आज कोट कोट रुपये मिळवणाऱ्या महिला क्रिकेटर्ससाठी मंदिरा बेदी धावून आली होती…

नुकताच महिलांच्या आयपीएलसाठी लिलाव पार पडला, भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं ३.४० कोटी देत आपल्या संघात घेतलं, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा अशा अनेक खेळाडू कोट्याधीश झाल्या. भारतीय महिला क्रिकेटर्स सोबतच परदेशी महिला क्रिकेटर्सचीही चांदी झाली. वुमन्स आयपीएलमुळं महिला क्रिकेटचं चित्र कसं बदलणार याबद्दल डीपमध्ये नंतर कधीतरी, पण आत्ता किस्सा आहे मंदिरा बेदीचा.

मंदिरा बेदी, नुसतं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतंय.

मॅचच्या आधीचा टीव्ही शो मन लाऊन बघण्याचं कारण मंदिरा बेदी होती. ज्या जमान्यात लोकांना वाटायचं की महिलांना क्रिकेट कळत नाही, तेव्हा मंदिरानं हे मत खोडून काढलं. तिला क्रिकेट कळायचंच पण ते समजूनही सांगता यायचं.

१९९४ मध्ये शांती नावाच्या सिरियलमध्ये मंदिरानं एका पत्रकाराची भूमिका केली. त्यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्येही छोटासा रोल केला, पण तिची प्रॉपर चर्चा झाली ती ‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळं.

वर्ल्डकपमध्ये मंदिरा टीव्हीवर दिसली आणि क्रिकेट बघणं आणखी भारी झालं. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये भारत फायनलला हरला, पण मंदिरा जिंकली होती…

२००३ मध्ये पुरुषांचा वर्ल्डकप पार पडला आणि २००४ मध्ये भारताच्या वुमन्स टीमची वेस्ट इंडिज विरुद्ध सिरीज होती. तेव्हा वांदा हा होता की भारताच्या वुमन्स टीमला कुणी स्पॉन्सरच नव्हतं. दुर्दैव इतकं होतं की, त्याआधी भारताच्या वुमन्स टीमला शेवटचा स्पॉनर मिळाला होता तो १९९७ च्या वर्ल्डकपवेळी. भारतातच झालेल्या या वर्ल्डकपवेळी हिरो होंडा स्पॉन्सर म्हणून मदतीला धावलं होतं.

पण या सिरीजवेळी टीमला स्पॉन्सर मिळेना झाला होता, तेव्हा पुढं आली मंदिरा बेदी.

त्यावेळी मंदिरा ‘अस्मी’ नावाच्या एका डायमंड कंपनीची ब्रँड अँबॅसिडर होती. वर्ल्डकपमुळं ती आधीच लोकप्रियतेच्या शिखरावर होती. अशावेळी चांगल्या ब्रँडचा चेहरा असणं हे तिच्या करिअरसाठी महत्त्वाचं होतंच.

पण मंदिरानं या पैशांवर पाणी सोडायचं ठरवलं. हे पैसे स्वत:कडे घेण्याऐवजी तिनं भारतीय वुमन्स टीमला स्पॉन्सरशिप देण्याचं सुचवलं.

अस्मी ब्रँडनंही यासाठी होकार दर्शवला, त्यांनी वुमन्स टीमला स्पॉन्सरशिप दिली. सगळ्या प्लेअर्सच्या बॅटवर अस्मीचा लोगो झळकू लागला. वुमन्स क्रिकेटला प्रचंड गरजेची असलेली आर्थिक मदत मिळाली. अस्मीचं ब्रॅण्डिंग झालं कारण त्यांना अकरा प्लेअर्स आणि भारताचं क्रिकेट हे दोन मोठ्ठे ब्रँड अँबॅसिडर मिळाले होते. अस्मीनं फक्त बॅट्सलाच स्पॉन्सरशिप दिली नाही, तर वुमन्स क्रिकेट असोसिएशननं सिरीजमधल्या ट्रॉफीलाही अस्मी ब्रँडचंच नाव दिलं.

थोडक्यात जे आत्ता पेटीएम, मास्टरकार्ड सारख्या कंपन्या करतायत ते तेव्हा अस्मीनं केलं होतं.

पुढे जाऊन वुमन्स क्रिकेटला आणखी स्पॉनर्स मिळत गेले. याचा फायदा असा झाला की महिलांच्या संघाला जास्तीत जास्त मॅचेस खेळायला मिळू लागल्या. कारण त्याआधी मॅचेसची संख्या जास्त नव्हती, म्हणून स्पॉनर्स मिळत नव्हते आणि स्पॉनर्स नव्हते म्हणून जास्त मॅचेस खेळताही येत नव्हत्या. अडचणी इतक्या होत्या की महिला क्रिकेटर्सना मॅचेससाठी सेकण्ड क्लासच्या डब्यातून प्रवास करावा लागायचा.

मंदिरा बेदीच्या पुढाकारामुळं अस्मीनं दिलेली ही स्पॉन्सरशिप वुमन्स क्रिकेटची कोंडी फोडणारी ठरली.

सध्याच्या घडीला पाहिलं, तर भारताच्या वुमन्स टीमनं मैदानात प्रचंड यश तर मिळवलं आहेच पण सोबतच कित्येक मुलींना क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहनही दिलंय.

अर्थात ही सगळी परिस्थिती काय एका रात्रीत बदललेली नाही. वुमन प्लेअर्सनं केलेले कष्ट, त्याग या गोष्टी आहेतच. पण थोडंसं योगदान मंदिरा बेदीचंही आहे, जिनं करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आपल्याला मिळणारे पैसे महिला प्लेअर्सना द्यायला लावले.

तिनं टीव्ही शो मधून स्वतःचा ब्रँड निर्माण केलाच पण सोबतच या एका कृतीतून मंदिरा बेदी खऱ्या अर्थानं लार्जर दॅन लाईफ ठरली.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.