विलासराव म्हणजे प्रत्येक प्रांतात वावर असणारा अवलिया नेता : जयंत पाटील.

आज मा. विलासरावजी देशमुख यांची जयंती, विलासराव देशमुखांचं नाव घेतलं की आपल्या सर्वांच्या समोर येतो, तो एक हसरा आणि राजबिंडा चेहरा. एक उत्साह आणि उमेदीने सळसळणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव.  विलासरावजींची आणि माझी ओळख तशी जुनी पण त्याचं मैत्रीत रुपांतर झालं ते विलासरावजी महसूल मंत्री असताना. मी तेव्हा त्यांना माझ्या मतदारसंघात बोलावलं होतं.

विलासराव देशमुख यांचा स्वतःचा असा श्रोतावर्ग होता. त्यामध्ये राजकारणाशी फारसा संबंध नसलेले लोकही मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात कुठेही त्यांची सभा अथवा कार्यक्रम असो, त्यांना ऐकायला लोक आवर्जून येत.

जसे विलासराव राजकीय सभा गाजवीत तसेच ते राजकीय नसलेल्या कार्यक्रमांतही उत्तम भाषणे करीत. साहित्यिकांच्या प्रांतातही त्यांची चांगली उठ बस असे. गजलांच्या मैफिलींना तर ते आवर्जून उपस्थित राहत. सुरेश भट, भीमराव पांचाळ यांच्या अनेक गजला त्यांना मुखोद्गत होत्या. जीवनाच्या सर्व प्रांतात वावर असणारा असा हा अवलिया नेता होता.

पुढे जाऊन विलासराव मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मी अर्थमंत्री झालो. मी अर्थमंत्री झालो त्यावेळी राज्य मोठ्या आर्थिक संकटातून जात होते. त्यावेळी राज्याच्या हितासाठी आम्हाला अनेक कटू निर्णय घ्यावे लागले हे कटू निर्णय घेताना विलासरावांनी मला खंबीर साथ दिली.

एकदा मी आणि विलासरावजी राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीला दिल्ली येथे गेलो असता, तिथे आम्हाला दिग्विजयसिंह भेटले. दिग्विजयसिंह यांनी विलासराव मुख्यमंत्री आणि मी अर्थमंत्री झाल्याबद्दल आमचे अभिनंदन केले आणि कौशल्याने राज्याची आर्थिक घडी बसवत असल्याबद्दलही आमचं कौतुक केलं. पण कॉंग्रेस फुटून राज्यात दोन कॉंग्रेस झाल्या याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. हजरजबाबी विलासराव त्यांना लगेच म्हणाले,

“काँग्रेस फुटली म्हणूनच मी मुख्यमंत्री व जयंतराव अर्थमंत्री झाले….!!”

२००२ साली मी कोल्हापुरात एका कार्यक्रमात भाषण केलं. त्यावेळी मी अशी अपेक्षा व्यक्त केली की, पवार साहेबांनी दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात अधिक लक्ष द्यायला हवं. वर्तमानपत्रांनी त्याचा अर्थ असा काढला की, पवारसाहेब मुख्यमंत्री होण्याची मी अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी मी आणि पवारसाहेब एकत्र प्रवास करत असताना विलासरावजींचा फोन आला. विलासरावजींचा फोन येताच पवार साहेबांनी ओळखलं की, कालच्या माझ्या विधानाचा वर्तमानपात्रांनी जो अर्थ काढला त्याबद्दलच बोलण्यासाठी विलासरावांनी फोन केलाय. तो फोन घेतल्यावर विलासराव हसत हसत म्हणाले की,

“आता मी तरी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर तुम्हीतरी राजीनामा दिला पाहिजे”.

त्यावर मी त्यांना स्पष्टीकरण दिलं आणि माझ्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढल्याबद्दल त्यांना सांगितलं. मी स्पष्टीकरण दिल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला.

विलासरावांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना कायम समजून घेतले व स्वतः ते समन्वयकाच्या भूमिकेत राहिले. सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका कायम ठेवली. त्यांना सन्मानाने वागवले.

विलासरावजींचे सौहार्दाचे संबंध जसे  त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत होते तसेच ते विरोधी पक्षातील नेत्यांसोबत देखील होते. खऱ्या अर्थाने राज्यातील राजकारणातले ते अजातशत्रू ठरले. विलासरावांचा दिलदार व दिलखुलासपणा हि त्यांची ओळख त्यांनी कधीही मिटू दिली नाही. त्यांच्या याच स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. विलासरावांची खासियत म्हणजे ते कोणत्याही कठीण प्रसंगाला हसत हसत सामोरे जायचे. अनेकदा त्यांच्या या वागण्याचे आम्हालाच आश्चर्य वाटायचे.

विलासरावांची आणि माझी शेवटची भेट काहीशी अशीच ठरली. विलासराव पवार साहेबांसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशन विषयी चर्चा करायला आले होते. तेव्हा त्यांची तब्येत काही ठीक नसल्यासारखी मला जाणवली. मी त्यांना विचारले,

“सर्व काही ठीक आहे ना? तुमचा चेहरा नेहमीसारखा वाटत नाही”.

त्यावेळी ते मला अगदी सहजपणे म्हणाले  की,

“मला काही नाही झालं, मी बरा आहे”.

एवढ्या दुर्धर आजाराला विलासराव सामोरे जात असतील याची जाणीव देखील त्यांनी होऊ दिली नाही.

विलासराव आपल्यातून निघून गेले ते कायमचेच! महाराष्ट्राने  जनाधार असलेला एक उमदा नेता गमावला. विलासरावांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झालं. विलासरावजींच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.