पोरगा मुख्यमंत्री होता पण बापाने कधी वर्षा बंगल्यावर पाऊल ठेवले नाही.

विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हाची गोष्ट. त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख एकदा अचानक आजारी पडले. त्यांना मुंबईला हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आलं.

एक मोठ्ठ ऑपरेशन होणार होतं. कायम वडिलाना वज्राप्रमाणे कठोर उभे असलेले पाहणारे विलासराव त्यांची ती अवस्था बघून अस्वस्थ झाले होते. त्यातूनही दगडोजीराव म्हणाले,

“विलासराव, राज्य तुम्हाला सांभाळायचे आहे. इथे बसून काय करणार आहात? उपचार तर होणार आहेत. “

जड मनाने विलासराव तिथून निघाले. विलासरावांचं अख्खं कुटुंब दादांची सुश्रुषा करायला हॉस्पिटलमध्ये होत. पण तरीही इमर्जन्सीवेळी मदतीला दादांच्या सोबतीला बसण्याची जबाबदारी विलासरावांनी आपल्या काही मित्रांच्यावर टाकली. मधुकर भावे, उल्हासदादा पवार असे मित्र दगडोजीरावांशी गप्पा मारायला म्हणून जायचे.

काही दिवसांनी ऑपरेशन झालं. ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं. बघता बघता दादांची तब्येत सुधारली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याची वेळ आली. तेव्हा विलासराव आपल्या वडिलाना म्हणाले,

“मी मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही वर्षा बंगल्यावर आला नाही. थोडे दिवस तिथे मुक्काम करा आणि मग लातूरला परत जा. “

आपल्या वडिलांनी आपल्यासोबत काही क्षण घालवावेत, त्यांची सेवा करायची संधी मिळावी,  ही प्रत्येक मुलाची इच्छा असते तशी ती विलासरावांची देखील होती. इतक्या दिवसात एकदाही दादा मुख्यमंत्री निवासाच्या बंगल्यात आले नाहीत याबद्दल खंतही त्यांना वाटत होती. त्यांच्या पत्नीनी वैशालीताईनी देखील आपल्या सासऱ्यानां घरी येण्याचा आग्रह केला.

दगडोजीराव म्हणाले,

“वर्षा म्हणजे आपले घर आहे का? वर्षा म्हणजे सोन्याचा पिंजरा. तुम्हाला एवढं वाटत असेल तर आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो. पण, वर्षावर येत नाही.”

अगदी कमी शब्दात दगडोजीराव खूप काही सांगून गेले. गावाकडच्या मातीतून आलेले हे अनुभवाचे संस्कार विलासराव कधीही विसरले नाहीत.

आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अचानक सोडावी लागली. लोकांना वाटलं विलासराव बंड करतील मात्र तस घडलं नाही. दिलखुलास विलासरावांनी ते मोठ्या उमदेपणाने स्वीकारलं. पद गेल्या गेल्या त्यांनी आपला बंगला खाली करून सुशिलकुमारांना दिला. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले देखील,

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये मी नव्हतोच. माझी शर्यत ही रिले प्रकारातील होती, एका विशिष्ट टप्प्यावर पुढच्या खेळाडूकडे बॅटन सोपवायचा. मीही तेच केलं. अंतिम टप्प्यासाठी बॅटन माझ्याच दोस्ताच्या हाती सोपवली.”  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.