हाफिज सईदची मुलाखत असो वा त्यांची पीएचडी असो…ते संसदेपर्यंत गाजणारे पत्रकार होते

ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक…आपल्यात राहिले नाहीत….

वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यानं वैदिक यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेतल्यानंतर वेद प्रताप वैदिक चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांच्या मुलाखतीची खूप चर्चा झाली होती. चर्चा म्हणण्यापेक्षा वादच म्हणा..इतक्या टोकाचा कि, त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होऊ लागले.   

नेमकी ती घटना काय होती ?

२०१४ मध्ये वैदिक पाकिस्तानला गेले होते. तिथे जाऊन त्यांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेतली होती. यानंतर ते भारतात परत आले तेव्हा ते म्हणाले होते, ‘हाफिज सईदने मला सांगितले की, पंतप्रधान मोदी पाकिस्तानात गेल्यास तेथे त्यांचे स्वागत केले जाणार नाही.’ इतकंच नाही तर पाकिस्तानात एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैदिक म्हणाले होते की, भारत आणि पाकिस्तानची इच्छा असेल तर काश्मीर स्वतंत्र होऊ शकतो. त्यांच्या वक्तव्याने अर्थातच भारतात ते टीकेचे धनी झाले.  

दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेणारे ते पहिले भारतीय पत्रकार होते. 

हाफिज सईदसोबत घेतलेली भेट आणि त्याच्या मुलाखतीमुळे भारतीय वैदिक यांच्यावर चिडले. ती मुलाखत राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशभरात गाजली होती. त्यांच्या अटकेची मागणी देशभरात जोर धरू लागली. हे प्रकरण इतकं पेटलं कि, २०१४ मध्ये हे प्रकरण संसदेत मांडण्यात आलं. त्यांच्यावर त्यावेळी दोन खासदारांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या वैदिक यांनी संसदेतल्या लोकांना तोंड तर दिलंच शिवाय याचदरम्यान त्यांनी संताप व्यक्त एक वादग्रस्त विधान केले होते.

“या प्रकरणात मला केवळ दोन खासदारांनीच नाही, तर संपूर्ण ५४३ खासदारांनी एकमताने ठराव करुन मला फाशी द्यावी. मी अशा संसदेवर थुंकतो” 

झालं या वाद शांत व्हायचं सोडून आणखी वाढला. कालांतराने हा वाद शांत झाला. पण वेदप्रताप वैदिक यांच्याबाबत संसदेत चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

मात्र याला हाफिज सईदची मुलाखत कारणीभूत नव्हती तर त्याही आधी मोठा किस्सा घडला होता. त्यांच्या पीएचडीचा. होय त्यांच्या पीएचडीचं सबमिशन थेट संसदेत गाजलं होतं. 

१९६५-६७ मधली गोष्ट आहे. त्यावेळी डॉ. वैदिक जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय राजकारणात पीएचडी करत होते डॉ. वैदिक यांच्या वेबसाईटनुसार त्यांनी त्यांचा पीएचडी प्रबंध हिंदीत लिहिला होता. ते सादर करण्यासाठी जेंव्हा ते प्राध्यापकांकडे गेले तेंव्हा त्यांनी त्यांच्या हिंदी भाषेत लिहिलेल्या प्रबंधाला मंजुरी देण्यास नकार दिला. 

जोपर्यंत प्रबंध इंग्रजीत लिहिला जात नाही तोपर्यंत तो सादर केला जाणार नाही अशी प्राध्यापकांनी आत घातली.. पण डॉ.वैदिक स्वभावाने जिद्दी होते. त्यांनी आग्रह धरला. त्यांनी प्राध्यापक जिद्दीला पेटले. 

हिंदीत प्रबंध सादर करण्याची त्यांची जिद्द देशाचा मोठा प्रश्न बनला होता. त्यांच्या या जिद्दीमुळे डॉ.वैदिक हे हिंदी संघर्षाचे राष्ट्रीय प्रतीक बनले होते. 

डॉ.वैदिक आपल्या आग्रहावर ठाम राहिले, त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या प्रकरणाने पेट घेतला आणि तो राष्ट्रीय मुद्दा बनला. 

आचार्य कृपलानी, डॉ.राममनोहर लोहिया, मधु लिमये, गुरू गोळवलकर, अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, चंद्रशेखर आदी राजकारण्यांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिली. रामधारी सिंह दिनकर, डॉ. धरमवीर भारती, डॉ. हरिवंशराय बच्चन यांसारखे लेखकही वैदिक यांच्या समर्थनार्थ पुढे आले आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही डॉ. वैदिक यांना पाठिंबा दिला. 

अखेर त्यांच्या आग्रहापुढे विद्यापीठ प्रशासनाला नमते घ्यावेच लागले आणि हिंदीतून प्रबंध सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. इंग्रजीशिवाय अन्य भाषेतील शोधनिबंध स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती.

त्यांच्याबद्दल थोडक्यात ओळख करून द्यायची तर, वेद प्रताप वैदिक यांचा जन्म ३० डिसेंबर १९४४ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला होता. त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय राजकारणात पीएचडी केली. ते चार वर्षे दिल्लीत राज्यशास्त्राचं शिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांना तत्त्वज्ञान आणि राजकारणातही खूप रस होता. त्यांची परखड पत्रकारिता आजच्या पत्रकारांसाठी आदर्श ठरेल अशीच होती हे त्यांच्या कारकिर्दीवरून लक्षात येते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.