आचारसंहिता लागली म्हणजे आजपासून काय करायचं आणि काय नाही?

गावातले सगळे बॅनर उतरवायचं काम चालू झालय. काढता येत नाही ते झाकायचं काम चालुय. इतक्यात गावतलं एक पोरग आलं आणि त्यान सांगितल हनुमानाच्या मंदिरातल्या भूमिपूजनाचा मुहूर्त रद्द झाला. तात्या लपून छपून वाटप कसा करायचा या विचारात होते?  चौकातल्या शिवाजी पुतळ्याखालची सगळी नाव झाकली होती. मला मात्र काही ताळमेळ लागेना थेट हनुमानाच्या मंदिराच भूमिपूजन रद्द झाल म्हणल्यावर काहीतरी सिरीयस प्रकार झाला एवढ कळाल.

घरात गेलो आणि आमच्या दादासाहेबांना जरा सविस्तर सगळ सांगितल आणि काय भानगड आहे विचारल. दादान सांगितल अरे भानगड बिनगड काय नाही, विधानसभा निवडणूक आहे ना आता त्यामुळे आचारसंहिता लागू झाले, त्यामुळे हे अस सगळ झाल. आता मात्र ट्यूब पेटली, पण मग यात काय काय करायला चालत आणि काय नाही ? तर आमच्या दादाला यातल काहीच माहित नाही. लागू झाली ती आचारसंहिता एवढा काय ते साहेबांच ज्ञान, पण मोठा भाऊ असल्यामूळ अक्कल काढता आली नाही. मग ठरवल आपणच शोध घेऊ जरा याचा.

शोधायला सुरवात केली आणि कळाल आदर्श निवडणूक आचारसंहिता आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलात आणली आणि निवडणूक आयोगाने ती स्वीकारली. निवडणूक जाहीर झाली कि आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक संपेपर्यंत असते.

आचारसंहिता म्हणजे निवडणुकीतील उमेदवार, पक्ष, कार्यकर्ते यांनी या काळात काय कराव आणि काय करू नये याचे नियम. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाला केंद्र आणि राज्य सरकार, पक्ष आणि निवडणूक उमेदवार यांच्यावर लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांना एकमेकावर टीका करण्याची परवानगी असते. पण कुणाच्या ही वैयक्तिक आयुष्यावर, जातीवर किंवा धर्माला उद्देशून टीका करू शकत नाहीत. असे केल्यास आचारसंहिता भंग समजून गुन्हा दाखल केला जातो.

एखाद्या पक्षाच्या प्रचारात कुठलही भाषण, प्रचारच्या वस्तू, घोषणा किंवा आश्वासनं देताना जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये वाद निर्माण होईल, फुट पडेल असे कृत्य करायला चालत नाही. निवडणूकीच्या प्रचारात मतांसाठी पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना गिफ्ट देण, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेच्या नियमानुसार गैरप्रकार आहे.

आचारसंहिता केवळ निवडणूकीत उभा असलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादीत नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते. त्यामुळंच या काळात कोणत्याही मंत्र्यास रस्ता, पाणी, वीज इत्यादी कामांची आश्वासनं देता येत नाहीत. तसंच अधिकाऱ्याची बदली आपल्या आवडीच्या ठिकाणी करता येत नाही.

आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या,योजनांच्या  घोषणा करता येत नाही. तसंच या योजनांची अमंलबजावणीही आचारसंहितेच्या काळात बंद ठेवावी लागते. आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणूकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसंच सरकारी मालमत्ता, पोस्ट ऑफिस, गव्हर्मेंट गेस्ट हाऊस इथं स्वतःच राज्य असल्यासारखं वागायला चालत नाही.

कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगी असल्या शिवाय प्रचार करता येत नाही. याकरता उमेदवाराकडे सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र असणे आवश्यक आहे. तसंच कार्यक्रमाच्या, मिरवणूकीच्या अथवा सभेच्या काही दिवस आधी प्रचारकार्य, कार्यक्रमाची वेळ, स्थळ यांची माहिती संबंधीत पोलीस ठाण्यात द्यावी लागते. जर ह्या गोष्टी केल्या नसतील तर सभा रद्द करण्याचा अथवा बंद करण्याचे अधिकार पोलिसांना तसंच निवडणूक आयोगाला आहे.

आता हे झाल राजकारणाच्या मैदानात असणाऱ्या लोकांचे नियम. पण सामान्य माणसाचं काय? 

म्हणेज आमच्या गावातल नुकतच लग्न झालेलं जोडप, ते आचारसंहिता घेऊनच गावात आल. दुसऱ्याच दिवशी आपल्या विवाह नोंद करण्यासाठी हे पालिकेत गेले, तिथल्या अधिकाऱ्याने सांगितल आचारसंहिता चालू असल्याने विवाह नोंदणी होऊ शकत नाही. अशा प्रकारचे अनुभव आपल्याला येतच असतात.

जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, उत्पनाचा दाखला अशी बरीच काम करायला गेल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी आचारसंहितेच कारण देऊन टाळतात आणि आपल्याला वाटत ही काम आचारसंहितेच्या काळात होत नाहीत.

पण आचारसंहितेचा आणि या कामांचा कुठला ही संबंध नाही. अशी सगळी प्रशासकीय काम आचारसंहितेत करता येतात. फक्त सरकारी बाबू ही कारण देऊन वेळ मारून नेतात आणि आपली काम लांबणीवर पडतात. आचारसंहितेच्या काळात नागरिक म्हणून आपण ही सगळी काम करू शकतो. फक्त कुठल्या ही सरकारी योजनांचा लाभ आचारसंहितेत घेता नाही.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Dr Gajanan says

    Good

Leave A Reply

Your email address will not be published.