आजच्याच दिवशी भारताने डॉ. माशेलकरांच्या नेतृत्वात अमेरिकेसोबतचं हळदीचं युद्ध जिंकलं होतं

पळता पळता काही लागलं तर आईकडून वापरलं जाणारं एकमेव अस्त्र म्हणजे हळद. कितीही लागलं असेल तर हळदीचा उतारा रामबाण उपाय असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हळदीची ओळख एखाद्या जखमेमुळेच झाली असावी. त्यानंतर कुणाच्या घरात ती मटणाच्या अळणीतून आली तर कुणाच्या घरी ती वरणातून आली. आजारी पडल्यानंतर दुधासोबत देखील हळदच आली. इतकच काय तर जेव्हा जोडीदार निवडायची वेळ आली तेव्हा हिच हळद कांदे पोह्यातून आली आणि नवरा नवरीच्या गालावर अलगद जावून बसली. 

पण अशी आपल्या हक्काची हळद आपली नव्हती ! ती होती अमेरिकेची !!! 

हळदीची निर्मिती हा शोध असू शकतो हे भारतीयांच्या ध्यानीमनी नव्हतं तेव्हाच अमेरिकेनं हळदीचं पेटंट आपल्या नावावर केलं होतं. हजारों वर्षांपासून भारतीय संस्कृतीशी एकरुप असणाऱ्या हळदीचे अधिकार हे आपल्याकडे नाहीत हे रघुनाथ माशेलकरांच्या लक्षात आलं. त्यांनी अमेरिकेविरोधात लढा दिला. 

ते युद्ध माशेलकर जिंकले व हळद पुर्णपणे भारतीयांच्या हक्कांची झाली. या घटनेनंतर इतिहासातील प्रसिद्ध हल्दीघाटच्या लढाईवरून माध्यमांनी अमेरीकेविरोधातील ही लढाई जिंकणाऱ्या माशेलकरांचं वर्णन ‘हल्दीघाटीचा योद्धा’ असं केलं होतं. 

साल होतं १९९६.

भारतातील काही संशोधकांचा चमू आयुर्वेदावर संशोधन करत होता. संशोधन करता करता काही संदर्भ शोधताना या गटाच्या लक्षात आलेल्या एका गोष्टीने या गटाला आश्चर्याचा धक्काच बसला होता.

झालं असं होतं की अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठातील वैद्यकशास्त्र केंद्रात संशोधनाचं काम करणाऱ्या सुमन दास आणि हरिहर कोहली या भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी साधारणतः वर्षभरापूर्वी म्हणजे मार्च १९९५ साली हळदीच्या औषधी गुणधर्माच्या संशोधनाचा दावा करून अमेरिकेसाठी ते पेटंट मिळवलं होतं.

पेटंट अधिकाऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या शास्त्रज्ञांनी हे पेटंट अमेरिकेला मिळवून दिलं होतं. याचा अर्थ असा होता की त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही हळदीच्या औषधी वापर करता येणार नव्हता. कुणाला जर तसा वापर करायचा असेल तर रॉयल्टी म्हणून मोठा पैसा त्यांना द्यावा लागणार होता.

खरं तर हळद हे गुणकारी आहे हे आपल्याला कितीतरी वर्षापासूनच माहित होतं.

कुठल्याही जखमेवर हळद लावली की त्याचा फरक पडतो आणि जखम बरी व्हायला मदत होते, ही आपल्याकडे पूर्वापारपासून चालत आलेली शिकवण. पण हा एक शोध असू शकतो हे आपल्या कधी गावीच नव्हतं.

अमेरिकेने हळदीचं पेटंट मिळवल्याच ज्यावेळी भारतीय शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं त्यावेळी रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शास्त्रज्ञांच्या एका मोठ्या टीमने याविरोधात न्यायालयीन लढाई लढली आणि भारताचा हळदीवरचा दावा सादर केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ या टीमने आयुर्वेदातील अनेक पुरावे सादर केले.

शास्त्रज्ञांच्या साधारणतः १५ महिन्यांच्या लढाईला यश आलं आणि २३ ऑगस्ट १९९७ रोजी अमेरिकेतील पेटंट कार्यालयाने आपली चूक झाल्याचं मान्य करत आधी अमेरिकेला देण्यात आलेलं पेटंट रद्द केलं. भारतासाठी हा मोठाच विजय होता. भारताच्या या विजयाचे हिरो होते रघुनाथ माशेलकर.

Leave A Reply

Your email address will not be published.