स्ट्रगलच्या काळात अनिल कपूर हा राज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होता…

बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी हजारो लोकं जीवाची मुंबई करायला येत असतात. वर्षानुवर्षे काम करूनही काहींना हवं तस काम मिळत नाही, काहींना एका झटक्यात यश मिळतं. खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंतचा स्ट्रगल ऍक्टर लोकांनी काढला आणि पुढे ते यशस्वी झाले याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असाच किस्सा आहे अनिल कपूरचा जाणून घेऊया.

अनिल कपूर हा आपल्याला झकास भिडू म्हणून माहीत आहे. बॉलिवूडचा आजवरचा सगळ्यात तरुण अभिनेता म्हणून त्याची खिल्लीही उडवली जाते. पहिला सिनेमा मिळाल्यानंतर अनिल कपूरला लोकं ओळखू लागले खरे पण त्याआधी अनिल कपूर मुंबईत नशीब आजमावायला आला तेव्हा त्याच्या राहण्याची पंचाईत होती. राहणार काय, खायचं काय असे सगळे प्रश्न त्याच्याभोवती निर्माण झाले होते.

अनिल कपूरचे वडील सुरेंद्र कपूर हे मुंबईत आले. अनिल कपूरचे वडील हे राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे नातेवाईक होते. आता अशा परिस्थितीत अनिल कपूरच्या राहण्याचा प्रश्न छेडला गेला तेव्हा त्याची राहण्याची व्यवस्था हि राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये करण्यात आली. या गॅरेजमध्ये अनिल कपूर सुरवातीची काही वर्षे राहिला.

पुढे १९८३ साल उजाडलं. वो सात दिन नावाचा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात अनिल कपूर झळकला. अनिल कपूरचं हे बॉलिवूडमधील पहिलंवहिलं पदार्पण होतं. नासिरुद्दीन शहा, पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत अनिल कपूरही या सिनेमामध्ये दिसला. यानंतर अनिल कपूरने राज कपूर यांच्या गॅरेजची जागा सोडली. पण याच गॅरेजने अनिल कपूरला संघर्षाच्या काळात महत्वाची साथ दिली, निवारा दिला.

पहिल्या सिनेमामध्ये लोकांकडून अनिल कपूरचं चांगलंच कौतुक झालं आणि हळूहळू इंडस्ट्रीत तो स्थिरावू लागला. सिनेमे मिळू लागल्यावर अनिल कपूरने राज कपूर यांचं गॅरेज सोडलं आणि त्याने मुंबईच्या निमशहरी भागात एका चाळीमध्ये भाड्याने एक रुम घेतली आणि तिथे तो राहू लागला. पुढे यशस्वी अभिनेता झाल्यावरही अनिल कपूर त्या गॅरेजमधल्या दिवसांची आठवण सांगतो. 

अनिल कपूरच्या या गॅरेजच्या दिवसांमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला करिअरबाबतीत महत्वाची साथ दिली. सुनीता तिचं नाव आणि हि गर्लफ्रेन्ड पुढे अनिल कपूरची बायको बनली. बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत असताना अनिल कपूरकडे टॅक्सी करण्याइतकेही पैसे नसायचे, अशावेळी त्याची गर्लफ्रेंड त्याला आर्थिक मदत करत असे.

अनिल कपूर स्ट्रगल करत असताना त्याची गर्लफ्रेंड सुनीता हि मॉडेल होती. अनिलच्या करियरमध्ये तिचा सिंहाचा वाटा होता. पैसे नसल्यामुळे अनिल कपूर लग्नासाठी टाळाटाळ करायचा. पुढे अनिल कपूरला सुभाष घईंचा मेरी जंग नावाचा सिनेमा मिळाला आणि त्याचे पैसे मिळाल्या मिळाल्या दोघांनी लग्न करून टाकलं. 

तेजाब, मिस्टर इंडिया, बेटा, राम लखन अशा अनेक सिनेमांमधून अनिल कपूरचा जलवा पाहायला मिळाला. अल्पावधीतच तो लोकांचा फेव्हरेट हिरो बनला आणि अजूनही तो बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे टिकून आहे. अजूनही त्याला सिनेमे मिळतात, त्याच्या बरोबरीचे हिरो आता घरी बसलेले आहेत.

आजही मुलाखतींमध्ये अनिल कपूर आपल्या स्ट्रगलची स्टोरी सांगताना त्या गॅरेजमधल्या दिवसांची आठवण सांगताना विसरत नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.