दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता…?

ऐतिहासिक रस्ते आणि रेल्वे स्टेशन यांच्या नावातील बदलांच्या शृंखलेत २०१८ मध्ये एका रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची भर पडली होती. ते म्हणजे उत्तरप्रदेश मधील मुगलसराय जंक्शनचं नांव बदलून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन’ असं करण्यात आलंय. 

तुमच्या लक्षात येत असेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि मुगलसराय स्टेशन यांच्यात एक नातं राहिलेलं आहे, मुगलसराय हे तेच स्टेशन आहे जिथे ११ फेब्रुवारी १९६८ साली पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. 

दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर घेण्यात आला होता. पण का ?  याच पार्श्वभूमीवर त्यांच्या शेवटच्या दिवसातील घडामोडीवर टाकलेला हा प्रकाशझोत…

कोण होते दीनदयाळ उपाध्याय…?

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे आताच्या भाजपचे आणि त्यापूर्वीच्या जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या स्थापनेपूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून कार्यरत होते. हिंदुत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी १९४० साली ‘राष्ट्र धर्म’ नावाचं मासिक सुरु केलं होतं, पुढे त्यांनी ‘पांचजन्य’ नावाच्या साप्ताहिकाची आणि ‘स्वदेश’ नावाच्या दैनिकाची सुरुवात देखील केली.

१९६७ साली ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. आजघडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारवंत म्हणून ज्या नेत्यांना समोर करतो त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे दीनदयाळ उपाध्याय हे होय.

त्यांची हत्या कधी आणि कशी झाली…?

हरीश शर्मा लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ या पुस्तकात याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. हरीश शर्मा यांच्यानुसार फेब्रुवारी १९६८ मध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनसंघाची भूमिका काय असावी याविषयी चर्चा करण्यासाठी पक्षाची एक बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या बैठकीसाठी दीनदयाळ उपाध्याय यांना उपस्थित राहायचं होतं. त्यासाठी त्यांना लखनऊहून दिल्लीला जायचं होतं, परंतु जनसंघाचे बिहार प्रमुख अश्विनी कुमार यांच्या बोलावण्यावरून पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘पठाणकोट-सियालदा’ एक्स्प्रेसमधून लखनऊहून पटण्याला जायला निघाले.

संघाच्या व्यासपीठावरून गांधीजी काय बोलले होते ?

ही एक्स्प्रेस फक्त जोधपूरपर्यंतच होती. तिथून पुढे गाडीचे डब्बे ‘दिल्ली-हावडा एक्स्प्रेस’ला जोडण्यात आले आणि पुढे गाडी रवाना झाली. ज्यावेळी गाडी पटण्यात पोहोचली त्यावेळी बिहारमधील जनसंघाचे नेते कैलाशपती मिश्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना घेण्यासाठी आले होते, परंतु त्या गाडीत उपाध्याय नव्हतेच. दीनदयाळ उपाध्याय दिल्लीतील बैठकीसाठी निघून गेले असतील असं समजून कैलाशपती मिश्र तिथून निघून गेले.

तोपर्यंत मुगलसराय स्टेशनवर एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला त्यावेळी फक्त रेल्वेचं तिकीट, रिजर्वेशनची पावती, घडी आणि रोख २६ रुपये या चारच गोष्टी मिळाल्या. काही लोकांनी दीनदयाळ उपाध्याय यांना ओळखलं परंतु पुष्टी करण्यासाठी तेथील स्थानिक स्वयंसेवकांना बोलावण्यात आलं.

स्वयंसेवकांनी खात्री केल्यानंतर अधिकृतपणे जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे घोषित करण्यात आलं.

तपासातून काय हाती लागलं..?

या प्रकरणात चौकशी झाली आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या गायब झालेल्या वस्तूंवरून पोलिसांना काही पुरावे मिळाले. लालता, रामअवध आणि भरत अशा ३ लोकांना ताब्यात घेण्यात आलं. कारण लालताने पंडित उपाध्याय यांची सुटकेस गायब केला होता, हे काम त्याने रामअवधच्या सांगण्यावरून केलं होतं.

तर भरतकडे उपाध्याय यांचा कोट सापडला होता. परंतु यापलीकडे तपास जायला तयार नव्हता. त्यानंतर प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. सीबीआयला देखील या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करण्यात अपयश आलं. बनारसच्या विशेष सत्र आणि जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. जून १९६९ मध्ये न्यायालयाने आपला निकाल देताना भरत आणि रामअवध यांना शिक्षा सुनावली परंतु पुराव्याभावी हत्येच्या प्रकरणात त्यांना निर्दोष सोडण्यात आलं.

वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांच्यावर आरोप झाले.

बलराज मधोक नावाचे जनसंघाचे संस्थापक मोठे नेते होते. ते जनसंघाचे संस्थापक सदस्य राहिले होते. मधोक यांच्या मते अटल बिहारी वाजपेयी आणि संघाचे नेते नानाजी देशमुख यांनीच दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या घडवून आणली होती. ‘जिंदगी का सफर’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याबाबतीत लिहिलंय.

मधोक लिहितात की, “१९६७ च्या निवडणुकीत जनसंघाची कामगिरी सुधारूनही दीनदयाळ उपाध्याय यांनी वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांना पक्षातील महत्वाच्या पदापासून दूर ठेवत बलराज मधोक यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये अवहेरले गेल्याची भावना निर्माण झाली. या नाराजीतूनच त्यांनी उपाध्याय यांची हत्या घडवून आणली.”

दरम्यान मधोक यांनी केलेले हे सर्व आरोप त्यांनी आपल्यावर झालेल्या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर पक्षातून काढून टाकल्यानंतर केले होते. त्यामुळे या आरोपांना फारसं गांभीर्याने घेण्यात आलं नाही.

पुढे काय झालं..?

ऑक्टोबर १९६९ साली विरोधी पक्षांच्या विनंतीवरून इंदिरा गांधी यांच्या सरकारने न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली. न्या. चंद्रचूड यांनी सीबीआयच्या निष्कर्षाशी सहमती दाखवत लुटमारीच्या उद्द्येशानेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाल्याचं सांगितलं. असं असलं तरी जनसंघाच्या तसेच काँग्रेसच्या देखील अनेक नेत्यांना या गोष्टीवर अजूनही विश्वास नाही. त्यामुळे त्यांची हत्या नेमकी का झाली याबाबतीतलं गूढ अजूनही कायम आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.