सचिनच्या या चुका पाहून वाटतं “तो देव नाही, तुमच्या आमच्या सारखा चुकणारा माणुसच”.

सचिन रमेश तेंडूलकर…!!!

आपली क्रिकेट कारकीर्द सुरु केल्यानंतर पुढची जवळपास अडीच दशकं फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटवर निर्विवादपणे अधिराज्य गाजवलेलं नांव. सचिनच्या कित्येक खेळींनी त्याच्या जगभरातील चाहत्यांना आयुष्यभर जपून ठेवावेत असे अनेक क्षण दिलेत. महान ऑस्ट्रेलियन बॅटसमन सर डॉन ब्रॅडमन यांनी तर सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्याच्यातील क्रिकेटिंग टॅलेंट हेरून हा पोरगा पुढे चालून आपला वारसा चालवेल, असं आपल्या बायकोजवळ बोलून दाखवलं होतं.

सचिननेही ब्रॅडमन यांचे शब्द अगदी शतप्रतिशत खरे ठरवताना आपल्या अद्भूत कामगिरीच्या जोरावर करोडो क्रिकेट रसिकांवर कायमच गारुड निर्माण केलं. क्रिकेटर म्हणून सचिनची महानता वादातीत आहे. त्यासाठी त्याला कधीच कुठल्याच सर्टिफिकेटची गरज नव्हती आणि नाही.

क्रिकेटर म्हणून सचिन महान होता, महान आहे आणि भविष्यकाळ देखील सचिनला महान क्रिकेटर म्हणूनच लक्षात ठेवील.

असं असलं तरी व्यक्तिमहात्म्याचं स्तोम माजवायचा प्रकार आपल्याकडे फार खोलवर रूजलाय. कुठलंही क्षेत्र त्याला अपवाद नाही. कुठल्याही महान आणि कर्तुत्ववान व्यक्तीला देवत्व बहाल करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार पासून चालत आलीये. एकदा का एखाद्याला देवत्व बहाल केलं की त्या व्यक्तीतील ‘माणूस’ म्हणून असणाऱ्या दोषांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करण्याची सोय आपसूकच होऊन जाते.

सचिनच्या बाबतीतही हे झालं नसतं तर नवलंच. अपेक्षेप्रमाणे तसं ते झालं आणि एका महान क्रिकेटपटूला आपण ‘क्रिकेटचा देव’ बनवून टाकलं.

सहाजिकच त्याला देवत्व बहाल केल्याने त्याच्यातील दोषांकडे डोळेझाक करण्याची आपली सोय झाली. पण असे काही प्रसंग सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीतच आले की जेव्हा सचिन हा काही देव वैगेरे नसून तो तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहे. (फार फार तर असाधारण माणूस म्हणूयात) हे त्यानं सिद्ध केलं.

सध्या सचिनने शेतकरी आंदोलनावर जगभरात होत असलेल्या पाठिंब्यावर भाष्य करणारे ट्विट केले आणि सोशल मीडियावर त्याच्यावर झाडून टीका झाली. त्याने राजकारणात पडायला नको असं काही जणांचं म्हणणं आहे. यापूर्वी सुद्धा सचिन आपल्या काही चुकांमुळे वादाच्या भोवऱ्यात   सापडलाय. खाली आहेत काही उदाहरणे.

१) सचिन आणि बॉल टेम्परिंग प्रकरण. 

सचिनच्या कारकिर्दीतील वादग्रस्त घटनांमधील सर्वात महत्वाची घटना म्हणजे त्याच्यावर झालेले बॉल टेम्परिंगचे आरोप. २००१ सालच्या आफ्रिकन दौऱ्यात सचिनवर हे आरोप झाले होते. टी.व्ही. प्रोड्यूसरने दिलेल्या फुटेजमधून सचिन आपल्या हाताच्या नखाने बॉलसोबत छेडछाड करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

हे फुटेज बघून मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी सचिनला बॉल टेंपरिंगच्या प्रकरणात दोषी ठरवलं.

त्याच्यावर सामन्यात मिळणाऱ्या मानधनापैकी ७५ टक्के दंड आणि एका कसोटीची बंदी घालण्यात आली. देशभरात याविरोधात निदर्शनं झाली. मॅच रेफ्री माईक डेनिस यांचे पुतळे जाळण्यात आले. बीसीसीआयने दबावतंत्राचा वापर केला. नंतर यथावकाश या प्रकरणात आयसीसीने चौकशी केली आणि त्यात सचिनला निर्दोष ठरविण्यात आलं. त्याच्यावरील एका सामन्याची बंदी देखील उठविण्यात आली. सचिननेही ‘प्लेयिंग इट माय वे’ या आत्मचरित्रात आपल्यावरील आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले.

आयसीसीने जरी सचिनला क्लीन चीट दिली असली तरी सचिनने बॉल टेंपरिंग केलं किंवा नाही याबाबतीत क्रिकेटविश्वात दोन मतप्रवाह बघायला मिळतात. काही जणांच्या मते सचिनने बॉल टेंपरिंग केलं होतं, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सचिन असं काही करूच शकत नाही.

कुणीही स्पष्टपणे सचिनने असं केलंच नव्हतं हे सांगत नाही. सचिनने बॉल टेंपरिंग केलंच नव्हतं, असं मानणाऱ्यांच मत हे प्रामुख्याने सचिन असं काही करूच शकत नाही या गृहितकावर आधारलेलं आहे. टोनी ग्रेग या माजी इंग्लडच्या क्रिकेटपटूने यावर आपलं मत व्यक्त करताना असं म्हंटलं होतं की,

“तुम्ही जर सचिनचं फुटेज बघितलं असेल आणि तुम्हाला जर क्रिकेट कळत असेल तर सचिनने बॉल टेंपरिंग केलंच नव्हतं, असं म्हणण्याचं धाडस तुम्ही करणार नाही”

२) फेरारीची चुकवलेली कस्टम ड्युटी. 

Screen Shot 2018 04 24 at 8.45.26 AM

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत विक्रमांची एकेक शिखरे सर करत चाललेल्या सचिनने २००३ साली कसोटी क्रिकेटमधील सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांची बरोबरी केल्यानंतर ‘फियाट’ कंपनीकडून त्याला ‘फेरारी-३६०’ मोडेना कार गिफ्ट देण्यात आली. सचिन त्यावेळी कंपनीचा ब्रांड अम्बेसेडर होता.

खरं तर त्यासाठी नियमांप्रमाणे सचिनने १.३ कोटी रुपये कस्टम ड्युटी भरणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही आणि कस्टम ड्युटी चुकवल्याप्रकरणी तो वादात अडकला. प्रकरण दिल्ली उच्च न्यायलयात गेलं आणि शेवटी ‘फियाट इंडिया’ला कस्टम ड्युटी भरावी लागली. खरं तर कस्टम ड्युटी भरून वाद टाळणं सचिनला सहज शक्य होतं, पण तसं झालं नाही आणि ‘माणूस’ म्हणून असणाऱ्या सचिनच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पुढे ही कार देखील त्याने सुरतमधील व्यापाऱ्याला विकून टाकली.

३)अभिनेता म्हणून करात सूट द्या.

टेलिव्हिजन चॅनेलवरच्या अनेक जाहिरातीत आपण सचिनला बघितलंय. त्या जाहिरातीतून सचिन भरभक्कम कमाई करतो. अर्थातच त्याने या कमाईवर नियमाप्रमाणे आकारण्यात येणारा कर भरणे अपेक्षित आहे. परंतु सचिनने हा कर वाचविण्यासाठी आपल्या वकीलांकरवी कोर्टात आपल्याला कर भरण्यापासून सूट देण्याची मागणी केली होती. टेलिव्हिजन चॅनेलवरच्या जाहिरातीतून आपल्याला कमावलेलं उत्पन्न हे आपण खेळाडू म्हणून नव्हे तर अभिनेता म्हणून मिळवतोय, असा सचिनचा याप्रकरणी युक्तिवाद होता.

४)मित्राचा फ्लॅट वाचविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना गळ.

इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित बातमीनुसार राज्यसभेचा खासदार असणाऱ्या सचिनने आपला बिझनेस पार्टनर आणि मित्र संजय नारंग याचा मसुरीमधील फ्लॅट वाचविण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना गळ घातली होती. डीआरडीओच्या मसुरीमधील इमारतीसमोरील संरक्षित जागेतील ५० फुट जागा बळकावल्याचा आरोप संजय नारंगवर होता. त्याविरोधात डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार देखील केली होती. सचिनने मात्र या प्रकरणात आपले कुठलेही आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपाचा इन्कार केला होता.

५)BMW कार वरील कर बुडवला.

फेरारी प्रमाणे बीएमडब्ल्यू एम ५ या आलिशान लक्झरी कारवरील तब्बल एक लाखाचा सेस सचिनने चक्क भरला नव्हता. २०१० साली नवी मुंबई महानगरपालिकेने सचिन तेंडुलकरचा समावेश करबुडव्यांच्या यादीत केला होता. एवढा महान क्रिकेटर कर भरत नाही यावरून चुकीचा संदेश गेला. विशेषतः कार वरील कर बुडवण्याची त्याची ही दुसरी वेळ होती.

६) महानगरपालिकेचे पाणीबिल थकवले.

सचिन तेंडुलकर त्या काळी मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीत पाणी वाचवा चा संदेश द्यायचा. मात्र २०१४ साली पालिकेने जाहीर केलेल्या पाणीपट्टी चुकवणाऱ्यांच्या यादीत त्याच देखील नाव आलं. पाणी वाचवा संदेश देणारा अब्जावधींचा मालक सचिन साधे पाणीपट्टी भरत नाही यावरून देखील त्याकाळी जोरदार टीका झाली होती.

७)सत्यसाई बाबा यांची भक्ती.

वादग्रस्त सत्य साईबाबा यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा अनेक सेलिब्रिटींच्या सोबत सचिन देखील त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला हजर होता. डोळे पुसत पुसत त्याने सत्य साईबाबा यांचे आपल्या जीवनावर किती प्रभाव आहे हे मीडियाला सांगितलं. ज्या सत्य साईबाबांचे चमत्कार खोटे आहेत व ते त्यातून गोरगरीब भक्तांना फसवतात अशी टीका केली जायची. त्यांच्या बद्दल अनेक वाद होते, त्यांचा भक्त म्हणून प्रमोशन करणाऱ्या सचिनवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संस्थांनी टीका केली.

हे ही वाच भिडू.

6 Comments
  1. जयदिप वामनराव धिवरे says

    1998 म्हणजे सचिनच्या कारकिर्दीची सुरूवात…???

    मग विराट कोहलीचं अजून पदार्पण व्हायचे असेल?

  2. सचिन says

    फेरारी मायकल शुमाकरने गिफ्ट दिली. कंपनीने नव्हे.

  3. Admin BolBhidu says

    भिडू जयदीप, १९९८ मध्ये सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली असल्याचा उल्लेख या लेखात नेमका कुठे करण्यात आलाय ते सांगितलं तर बर होईल…!!!
    भिडू सचिन, फेरारी सचिनला फियाट या कंपनीनेच गिफ्ट दिली होती, ज्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तुम्ही थोडा व्यवस्थित होमवर्क करा.

  4. Ankush says

    Te 2 udhya nch kay prakaran e o?

  5. Nilesh says

    हा लेख शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कमेंट केल्यामुळे लिहिण्यात आलाय….असं तर नाही ना?

  6. Avinash Kamle says

    Bhraman Aahe manunn

Leave A Reply

Your email address will not be published.