एका जेलनंतर दुसरं जेल, सदावर्तेंना महाराष्ट्र दर्शन घडवण्यामागे कायदा काय सांगतो?

८ एप्रिलला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाला. अचानक झालेल्या या प्रकारची भनक पोलिसांना नव्हती, ते सतर्क नव्हते, म्हणून असा प्रकार घडला, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र आता महाराष्ट्र पोलीस खडबडून जागे झाल्याचं दिसतंय. हे आंदोलन झाल्यानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ‘आंदोलनकर्त्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी’ गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक देखील केली होती. आणि तेव्हापासून गुणरत्न सदावर्ते काही पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या तावडीतून सुटत असल्याचं दिसत नाहीये. एका केसनंतर दुसरी केस, एका जेलनंतर दुसरं जेल अशी साखळी चालूये. तेव्हा सदावर्तेंना हे महाराष्ट्र दर्शन जे घडवलं जातंय त्याबद्दल कायदा काय सांगतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे. 

आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेला १० दिवस झालेत. या १० दिवसांत काय काय झालं हे बघूया…

८ एप्रिलला त्यांना  पोलिसांनी अटक केली होती. दोन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत ११ एप्रिलला संपणार होती. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवून मागितल्यानंतर १३ एप्रिलपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

विशेष म्हणजे सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी याच दिवशी सातारा पोलीसही कोर्टात हजर झाले होते.  सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये सदावर्तेंच्या विरोधात राजेंद्र निकम यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. 

ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र ते गैरहजर राहिले होते. म्हणून सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तेव्हा त्यांची पोलीस कोठडी वाढवल्याने सातारा पोलिसांचा अर्ज पेंडिंगवर ठेवण्यात आला. 

हेही थोडं झालं की, अकोल्यातून माहिती समोर आली. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून ३ कोटी रुपये भूलथापा देऊन फसणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात ही तक्रार केली होती. 

१३ एप्रिलला वाढवलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने  सुनावली. सदावर्तेंना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं. जमीन मंजूर झाल्यानंतर लगेच सातारा पोलिस सदावर्तेंना घेऊन गेले. मग सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई झालं, सातारा झालं, अकोला झालं. त्यानंतर बारी आली कोल्हापूरची. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर टीका करताना मराठा आणि मागास जातीबाबत चुकीचे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्याप्रकरणी आणि मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केला असल्याचा आरोप करत कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून सदावर्ते यांनी जमा केलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी केलीये. 

त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात साताऱ्याच्या धर्तीवर सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमर रामचंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि मग आलं बीड प्रकरण. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणं, मराठा समाजाला अत्याचारी समाज असं संबोधित करणं, अशी तक्रार भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.

अशाप्रकारे या गुन्हा नोंदीची मालिका सुरु असताना साताऱ्याची पोलीस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलीये. आता त्यांच्या जामीनानंतर कोण त्यांना नेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

 मात्र या अटक मालिकेला कायदा कसाय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला.

तेव्हा त्यांनी सांगितलं…

सदावर्ते यांच्या प्रक्षोभक, आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर विधानांसाठी त्यांच्यावर अनेक ठिकाणी त्या-त्या वेळी गुन्हे दाखल झाले होते. तेव्हा जास्त दखल न घेता केवळ समज देण्यात आली. मात्र आता जेव्हा शरद पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याच्या घरावर हल्ला होतोय तेव्हा त्यांच्यावरील या केसेस पुढे येतायेत. आधीच दाखल तक्रारींची दखल घेऊन FIR  करून त्यांना अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. म्हणून हे बेकायदेशीर नाही.

याची अटक मालिका तयार होण्यामागे असं असू शकतं की, एकाच वेळी सर्वांना तशा सूचना दिल्या गेल्यायेत. या व्यक्तीवर कुठे-कुठे कोणत्या तक्रारी आहेत त्या काढून कार्यवाही करा, असे आदेश पोलीस महासंचालकांनी सगळ्या कमिशनर्सना दिले असू शकतात.  कार्यवाहीत त्यांचा ताबा घेऊन कोर्टासमोर हजर करणं ही कायद्याची प्रक्रिया आहे, तसे अधिकारही पोलिसांना असतात.

यातील कोणते गुन्हे दखल पात्र आहे, हे बघून त्यानुसार कारवाई चालू राहील. कधी जामीन मिळेल, कधी नाही मिळणार. शिवाय गुन्हे  सिद्ध झाले तर त्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळे कारागृह बघण्याची संधी मिळू शकते, असं ॲडव्होकेट सरोदे म्हणालेत. 

तर अशा आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज ठाकरे, ओवेसी, रामदेव बाबा हे व्यक्तीही कात्रीत अडकू शकतात असं त्यांनी सांगितलंय. कारण यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे असून सदावर्तेंसारखाच बॉम्ब फुटला तर तेही साखळी अटक मालिकेत सापडण्याची शक्यात ॲडव्होकेट सरोदे यांनी वर्तवलीये.

अशी आहे गुणरत्न सदावर्ते यांची अटक मालिका आणि त्याचा कायदा. तुम्हाला काय वाटतं? सदावर्ते कधी यातून सुटतील? की अजून अडकत जातील, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.