फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये एका तरुणाने ब्रिटीश गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या.

२२ जुलै १९३२. त्या दिवशी मुंबई इलाख्याचे तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉटसन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट द्यायला आला होते. तेव्हाचे कॉलेजचे प्राचार्य होते रँग्लर जी. ए. महाजनी. ते फिरून हॉटसनला कॉलेज बद्दल माहिती देत होते. त्या काळात वर्ग अम्फीथिएटरमध्ये भरत असे, या सगळ्याच इन्स्पेक्शन झाल्यावर त्यांची स्वारी ग्रन्थालयाकडे वळली.

फर्गुसनच्या सुप्रसिध्द वाडिया ग्रंथालयात खाली पुस्तके पाहिल्यावर गव्हर्नर वरच्या मजल्यावरच्या अभ्यासिकेत आले. बरीच मूले तिथे शांतपणे अभ्यास करत बसली होती. इतक्यात त्यातला एक मुलगा उठला, त्याने आपल्या पुस्तकात लपवलेली पिस्तुल काढली आणि गव्हर्नर हॉटसनवर गोळ्या झाडल्या.

पण त्याचा नेम चुकला आणि गव्हर्नर वाचले. क्षणात त्यांच्या बॉडीगार्डसनी झडप घालून त्या तरुणाला पकडले, त्याची रिव्हॉल्व्हर काढून ताब्यात घेतली. त्या तरुणाच नाव होत वासुदेव बळवंत गोगटे.

ब्रिटीशसत्तेच्या विरोधातील चळवळीचं मुख्य केंद्र पुणं होत. 

पुण्याला क्रांतिकारकांचा मोठा वारसा लाभला आहे. शिवरायांचा वारसा लाभलेल्या या गावात अन्यायी सत्तेच्या विरोधात बंड उभारण्याची परंपरा जुनी आहे. मग ते उमाजी नाईक असोत वासुदेव बळवंत फडके असोत  ब्रिटीशांविरुद्धची पहिली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ इथेच सुरु झाली. पुढे टिळकांच्या प्रेरणेतून चाफेकर, सावरकर असे क्रांतिकारी घडले.

यातच होते वासुदेव गोगटे.

वासुदेव बळवंत गोगटे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायला होते. याचदरम्यान १९३१ मध्ये सोलापुरात केवळ मार्शल लॉ चे उल्लंघन केले म्हणून इंग्रज सरकारने १६ निर्दोष लोकांना फासावर चढवले होते. या घटनेने वासुदेव बळवंत गोगटे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्यांनी या घटनेचा बदला घेण्याचा निश्चय केला.

त्यांनी हैद्राबादला जाऊन आपल्या भावाच्या मदतीने बंदुक आणि काडतुसे पैदा केली. जंगलात अनेक दिवस सराव केला. त्यांच्या डोक्यात एकच लक्ष्य होते, मुंबईच्या गव्हर्नरचा खात्मा करायचा. हॉटसनला मारण्यासाठी त्यांनी याआधी देखील अनेक प्रयत्न केले होते. मुंबई विधानभवनाच्या उद्घाटनावेळी ते अगदी जवळ पोहचले होते पण तेव्हा योग जुळून आला नव्हता.

पण गोगटेना ठाऊक नव्हते त्यांची शिकार स्वताहून चालत त्यांच्या कॉलेजमध्ये येणार आहे ते. त्यादिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आल्यावर त्यांना गेटवरचं गोरे सैनिक दिसले. चौकशी केल्यावर कळले की गव्हर्नर हॉटसन कॉलेजभेटीला येतोय. आनंद अतिरेकाने उड्या मारत गोगटे घरी गेले, आपली बंदूक पुस्तकात लपवून आणली. त्यांना ठाऊक होत की पुस्तकांची आवड असणारा हॉटसन हमखास लायब्ररीमध्ये येणार.

पण त्या दिवशी त्यांचा वार फेल गेला. त्यांनी दोन गोळ्या झाडल्या पण हॉटसन सहीसलामत वाचला. पण  त्याला या तरुणाच धाडस बघून मोठा धक्का बसला होता. पोलिसांनी पकडल्यावर हॉटसनने गोगटेना विचारले देखील की

“तुला मलाचं का मारायच होतं?”

तेव्हा प्रखर देशाभिमानी वासुदेव गोगटे म्हणाले,

“माझ तुमच्याशी वैयक्तिक वैर नाही. पण तुमच्या सरकारने सोलापुरात माझ्या देशबांधवांवर केलेला अन्यायाला उत्तर म्हणून मी हा हल्ला केला.”

पुढे गोगटे यांना अटक होऊन सात वर्षे कारावासाची शिक्षा झाली. असं म्हणतात की गव्हर्नर हॉटसनने त्यांना शिक्षणाची स्कॉलरशिप म्हणून शंभर रुपये बक्षीस दिले होते. पण गोगटे यांनी ते नाकारले.

१९३७ मध्ये त्यांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर त्यांनी लॉ मध्ये डिग्री मिळवली आणि वकिली सुरू केली. स्वातंत्र्य चळवळीतील योगदानानंतर गोगटे यांनी सामाजिक क्षेत्रात ही महत्वाचे कार्य केले. ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य राहून पुढे महापौर झाले होते. शिवाय त्यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पद देखील सांभाळले होते. १९४८ मध्ये झालेल्या गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. २४ नोव्हेंबर १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.

आजही फर्ग्युसन कॉलेजच्या त्या लायब्ररीमध्ये अभ्यासिकेत वासुदेव गोगटे यांच्या त्या हल्ल्याच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. गेली अनेक वर्षे तिथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवणी राष्ट्रप्रेमाच्या भावना जागृत करण्याचं काम करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.