विनोद खन्नाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी “अचानक” झाल्या होत्या.

विनोद खन्नाचा जन्म पेशावरचा, १९४६ चा. विनोद खन्नाचे वडिल पेशावरमध्ये मोठे बिझनेसमॅन होते. त्याच्या जन्मानंतर एका वर्षातच फाळणी झाली आणि विनोद खन्नाचे वडिल आपल्या कुटूंबाला घेवून भारतात आले. विनोद खन्ना लहानपणापासून एकटं रहायचा. त्याच्या घरात आणि त्याच्या आयुष्यात सर्वात जास्त दहशत होती ती त्याच्या वडिलांची.

खन्ना कुटूंब सुरवातीच्या काळात मुंबईत आलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला गेले. विनोद खन्नाला लहान असताना भविष्य बघायचा नाद लागला होता. भविष्यासाठी तो सातवी आठवीत असताना साधू संन्यासी लोकांकडे जावून बसायचां. दिल्लीच्या डीपीएस शाळेत शिकत असताना त्याला नाटकाचा नाद लागला. आपला पोरगा वाया जावू नये म्हणून कडक शिस्तीच्या वडिलांनी विनोद खन्नाला मुंबईच्या बोर्डिंग स्कुलमध्ये घातंल.

आत्तापर्यन्त सर्वकाही “अचानक” होत असणाऱ्या विनोद खन्नाच्या आयुष्यात बोर्डिंग स्कुल एका संधीप्रमाणे आलं. इथे तो सिनेमा पाहू लागला. शाळेच्या वयात त्याने पाहिलेला पहिला सिनेमा होता मुगल ए आझम.

विनोद खन्नाचं स्वप्न इंजिनियरींग होतं पण इथे हिटलर असणारे त्याचे वडिल आडवे आले. त्याच्या वडिलांनी त्याच्या समोर कॉलेजच्या अॅडमिशनचा फॉर्म टाकला. उद्यापासून हे कॉलेज. कॉलेज पुर्ण झालं की घरचा बिझनेस पहायचा. विनोद न वडिलांना प्रश्न न विचारता ते देखील मान्य केलं.

दूसऱ्या दिवसापासून विनोद खन्नाचं कॉलेज होतं सेंट झेवियर्स, मुंबई. विनोद खन्ना दिसायला हॉलिवूडच्या एखाद्या सुपरहिरोसारखां होता. कॉलेजमध्ये त्याच्या आजूबाजूला मुली घुटमळायच्या. को कॉलेजमध्ये कमी आणि जून्या विनस मध्ये जास्त दिसत होता. याच काळात त्याच्या आयुष्यात गितांजली तालेरखान आली. एखाद्या हिरोसारखं खाजगी आयुष्य. मन मारायला लावणारे वडिल आणि सोबत असणारी प्रेयसी. या पलिकडे विनोद खन्नाच्या आयुष्यात विशेष अस काही नव्हतच.

एक दिवस, विनोद खन्नाला एक आमंत्रण मिळालं. मित्रासोबत त्याला पार्टीत जायचं होतं. कदाचित तो त्या पार्टीत गेला पण नसता. पण त्याच्या नशिबात पुन्हा अचानक अस काहीतरी होतं.

त्या पार्टीत त्याला सुनिल दत्त भेटले. सुनिल दत्त तेव्हा आपल्या भावाला प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होते. स्टोरी, हिरो, हिरोईन सारं काही फिक्स झालं होतं. सुनिल दत्तने विनोद खन्नाला पाहिलं आणि एका क्षणात त्याच्यापुढे ऑफर ठेवली. नव्याने येणाऱ्या सिनेमात व्हिलनचा रोल करायचां. विनोद खन्नाकडे नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं. पण इथे आडवे आले विनोद खन्नाचे वडिलं.

विनोद खन्ना घरी गेले. सिनेमाच्या ऑफरबद्दल आईकडून वडिलांना माहिती मिळाली. वडिल विनोद खन्नाचे पुढे आले आणि म्हणाले,

या घरात पुन्हा सिनेमाचं नाव काढलं तर बंदुकितील सर्वच्या सर्व गोळ्या तूझ्या छातीत जातील.

विनोद खन्नाने आईला मध्यस्थी करायला लावली. कधीच न विरघळलेल्या त्याच्या वडिलांनी अचानक त्याला परवानगी दिली. फक्त एक सिनेमा. त्यानंतर थेट घरचा बिझनेस जॉईन करायचा.

ते साल होतं १९६८ चं. त्या वर्षी विनोद खन्नाचा पहिला सिनेमा रिलीज झाला मन की मीत. सुनिल दत्तने आपल्या भावाला हिरो म्हणून काढलेल्या त्या सिनेमात सर्वांनी विनोद खन्नाला लक्षात ठेवलं. विनोद खन्नाकडे सगळ्या बॉडीवूडचं लक्ष गेलं. अस सांगितलं जात की सिनेमा रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यात विनोद खन्नाने पंधरा नवे सिनेमे साईन केले होते. पुरब औंर पश्चिम, सच्चा झुठां, आवों मिलो साजना, मस्ताना, मेरा गावं मेरा देश, ऐलान, हम तूम औंर वो, मेरे अपने असे कित्येक सिनेमे त्याने साईन केले.

पण त्याला खरी ओळख मिळाली ती गुलजारच्या अचानक पासून. १९७३ साली अचानक आला. या सिनेमात हिरोच्या पत्नीचे अनैतिक संबध असतात. हिरोला ते समजल्यानंतर हिरो आपल्या पत्नीचा खून करतो. नकारात्मक भूमिकेत विनोद खन्नाने अशी जान आणली की लोक त्या हिरोसोबत कनेक्ट झाले.

विनोद खन्ना आत्ता स्टार होवू लागलेला.

त्याच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळं पहायला मिळत होतं. विनोद खन्ना ८० च्या दरम्यान थेट बच्चनला खावू लागला. त्याचा मुकद्दर का सिकंदर हा त्या काळातला शोले आणि बॉबी नंतर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. लोक बच्चन आणि विनोद खन्नाची तुलना करायला लागले होते. सुनिल दत्तची अचानक ऑफर त्याला प्रसिद्धीच्या शिखऱावर घेवून आली होती. पण

इथे त्याच्या आयुष्यात दूसरा अचानक आला.

१९८२ साली आपली पत्नी गितांजली. आपली मुले. आपलं करियर याचा काहीही विचार न करता सिनेमातून संन्यास घेण्याचा निर्णय विनोद खन्नाने घेतला. पुढचं पुर्ण आयुष्य हे ओशोच्या आश्रमात घावण्याचा निर्धार घेवून तो संन्यासी झाला. विनोद खन्ना ओशोंच्या आश्रमात राहू लागले. इथे त्यांना स्वामी विनोद भारती अस नाव देण्यात आलं. याच काळात त्यांची मैत्रिण, बायको गितांजली त्यांच्यापासून कायमची दूर गेली. अस सांगतात की, विनोद खन्नाच्या त्या निर्णयामुळे त्यांच कुटूंब अस तुटलं की ते पुन्हा कधीच एकत्र येवू शकलं नाही.

पुन्हा एकदा अचानक आला, विनोद खन्ना पाच वर्ष ओशोच्या आश्रमात राहून पुन्हा एका सिनेमाच्या जगात आला. विनोद खन्नाने इंसाफ सिनेमा केला. त्यानंतर मात्र तो सिनेमातून फेकला गेला. पुर्णपणे नाही पण कधीकाळी बच्चनला खावून टाकणाऱ्या विनोद खन्नाबद्दलच्या चर्चा आत्ता संपुष्टात आल्या होत्या.

विनोद खन्नाने हळुहळु हिरोंच्या भूमिका करायचं पण सोडून दिलं. त्यानंतरच्या एका पार्टीत त्याला कविता भेटली. कविता आपल्या काही मित्रांसोबत विनोद खन्नाच्या पार्टीत गेली होती. कविता त्या गोष्टीबद्दल सांगते की, विनोद खन्ना आणि मी भेटू लागलो. दूसरं लग्न न करण्यावर तो ठाम होता. आणि अचानक बॅटमिंटन खेळता खेळता तो माझ्या समोर आला आणि लग्नाची मागणी घातली.

नंतरच्या काळात विनोद खन्नाने BJP जॉईन केली. गुरूदासपूरमधून तो निवडून आला. २००२ मध्ये तो पर्यटन मंत्री राहिला. अगदी अचानक आलेल्या प्रत्येक क्षणात तो जगत राहिला. जन्माच्या एका वर्षातच पाकिस्तानातून भारतात आलेला, श्रीमंत बापाचा मुलगा, अचानक एका पार्टीतून सिनेमात आलेला, बच्चनला टक्कर देणारा पण अचानक संन्यासी झालेला, पुढे अचानक दूसरं लग्न करुन राजकारणात शिरलेला विनोद खन्ना नक्कीच काहीतरी वेगळं रसायन होता.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.