हार कर भी जितने वाले को नितीश कुमार केहते है

१९७७ मधील बिहार विधानसभा निवडणूक. नालंदा जिल्ह्यातील हरनौत मतदारसंघातुन २६ वर्षांचा मुलगा प्रथमच जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होता. या निवडणुकीत जनता पक्षाने २१४ जागा जिंकल्या होत्या आणि ९७ जागा गमावल्या. त्या हारलेल्या ९७ जागांमध्ये हरनौतची पण एक जागा होती.

पहिल्याच निवडणूकीत हारणाऱ्या त्या तरुण नेत्याचे नाव नितीशकुमार. ते भोला सिंह या समाजवादी नेत्याच्या हातून पराभूत झाले होते. १९६७ च्या बिहारमधील कर्पुरी ठाकुर यांच्या पहिल्या बिगर कॉंग्रेसी सरकारमध्ये भोला सिंह मंत्री होते. पण मंत्र्यापेक्षा देखील त्यांची त्या काळात विशेष ओळख होती ती फियाट कारवाले नेते म्हणून.

नितीश कुमार, ही पक्क्या समाजवादी विचाराचे. राममनोहर लोहिया, एस. एन. सिन्हा, कर्पुरी ठाकूर आणि विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ते तयार झाले. याचदरम्यान लोहियांमुळे नितीश आणि भोला यांची ओळख झाली.

नितीशकुमार कॉलेजमध्ये असताना वर्गात कमी आणि मुलांचे संघटन करुन त्यात पुढे असायचे. राजकारणाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू झाली होती. पण वडिल वैद्य रामलखन आणि घरच्यांना अभ्यास सोडून नितीश यांचे असे उद्योग आवडत नसत.

या उद्योगांपासून नितीशनी लांब जावे म्हणून घरच्यांनी एक तोडगा काढला. लग्न. बख्तियारपुरच्या जवळच असलेल्या सियोदा गावातुन सरकारी शाळेत शिक्षक असलेल्या कृष्णनंदन सिंन्हा यांची मुलगी मंजु कुमारी सिन्हा यांच स्थळ आलं.

२२ फेब्रुवारी १९७३ ला गांधी मैदानच्या पश्चिमेला असलेल्या लाला लाजपत राय भवनमध्ये लग्न झाले.

पण राजकारण त्यांना सोडवत नव्हते. आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून ते अधिक ठळकपणे समोर आले. आणीबाणीचा संपुर्ण काळ सोबत राहिले.

पुढे आणिबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणूकीत नितीश यांनी सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या पक्षातर्फे हरनौतसाठी तिकीट मिळवले. तर त्यांच्या समोर होते, अपक्ष उमेदवार आणि भारतीय समाजवादी पक्षाचे नेते भोला सिंह.

यात भोला यांना २८ हजार मत मिळाली तर नितीश यांना २२ हजार मत मिळाली. हार न मानता त्यांनी १९८० ला झालेल्या मध्यावधी निवडणूकीत पुन्हा त्याच जागेवर जनता पक्ष (सेक्युलर) कडून तिकीट मिळवले. यावेळी पुन्हा पराभूत झाले. अरुण सिंह या दुसऱ्या अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाले.

यानंतर मात्र त्यांनी हार मानायला सुरुवात केली. मुन्ना सरकार नावाच्या एका जवळच्या मित्रासोबत बोलण झालं.

‘ऐसा कैसे चलेगा, लगता है कोई बिझनेस करना होगा.

राजकारण सोडण्याचे विचार मनात येवू लागले. घरी पैसे मिळणे बंद झाले. पैसे कमावण्यासाठी इंजिनीअरच्या पदवीवर नोकरी करण्याच फायनल झाले. पण शेवटी घरच्यांना राजकारणात शेवटची संधी देण्याची विनंती केली.

१९८५ ला पुन्हा हरनौतमधून लोक दलाकडून उभे राहिले आणि यावेळी मात्र निवडून आले.

कॉंग्रेसच्या ब्रजनंदन सिंह यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले. पुढे १९८९ नंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला सुरुवात केली आणि जिंकली. त्यांनंतरचा मात्र त्यांचा आलेख चढताच राहिला. १९९, १९९६, १९९८ आणि १९९९ अशा बाढ लोकसभा मतदारसंघातून निवडणुका जिंकल्या. १९९८ आणि १९९९ मध्ये अटलबिहारींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. आणि पुढे बिहारचे मुख्यमंत्री देखील.

गेली पंधरा वर्षे ते मुख्यमंत्री आहेत. यावर्षीची निवडणूक त्यांना प्रचंड जड गेली.

तेजस्वी यादवची आरजेडी, कॉंग्रेस, डावे पक्ष यांच्या बरोबरच पासवान यांचे लोजपासारखे मित्र पक्ष सुद्धा विरोधात उतरले होते.  भाजपसुद्धा आतून काड्या करत आहे हे त्यांना कळत होत. प्रचारात होत असलेला विरोध ओळखून नितीश कुमार यांनी हि आपली शेवटची निवडणूक आहे यानंतर राजकारणाचा सन्यास घेणार असे भावनिक आवाहन केले होते.

एकेकाळी बिहारवर राज्य करणाऱ्या नितीशकुमार यांच्या या निवडणुकीत तब्बल २८ जागा कमी झाल्या. त्यांची जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेलीय आणि त्यांचा मित्रपक्ष भाजप ७४ जागा जिंकून पहिल्या दुसऱ्या स्थानावर पोहचलाय.

नितीश कुमार यांचा हा पराभवच मानला गेला पाहिजे पण निवडणुकीपूर्वी भाजप बरोबर त्यांनी मुख्यमंत्री पदाची बोलणी करूनच ठेवली होती. काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळणार असं अमित शहा यांनी आश्वासन दिलं होतंच.

नितीशकुमार यांनी युद्धात गमावलं ते तहात कमावलं असच म्हणता येईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.