हाच तो कार्यकर्ता, ज्याने विधानपरिषद व राज्यसभेची निवडणूक अवघड करुन ठेवलीये..

राज्यसभेच्या तुफान राड्यानंतर प्रस्तुत करत आहोत विधानपरिषदेचा राडा. आत्ता विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निकालात देखील आक्षेप वार रंगताना दिसतय. आत्ताच्या घडीला दोन मतांसाठी कॉंग्रेसचा आक्षेप धुडकावल्यानंतर आत्ता रामराजेंच मत बाद ठरवण्यात आलं आहे. दूसरीकडे भाजपच्या उमा खापरेंना दिलेलं मत देखील बाद ठरवण्यात आलेलं आहे. हे दोन्ही मत बाद करण्यात आलेली आहेत.

पण हे गणित एवढं अवघड का करून ठेवलय…

ही मतांच्या मोजणीची प्रक्रिया एवढी किचकट कशी काय ? पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मतं त्याची मोजणी इत्यादी हे सगळी गोळाबेरीज एवढी अवघड कशी काय ? कोणत्या महाशयाने हे अवघड गणित मांडून ठेवलंय ?

याचबद्दल जरा शोधलं, तपासलं…आणि एक नाव समोर आलं ते म्हणजे…

सर थॉमस हेअर

भारतात राज्यसभेसाठी जी निवडणूक प्रणाली वापरली जाते तिला ‘एकल संक्रमण मतप्रणाली’ म्हणतात. या प्रणालीचा शोध सर थॉमस हेअर यांनी लावला. म्हणून याला हेअर प्रणाली’ म्हणून देखील ओळखलं जातं. 

तेव्हा ही काय असते? इतिहास काय? कशी कार्य करते? यावरच प्रकाश टाकूया…

लोकसभेत लोकांच्या मतांची एकता आणि विविधता दोन्हीही गणितीयदृष्ट्या दर्शवणं, हे ज्या निवडणूक प्रणालीच्या माध्यमातून साध्य होतं त्याला ‘प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व प्रणाली’ असं म्हणतात. या प्रणालीचे दोन प्रकार पडतात… 

एक – सूची प्रणाली 

दुसरं – एकल संक्रमण मतप्रणाली. 

भारतात आपण एकल संक्रमण मतप्रणाली वापरतो.

सर थॉमस हेअर यांनी 19 व्या शतकात ही प्रणाली आणली.

हेअर हे ब्रिटिश वकील, खासदार व निवडणूक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. मतदाराच्या प्रत्येक मताचं महत्व टिकून राहावं, म्हणून त्यांनी ही प्रणाली शोधली.

ही प्रणाली केवळ एकापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्येच लागू केली जाते. म्हणजे एका मतदारसंघातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यावे लागतात. पण प्रत्येक मतदाराला एकच वोट असतं, जे संबंधित मतदाराच्या पसंतीच्या उमेदवारांना हस्तांतरित करता येतं. म्हणूनच त्याला एकल संक्रमण मतप्रणाली असं म्हणतात.

भारताच्या राज्यसभेच्या निवडणुकीत ही प्रणाली वापरली जाते, कारण प्रत्येक राज्याची विधानसभा हा बहुसदस्यीय मतदारसंघ असतो आणि राज्यसभेचे सदस्य या पद्धतीने निवडले जातात.

एका पेपरचा वापर करून ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. त्या पेपरला ‘बॅलोट पेपर’ असं आपण म्हणतो. या मतपत्रिकेवर उमेदवारांची यादी असते आणि त्यासमोर रिकामे रकाने असतात. ज्यामध्ये आवडीनुसार उमेदवाराला क्रमांक दिले जाऊ शकतात. प्रत्येक मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर १, २, ३ असं लिहून आपली पहिली, दुसरी, तिसरी अशी पसंत सांगू शकतो. 

म्हणून या प्रणालीला पसंतीनुसार मतदान करण्याची पद्धत असंही म्हटलं जातं. 

म्हणजे एकाच पदासाठी पहिली पसंत ‘अ’ हा उमेदवार असतो. त्यानंतर ‘ब’ उमेदवार पसंती असतो नंतर ‘क’ असं.. 

प्रत्येक मतदार निवडणुकीत केवळ एकच मत देतो, मात्र त्याने दिलेल्या पसंती क्रमांकानुसार अनेक विजेते निवडले जातात.

कोटा मिळवणं हा प्रक्रियेचा पहिला प्रेफरंस असतो. यासाठी एक सूत्र वापरलं जातं… 

राज्यातील विधानसभेच्या एकूण आमदारांची संख्या. या संख्येला राज्यातील राज्यसभेच्या रिक्त जागांमध्ये  (+) अधिक १ करून भागाकार करायचा. जो भागाकार येईल त्यामध्ये पुन्हा अधिक १ (+) करायचा.

कोटा = [एकूण मतांची संख्या / (निश्चित प्रतिनिधी संख्या + १)] +१

 

असा हा फॉर्म्युला सांगतो.

कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी आवश्यक कोट्याएवढी मतं मिळवावी लागतात. सुरुवातीला मतदाराच्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते.. जर ही मतं निर्धारित कोट्यापेक्षा अधिक असतील तर मग ती मतं पसंतीक्रमानुसार इतर उमेदवारांना हस्तांतरित केली जातात.

तो पहिला उमेदवार बाद झाला, तर ते मत बाद होण्याऐवजी पुढच्या पसंतीच्या उमेदवाराला हस्तांतरित केलं जातं. जर दुसरी निवड काढून टाकली गेली, तर पुढच्या उमेदवाराला ते जातं. अशाप्रकारे प्रक्रिया पुढे जाते. अशाने जागा भरल्या नाहीत, तर किमान एकूण जागा भरेपर्यंत तरी उमेदवाराची मतं विभागली जातात.

त्यामुळे कोणतंही मत व्यर्थ जात नाही.

टास्मानिया देशाने १८९६ ते १९०२ या काळात टास्मानिया हाऊस ऑफ असेंब्लीच्या सदस्यांच्या निवडीसाठी सगळ्यात पहिले ही प्रणाली वापरली होती. त्यानंतर १९०९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा कायम स्वरूपी वापर सुरू झाला.

इंग्रजी भाषिक देशांमध्ये, बहुतेक एकल संक्रमण मतप्रणाली वापरली गेली आहे. ब्रिटनमध्ये १९१८ सालापासून संसदेच्या विद्यापीठांच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीत ही प्रणाली वापरली गेली होती.

स्कॉटलंडमध्ये १९१९ पासून शैक्षणिक संस्थांसाठी, उत्तर आयर्लंडमध्ये १९२० पासून संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या निवडीसाठी या प्रणालीचा वापर केला जात आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.