अनिल कपूर नेल्सन मंडेलांच्या पाया पडायला वाकला आणि मंडेलांनी त्याला मिठीच मारली…

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान खूप मोठे आहे. ब्रिटिशांच्या अंमलाखालील हिंदुस्तानाला आपल्या सविनय कायदेभंगाच्या अहिंसक आंदोलनाने मुक्त करणाऱ्या राष्ट्रपित्याचा जीवनावर आजवर देशात आणि परदेशात अनेक कलाकृती निर्माण झाल्या.

१९८१  साली रिचर्ड अटेनबरो यांनी ‘गांधी’ या चित्रपटातून त्यांचा संपूर्ण जीवनालेख अतिशय समर्पक रीतीने जगासमोर मांडला. महात्मा गांधी यांच्या सार्वजनिक जीवनातील वावरामुळे त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक जीवनामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांचे पुत्र हरिलाल गांधी यांच्यासोबत महात्मा गांधी यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. महात्मा गांधींना आपल्या पुत्राने आपल्या सोबत देशातच राहून जनतेची सेवा करावी असे वाटत होते तर हरिलाल गांधी यांना आपल्या वडिलांप्रमाणे विलायतेत जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवायची होती.

हरीलाल याना स्वत:ला सिद्ध करायचे होते. वडलांच्या वलयातून त्याला बाहेर यायचे होते. प्रश्न ‘आयडेंटिटी क्रायसिस’ चा होता. हरीलाल करीता अस्तित्वाची लढाई होती. या संघर्षातूनच हरिलाल गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. 

तेथे त्यांनी शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला. पण या शैक्षणिक वाटचालीत त्यांना फारसे यश मिळाले नाही. ते पदवी देखील पूर्ण करू शकेल नाही. आर्थिक विवंचना वाढल्या. अपयश आले. स्वप्न भंग झाला. त्यातून त्यांना वेगवेगळी व्यसने लागली. पत्नीला घेऊन ते भारतात परत आले. पत्नी तिच्या माहेरी निघून गेली आणि तिकडेच प्लेगच्या आजारात मृत्युमुखी पडली.

तिकडे हरिलाल गांधी यांचे व्यसन बेसुमार वाढले. त्यातच त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला.

गांधीजींवर हा  मोठा आघात होता. “संपूर्ण देशाचे तुम्ही पिता होऊ शकलात, राष्ट्रपिता झालात. पण माझे पिता आपण होऊ शकला नाहीत!” ही हरिलाल गांधी यांची खंत खूप काही सांगून जाणारी आहे.

पुढे महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीला हरीलाल अनोळखी व्यक्तीसारखे उपस्थित राहिले. यानंतर केवळ चार महिन्यातच हरीलाल गांधी यांचे टीबीने निधन झाले. या दोघांच्या संघर्षावर अनेक साहित्यकृती पुढे जन्माला आल्या. मराठीत देखील ‘गांधी विरुद्ध गांधी हे नाटक आले. गुजरात मध्ये दिनकर जोशी यांनी महात्मा वर्सेस गांधी हे नाटक लिहून त्याचे अनेक प्रयोग केले.

हरीलाल यांची नात नीलम पारीख यांनी ‘Gandhiji’s Lost Jewel: Harilal Gandhi’ हे पुस्तक लिहिले. ‘हरीलाल गांधी: अ लाईफ’ हे पुस्तक चंदुलाल भागुभाई दलाल यांनी लिहिले. याच पुस्तकाचा आधार घेत अभिनेता अनिल कपूर याने २००५ साली ‘गांधी माय फादर’ हा चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले. 

यासाठी त्यांनी फिरोज अब्बास खान यांना दिग्दर्शनासाठी निमंत्रित केले. फिरोज अब्बास खान हे रंगभूमीवरील प्रख्यात दिग्दर्शक. त्यांनी हा विषय मोठ्या संयतपणे हाताळला. या चित्रपटात गांधींची भूमिका दर्शन जरीवाला यांनी केली होती तर हरिलाल गांधी यांची भूमिका अक्षय खन्ना यांनी केली. कस्तुरबाच्या भूमिकेत शेफाली छाया होत्या. तर हरीलाल गांधीच्या पत्नीच्या भूमिकेत भूमिका चावला होत्या.

३ ऑगस्ट २००७ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने मर्यादित व्यावसायिक यश मिळविले असले तरी राष्ट्रीय पुरस्कारासोबत इतर अन्य पुरस्कारांची त्याच्यावर मोहर उमटली.  

या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिका येथे झाले. त्या शुटींग दरम्यानचा हा एक किस्सा खूप जबरदस्त आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्व युनिट दक्षिण आफ्रिकेला गेले. निर्माता अनिल कपूरला दक्षिण आफ्रिकेचे गांधी अर्थात नेल्सन मंडेला यांना भेटण्याची खूप इच्छा होती. यासाठी त्यांनी नेल्सन मंडेला यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री युसुफ यांना विनंती केली. सिनेमाचे शूटिंग संपत आले पण मंडेला यांच्या व्यस्त शेड्युल मुळे भेटीची वेळ मिळत नव्हती.

अनिल कपूर वारंवार या भेटीचा फॉलोअप घेत होते. शेवटी शूटिंगचे केवळ दोन दिवस राहिले. भेट न घेताच परतावे लागते की काय या शंकेने अनिल कपूर नाराज होता. पण त्याच्या भाग्यात भेटीचा योग होता!

युसुफ यांनी नेल्सन मंडेला यांची या भेटीसाठी रीतसर परवानगी घेतली. अनिल कपूर खूपच उत्सुक होता कारण नेल्सन मंडेला यांची भेट ही त्याच्यासाठी आयुष्यातली महत्त्वपूर्ण घटना होती.

‘राष्ट्रपिता महात्मा गांधींना आपण पाहू शकलो नाही परंतु नेल्सन मंडेला यांना आपण भेटू शकतो’ याच्या आनंदात त्या रात्री त्याला झोप लागली नाही! 

बुधवार १३ जुलै २००५ या दिवशी नेल्सन मंडेला यांनी भेटीची वेळ दिली. अनिल कपूर नेल्सन मंडेला यांना भेटायला गेला. मंडेला यांना पाहताच त्याचा अभिमानाने ऊर भरून आला. लगेच त्यांना नमस्कार करण्यासाठी तो खाली वाकला.

नेल्सन मंडेलांना हा सर्व प्रकार नवीनच होता. ते चटकन दोन पावले मागे गेले. त्यांनी विचारले, “अरे तुम्ही हे काय करत आहात?”

त्यावर अनिल कपूर म्हणाला “आम्ही भारतीय नागरिक आहोत. आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही मोठ्या व्यक्तीचे चरणस्पर्श करून त्यांना वंदन  करतो. आपण आमच्यासाठी वडिलांच्या जागेवर आहात. महात्मा गांधी यांना आम्ही पाहू शकलो नाही. परंतु आपण दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी आहात. आपले दर्शन घडले ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची चिरस्मरणीय घटना आहे!”

हे ऐकून नेल्सन मंडेला देखील खूप भारावून गेले. त्यांनी शेकहॅन्डसाठी हात पुढे न करता अनिल कपूरला मिठी मारली!

अनिल कपूरच्या आयुष्यातील ही सर्वात सुंदर आणि संस्मरणीय घटना होती. ‘गांधी माय फादर’ हा चित्रपट ३ ऑगस्ट २००७ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला माफक यश मिळाले परंतु समीक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.