मुंबईचा मुख्यमंत्री गुजराती, पारसी कि मराठी? पटेलांनी दिला होता हा निर्णय

वीर नरिमन पॉईंट. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह नेकलेसवरचा झळाळणारा कोहिनुर हिरा. भारतातील सर्वात महागडा व पॉश एरिया कोणता असं विचारलं तर निश्चितच नरिमन पॉईंट म्हणून आपण उत्तर देऊ. ओबेरॉय हॉटेल, एअर इंडिया पासून अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे ऑफिस इथे आहेत. जगातील सर्वाधिक किंमत इथल्या जागेला आहे असं मानलं जातं.

पण हा नरिमन पॉईंट कोणाच्या नावावरून आहे  माहितीय ?

खुर्शेद फ्रामजी नरिमन उर्फ वीर नरिमन.

नरिमन म्हणजे मुंबईच्या काँग्रेसचे एक वजनदार नेते होते. उच्च्भ्रू पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बीए एलएलबी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं. स्वातंत्र्यलढ्याचा काळ सुरु होता. नरिमन यांनी देखील यात उडी घेतली. अगदी तरुण वयात मुंबईच्या नगरपालिकेत ते नगरसेवक बनले.

एक धडाडीचा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईच्या इंग्रज सरकारचा बॅक बे रेक्लेमेशन नावाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरु होता. समुद्रात भर घालून जागा डेव्हलप केली जात होती. जॉर्ज बुकानन नावाचा सुप्रसिद्ध इंजिनियर यासाठी नेमला होता. मात्र हे काम पूर्णत्वास जाई पर्यंत ठरलेल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने खर्च झाला.

हा जॉर्ज बुकानन याने केलेला घोटाळा आहे असा आरोप नरिमन यांनी केला.

त्यांनी हि गोष्ट महानगरपालिकेत उचलून धरली. इंग्लंडपर्यंत याचे पडसाद उमटले. घोटाळेबाज इंजिनीयरची बदली करण्यात आली. इंग्रज सरकारची नाचक्की झाली आणि नरिमन यांची लोकप्रियता मुंबईमध्ये गगनाला भिडली.

मुंबई तेव्हा गुजरात सिंध महाराष्ट्र या भल्या मोठ्या प्रांताची राजधानी होती. सरदार पटेल काँग्रेसचे आणि पर्यायाने या भागाचं नेतृत्व करत होते. नरिमन हा तरुण कार्यकर्ता त्यांच्या नजरेत भरला. त्यांना मुंबई शहर काँग्रेसचा अध्यक्ष करण्यात आलं.

नरिमन यांनी मुंबईत तीसच्या दशकात सविनय कायदेभंगाची चळवळ यशस्वी करून दाखवली. त्यांचं देशभर नाव झालं. खुद्द महात्मा गांधी यांनी त्यांचं कौतुक केलं.

नरिमन यांचं मुंबईतील वजन प्रचंड वाढलं. त्यांची पुढे तिथल्या महापौर पदी निवड झाली. त्यांच्याच काळात बॅक बे रेक्लेमशनच काम पुढं नेण्यात आलं व त्यातून जो भाग डेव्हलप झाला त्याला आज नरिमन पॉईंट म्हणून ओळखतो.

१९३५च्या कायद्यानुसार इंग्रजांनी प्रांतातील सत्ता भारतीयांच्या हातात द्यायचं ठरवलं. ३७ साली मुंबई प्रांतीय निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसने बहुमत मिळवलं होतं पण त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला. कूपर पार्टीच्या धनजी शॉ कूपर यांचे अंतरिम सरकार स्थापन करून त्यांना तात्पुरते पंतप्रधान बनवण्यात आले.

आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ते मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनले.

धनजी शॉ कूपर हे सातारा भागातील श्रीमंत पारशी उद्योगपती होते. त्यांना फार काळ राज्य करता आले नाही. सहा महिन्यात काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला व कूपर यांना अंतरिम सरकारचा राजीनामा द्यावा लागला.

काँग्रेसपुढे प्रश्न होता की मुख्यमंत्री कोणाला केले जावे. सरदार पटेल या भागाचे नेते असल्यामुळे गांधीजींनी नेता निवडीचे अधिकार त्यांच्याकडे दिले होते. गुजराती आणि मराठी दोन्ही जनतेचे एकमत होईल असा नेता निवडावा लागणार होता.

सर्वाना वाटत होते कि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून वीर नरिमन यांची निवड होईल. त्यांचं घराणं मूळ गुजरातशी नातं सांगणारं होतं, त्यांची मुंबईत लोकप्रियता प्रचंड होती, धनाढ्य व्यापारी लॉबी त्यांच्या पाठीशी होती. त्यांनी काम चांगले केले होते. पण ऐनवेळी सरदार पटेलांनी त्यांना डावलून अनपेक्षितपणे बाळासाहेब खेर यांचे नाव पुढे केले. नरिमन यांना धक्काच बसला. 

सरदार पटेलांनी ही निवड करण्यामागे एक खास कारण होते. नरिमन यांनी निवडणुकीच्या वेळी कन्हैयालाल मुन्शी या काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध कावसजी जहांगीर या पारसी नेत्याला मदत केली होती. कन्हैयालाल मुन्शी यांचा पराभव झाला होता. मुंबईत झालेला हा काँग्रेसचा एकमेव पराभव सरदार पटेलांनी मनाला लावून घेतला. नरिमन यांनी केलेला जातीयवाद त्यांच्या अंगाशी आला.

बाळासाहेब खेर मुंबई प्रांताचे पहिले अधिकृत मुख्यमंत्री बनले.

नरिमन यांनी आपल्याविरुद्ध अन्याय झाला अशी ओरड सुरु केली. सरदार पटेलांनी नरिमन हे पारशी आहेत म्हणून त्यांना डावलून हिंदू मुख्यमंत्री केला अशी वावडी त्यांनी उठवून दिली. त्याकाळचे मुंबईतील सर्व मोठे वर्तमानपत्र त्यांच्या इशाऱ्यावर चालत असल्यामुळे पटेलांच्याविरुद्ध रकाने भरून बातम्या सुरु झाल्या.

तेव्हा नरिमन यांनी नेहरूंना पत्र लिहून आपल्याला वगळण्यात आल्याची तक्रार त्यांच्यापर्यंत नेली.

नेहरूंनी त्यांना आपली बाजू कार्यकारिणीसमोर मांडायला सुचवले. पण तिथे बोलताना नरिमनच प्रत्येक प्रश्नावर निरुत्तर झालेले दिसले. त्यांनी ज्या नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे असं सांगितलं होत त्या शंकरराव देव व इतरांनी पत्रक काढून नरिमन यांनी केलेल्या आरोपात आमचा सहभाग नाही असे जाहीर केले.

त्याही स्थितीत त्यांनी एकवार नेहरूंकडे धाव घेतली.

या वेळी संतापलेल्या नेहरूंनी त्यांना ‘तुमच्यावर कोणीही अन्याय केला नाही’ हे स्पष्टपणे तर सांगितलेच; वर ‘यावरही आपल्यावर अन्याय झाला असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कोणत्याही न्यायालयापर्यंतअगदी थेट लीग ऑफ नेशन्सपर्यंत जाऊ शकता’ असे सुनावले.

तेवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. नरिमन गांधीजींकडे गेले. गांधींनी या प्रकरणाची चौकशी करायला बहादूरजी यांची समिती नेमली. पुढे या समितीनेही नरिमन यांच्यावर कोणताही अन्याय झाला नसल्याचा निर्वाळा दिला व हे प्रकरण मिटले.

नरिमन यांना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे त्यांनी सुभाष बाबू यांच्या फॉरवर्ड ब्लॉकमध्ये प्रवेश केला पण पुन्हा राजकारणात त्यांना जम बसवता आला नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर एका वर्षातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांनी काँग्रेस सोडली होती पण सरकारने त्यांच्याबद्दल कोणताही आकस ठेवला नाही. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा सन्मान म्हणून दक्षिण मुंबईत ते राहत होते त्या रस्त्याला नरिमन रोड हे नाव देण्यात आले तर मुंबईचे आर्थिक सेंटर म्हणून जगभरात ओळखले जाणारे वीर नरिमन पॉईंट तर त्यांचे नाव अजरामर करून ठेवले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.