मुंबईत राष्ट्रवादीकडून महापालिका लढविणारे शिवतारे गावाकडे येऊन सेनेचे आमदार बनले…

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे सध्या हृदयविकाराच्या उपचारासाठी ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यानंतर त्यांची मुलगी ममता शिवदिप लांडे-शिवतारे यांनी काल सकाळी वडिलांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात संपत्तीसाठी दोन्ही भाऊ वडिलांचा छळ करत असल्याचा केला आहे. या पोस्टमध्ये ममता म्हणाल्या,

‘माझ्या पित्याची माझ्याच भावानं संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून मी अत्यंत अस्वस्थ आहे,’

ममता यांनी भावावर केलेल्या आरोपा नंतर विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी त्यांच्या मुलांवर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच विजय शिवतारे हे गेल्या २७ वर्षापासून कुटुंबापासून वेगळे राहत असल्याचा आरोप केला होता. मात्र या सगळ्या आरोप – प्रत्यारोपांमुळे शिवतारे कुटुंबातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे आणि त्या वादानं माध्यमांमध्ये जागा देखील मिळवली आहे.

आता एकदा एखादी गोष्ट सार्वजनिक झाली की लोक त्याबद्दल आणखी शोधायला सुरुवात करतात, जे की सहाजिक असतं. इथं देखील तसचं काहीसं झालं.

शिवतारे कुटुंबीयांमधील वाद सार्वजनिक झाल्यावर लोकांनी कोण हे विजय शिवतारे सर्च करायला सुरुवात केली, सोबतचं ते कुठले, त्यांची राजकीय कारकिर्द कशी आहे? आणि मुख्य म्हणजे ज्या संपत्तीवरुन त्यांच्यात वाद सुरु आहेत ती नेमकी किती? अशा अनेक गोष्टींबद्दल लोक विचारु लागले.

त्या पार्श्वभुमीवर याच सगळ्या प्रश्नांचा ‘बोल भिडू’ने घेतलेला आढावा…

खरतर जनता दलाच्या भूमीत शिवसेनेचे रोपटे लावणे सोप नव्हते. मात्र विजय शिवतारे यांनी हे आव्हान स्विकारलं आणि पुरंदर तालुक्यातील वाड्या वस्तीत जाऊन सेनेच्या शाखा सुरु केल्या आणि त्यातुनच आपल्या राजकीय कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली, यातुनच त्यांनी २००९ मध्ये निवडून येत विधानसभा गाठली. पुढे राज्यमंत्री देखील झाले. पण शिवतारे यांची ही सुरुवात होण्याआधीचा बराच भुतकाळ जाणून घेण्यासारखा आहे.

शिवतारेंच्या घरची परिस्थिती साधारणचं होती. १० वी नंतर काही तरी करायचे होते. मात्र गावात राहिलो तर मोठी संधी मिळणार नाही असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी १९७६ – १९७७ च्या दरम्यान थेट मुंबई गाठली. मुंबईत राहून मिळेल ते काम करण्याची तयारी होती. यात मग अगदी त्यांनी दुकानात, गाड्यावर काम केले. सोबतचं त्यांनी दुध, मासळीचा व्यवसाय सुद्धा सुरु केला.

हेच सगळं करत असताना विजय शिवतारे यांनी १२ वी आणि पुढे सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र या सगळ्यानंतर देखील त्यांना खरे यश मिळाले ते बांधकाम व्यवसायातून. बांधकाम व्यवसायात स्थिरावल्या नंतर देखील विजय शिवतारे यांना लहानपणी राजकारणाबद्दल वाटणारे आकर्षण कमी झाले नव्हते. त्यामुळे २००० च्या आसपास शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

नवी मुंबईत राष्ट्रवादीकडून महापालिकेसाठी संधी

काही वर्ष काम केल्या नंतर त्यांना राष्ट्रवादीकडून नवी मुंबई महापालिका निवडणुकीत २ वेळा संधी देण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांना यश आले नाही. मात्र पराभावानंतर स्वस्थ बसेल तो नेता कसा?

शिवतारे देखील स्वस्थ बसले नाहीत. इतर सर्व शक्यता पडताळून पाहत होते. यातुनच मुंबईतील एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने शिवतरे यांना मूळगावी म्हणजे पुरंदरला जाऊन काम करण्याचा सल्ला दिला, कारण गावात काम करण्यासाठी चान्स आणि जागा जास्त होती.

याच नेत्याच्या सल्ल्यानुसार शिवतारे २००८ साली पुरंदरला परतले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून काम करून लागले.

पुरंदरला आल्या पासून त्यांची जनमानसात ओळख निर्माण झाली होती. विजय शिवतारे यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह मेळावा भरवण्यात आला होता. या सामुदायिक विवाह सोहळ्याची मोठ्या प्रमाणांत चर्चा होती. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता.

यात विजय शिवतारे यांनी स्वतःचां मुलगा विनयसह १४२ जोडप्याचा शाही विवाह सोहळा घडविला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी लग्नासाठी कर्ज काढू नये आणि वसुलीसाठी त्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून शिवतारे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत विवाह सोहळ्यास सुरुवात केली होती. ती आता पर्यंत टिकून आहे. आपल्या मुलाचा विवाह सामुदायिक सोहळ्यात लावून दिल्याने त्यांच्याकडे पाहून सर्वचजण कौतुक करत.

या एका उपक्रमामुळे विजय शिवतारे यांना पुरंदर तालुक्यातील घर घरात पोहचण्याची संधी मिळाली होती. मात्र यामुळेच राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र अस्वस्थ व्हायला लागले. कारण येवून जेमतेम एका वर्षातचं शिवतारे यांनी नाव करायला सुरुवात केली होती. त्यामुळेच त्यांच्या काही गोष्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांना खटकायला लागल्या.

अशातच २००९ ची विधानसभा निवडणूक ही जवळ येवून ठेपली होती.

विजय शिवतारे यांची आमदार बनण्याची मनीषा लपून राहिली नव्हती. जर विजय शिवतारे यांना अशीच प्रसिद्धी मिळत राहिली पुरंदर मधून तेच दावेदार ठरतील अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करत होते. कार्यकर्त्यांच्या याच रोषामुळे राष्ट्रवादी आणि शिवतारे यांच्यात अंतर पडत गेले आणि निवडणूकीआधी त्यांनी घड्याळ काढले.

पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादा घाटे याबाबत ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

याच सगळ्या रोषामुळे विधानसभा निवडणुकीला केवळ १८ महिने बाकी असताना विजय शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुरंदर भाग पिंजून काढला. वाड्या वस्त्यांध्ये मध्ये जाऊन शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. सामुदायिक विवाह सोहळ्यात निमित्ताने ते सर्वांना पर्यंत पोहचले होतेच.

पहिल्याच प्रयत्नात यश

२००४ ला पुरंदर मधून राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे निवडून आले होते. विजय शिवतरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरचे विद्यमान आमदार अशोक टेकवडे यांना राष्ट्रवादी कडून पुन्हा एकदा संधी मिळणार फिक्स होते.

मात्र एनवेवेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुणे जिल्ह्यातून एका तरी मतदार संघात ओबीसी उमेदवाराला तिकीट द्यावे अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे विद्यमान विद्यमान आमदार अशोक टेकवडे यांना डावलून राष्ट्रवादीने दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी दिली. मात्र याच राजकारणामुळे पुरंदर मध्ये राष्ट्रवादी दोन गट पडले.

शिवतारेंचा राजकीय प्रवास जवळून पाहिलेले स्थानिक पत्रकार सांगतात,

राष्ट्रवादीत पडलेले २ गट तर पडले होतेच. यातील एका गटाने दुर्गाडे यांची अजिबात मदत करणार नसल्याची भुमिका घेतली. त्यातच काँग्रेसचे संजय जगताप हे बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले. या दोन्ही उमेदवारांच्या भुमिकेचा थेट फायदा झाला तो विजय शिवतारे यांना.

पहिल्याच प्रयत्नात शिवतारे यांनी विजय खेचून आणला होता. एकेकाळचा जनता दलाचा बाल्लेकीला असलेला पुरंदर मतदार संघ शिवसेनाचा गड झाला. शिवतारे यांनी पहिल्या आमदारकीच्या टर्म मध्ये जोमाने काम केले.

दादा घाटे ‘बोल भिडू’ला सांगतात की, शिवतारे यांनी मतदारसंघातील लोकांना एक विश्वास मागच्या १० वर्षात काय दिला होता. तो म्हणजे,

गायीच्या गोट्यात जन्म घेतलेला विजय शिवतारे दुष्काळात जन्माला, दुष्काळात मरणार नाही आणि कोणालाही मरू देणार आहे.

थोडक्यात ते यातुन विकासकामांबद्दल आणि मतदारसंघातील पाण्याबद्दल बोलायचे. कारण पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे विजय शिवतारे यांनी आमदार झाल्यानंतर या भागात पाण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. यात गुंजवणी प्रकल्प, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण, कॅनेल मधून शेतकऱ्यांना पाणी आदी योजना त्यांनी आपल्या मतदार संघात आणल्या.

आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून शिवतारे यांना मतदारांनी पुन्हा एकदा निवडून दिले. त्यानंतर पुढे राज्यात युतीचे सरकार आले आणि शिवतारे यांच्या गळ्यात जलसंपदा राज्यमंत्री पदाची माळ पडली. मातोश्रीवर देखील त्यांचे वजन वाढले होते.

पुढे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे पुरंदर मतदार संघातून हॅट्रिक मारतील असा विश्वास अनेकांना होता. मात्र त्यापूर्वी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि विषेशतः पवार कुटुंबीयांच्या विरोधात केलेला प्रचार त्यांना नडला.

यातुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती येथे विजय शिवतरे यंदा आमदार कसा होतो ते मी पहातोच. असा इशारा लोकसभा निवडणुकीत दिला होता आणि तो खरा ठरला. त्यावर्षी काँग्रेसच्या संजय जगताप यांनी ३० हजार मतांनी त्यांचा पराभव केला.

विजय शिवतारे यांची संपत्ती किती?

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विजय शिवतरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकी वेळी अर्जात भरलेल्या माहितीनुसार.

त्यांच्या नावावर रोख, विविध बँकांमधील ठेवी, LIC आणि इतर बॉन्डमधील अशी सगळी जंगम मालमत्ता मिळून ७ कोटी ४९ लाख ८५ हजार इतकी आहे. तर एकूण जमीन जुमला, गावाकडील, मुंबईतील घरे अशी स्थावर मालमत्ता ५० कोटी ३८ लाख रुपयांची आहे.

विजय शिवतारे यांचे उत्तरदायित्व म्हणजेच लायबिलिटी ५ कोटी ५० लाख इतकी आहे. आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये त्यांनी २३ लाख ७६ हजार ३५१ रुपये इतका इन्कम टॅक्स परतावा दाखल केला आहे. तर ६ लाख ९५ हजार ५३२ इतकी रोख रक्कम यांच्याकडे होती. सोबतच ११ लाख ७१ हजार रुपये पुरंदर आणि मुंबईतील बँकेत आणि इतर वित्तीय संस्थामध्ये जमा आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.