्थापन करायला सुरुवात केली.

त्यावेळी मी सहा महिन्यातच ३५ बचत गट स्थापन करून महिलांना उद्योग उभारण्यासाठी अर्थबळ मिळवून दिले.

हे सुरु असताना मनात धास्ती होती. आपण जे करत आहोत, ते बरोबर आहे ना, अशा शंका मनात येत होत्या.

पण त्यावेळी सकारात्मक विचार केला आणि वाटचाल सुरु ठेवली. या माझ्या निर्णयात मला माझ्या अनेक मैत्रिणी भेटल्या. त्यांनी मला साथ दिली. मी समजावून सांगितलेली गोष्ट लोक ऐकतात. त्यांना ती पटते. त्यांच्या विचारांतही परिवर्तन होत. मग नक्कीच मी ज्या वाटेवर चालतेय, ती बरोबर आहे.

बचत गटाचं काम करत असतानाच पेपर कप तयार करण्याचा विचार माझ्या डोक्यात आला.

त्यावर लगेचच कृती करत मी पेपर कप तयार करण्याचं मशीन घेतलं. ज्या कंपनीकडून हे मशीन घेतलं, त्यांनीच कच्चा माल पुरवण्याचं निश्चित केलं, तसेच तयार मालही ते विकत घेत असत. सहा महिन्यातच त्यांचा उद्योग चांगला सुरू झाला.

मी घेतलेल्या मशीनच गावात अप्रूप होतं. माझा उद्योग पाहून गावातल्या दहा महिला जमल्या. त्यांनीही माझ्यासारखी पेपर कप, द्रोण बनवण्याचं मशीन विकत घेऊन देण्याचा आग्रह केला.

मीसुद्धा त्यांना मशीन घेऊन दिलं. पण ज्या कंपनीने मला कच्चा माल पुरवला, त्यांनी तो पुरवणंच बंद केलं. त्यामुळे माझ्या विश्वासावर उद्योग सुरू केलेल्या महिलांवर मोठं संकट कोसळलं.

मी पुण्याच्या दुकानदारांपर्यंत गेले. कच्चा माल कोण पुरवतो, तयार झालेला माल कोणत्या दर्जाचा असतो, किती किंमतीत मिळतो, या सगळ्याची माहिती एकटीने काढली आणि गावातल्या महिलांचा माल दुकानांपर्यंत नेऊन दिला आणि महिलांचा उद्योग सुरळीत सुरू झाला.

मी माणदेशी फाऊंडेशनच्या फार्म टू मार्केट प्रकल्प सुरु केला. मागील २ वर्षात आम्ही यांनी सातारा परिसरातील १२०० हून अधिक शेतकऱ्यांना याअंतर्गत करार शेती, गट शेती, कमी खर्चात कशी शेती करायची यासंदर्भात प्रशिक्षण दिले असून विविध विदेश कंपन्यांशी शेतकऱ्यांचे करारही घडवून आणले आहेत.

माझं शिक्षण म्हणावं तर १० वी नापास. पण आज मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली एवढंच नाही तर लंडन इथेही मी माझ्या प्रकल्पांची कहाणी सांगायला जाते. त्यावेळी लोकं माझ शिक्षण नाही तर माझी जिद्द बघून टाळ्या वाजवतात याचं समाधान वाटत.

यशाचा मार्ग खडतर असतो. याचे अनुभवही माझ्या आयुष्यात आलेत. मी घेतलेला पुढाकार गावातील काही लोकांना पाहवत नव्हता. त्यामुळे एखाद्याला आपण कामात मागे टाकत नसू तर त्याचे चरित्र हनन करायचे. हेच ठरवून गावातल्या सार्वजनिक शौचालयात कुणीतरी माझे नाव लिहून ठेवले. खूप लज्जास्पद प्रकार होता हा!, पण पती माझ्या पाठीशी उभे राहिले.

‘गावच्या वेशीवर जरी कुणी बोर्ड लावले, तरीही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे’ असे माझे पती म्हणाले.  त्यामुळे मी त्या कठीण प्रसंगाला तोंड देऊ शकले.

२००६ वर्षी एक गम्मतच झाली खर तर. मला दिल्लीवरून पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले. मला वाटल कोणीतरी गंमत करतंय. म्हणून मी रॉंग नंबर म्हणून फोन ठेऊन दिला. पण, नंतर पुन्हा फोन आला आणि मग मला खात्री झाली.

 ‘१८ एप्रिल २००६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजिकेचा पुरस्कार मिळणार असल्याचे जाहीर झाले, तेव्हा विश्वासच बसेना.

१ लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानचिन्हं असा पुरस्कार मिळाला.  त्यावेळी तो पुरस्कार स्वीकारताना थोडे दडपण होते. माझ्या मैत्रिणींच्या, गावकऱ्यांच्या साथीने मी इथवर पोहोचले, त्यांना माझा हा कौतुकसोहळा कोणत्या शब्दात वर्णन करू. हा प्रश्न घेऊन मी गावात आले.

पण गावात येताच माझ्या फोटोचे भले मोठे बॅनर स्वागतासाठी सज्ज होते. नातेवाईक, मित्र मंडळी, सरपंच,आमदार, खासदारांनीही मोठ्या गाजावाजात कौतुक केलं. हा प्रवास असाच सुरु ठेवायचा आणि माझ्या अनेक मैत्रिणीसाठी आणि शेतकरी वर्गासाठी उद्योग निर्माण करायचा हेच आता माझे ध्येय आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.