भरतनाट्यम सोडून मितालीनं क्रिकेट निवडलं त्यामुळे लाखों पोरींच नशिब बदललं…

कपिलदेव पासून ते गावसरकर अन् गांगुली पासून ते तेंडुलकर, कोहली, धोनी, द्रविड..

यादी खूप मोठ्ठी आहे. पोरगं जन्माला आलं आणि चालायला लागलं की बॅड घेवून गल्लीच्या कोपऱ्यावर जातं ते यांच्यामुळेच. मग कपिलदेवला पाहून कोणी गांगुली होतं तर गावसकरला पाहून कोणी तेंडुलकर होतं..

अशा काळात पोरींच काय…?

पोरींकडे खूप ऑप्शन आहेत. भरतनाट्यम् आहे, संगीत आहे, गाणी आहेत, सिनेमा आहे…

आत्ता या गोष्टी वाईट आहेत अस आम्ही म्हणत नाही, पण या पोरींनी करायच्या चाकोरीतल्या गोष्टी आहेत याबद्दल कोणाचं दुमत नसणार आहे. अशीच वेळ तिच्यावर पण आली होती. पण या पोरींन भरतनाट्यमचा पर्याय सोडून क्रिकेटचा पर्याय स्वीकारला आणि इतिहास घडला..

तिचं नाव मिताली राज.. तिने शब्दश: क्रिकेटवर राज केलं.. म्हणूनच तिचा उल्लेख भारताची तेंडुलकर म्हणून केला गेला. खरतर ही गोष्ट पण तिच्यावर केलेला अन्यायच म्हणायला हवी. कारण ती तेंडुलकर नव्हती.

तिची अशी स्वत:ची ओळख होती अन् ती क्रिकेटर मिताली राज अशीच होती..

मितालीचा जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानातील जोधपूरमध्ये झालेला. तिचे वडील धीरज राज डोराई भारतीय वायुसेनेत वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत होते नंतर त्यांनी बँकेत नोकरी मिळवली. तर आई लीला राज देखील एक अधिकारी होत्या.

शाळेत असताना मितालीला नृत्याची फार आवड होती. तिने भरतनाट्यम नृत्याची ट्रेनिंग घेतलेली आणि अनेक स्टेज कार्यक्रम देखील केलेले.

मात्र तुमच्या आमच्याप्रमाणे तिलाही एक वाईट सवय होती, ती म्हणजे आळशीपणा.

वडील वायुसेनेतील म्हणल्यावर ते एकदम कडक शिस्तीचे. त्यांना मितालीचा आळशीपणा अजिबात आवडायचा नाही. त्यांची इच्छा होती की, आपली मुलगी खेळ मैदानात देखील पुढे असावी. ते स्वतः एक क्रिकेटर होते.

मितालीच्या भावाला क्रिकेटची ट्रेनिंग दिली जायची तेव्हा ती पण त्याच्यासोबतच असायची. त्याच्या प्रॅक्टिसमध्ये चान्स मिळाला की ती पण एखादा बॉल टोलवून द्यायची. ही गोष्ट कोच निरखून बघायचे आणि एक दिवस त्यांनी वडिलांना सांगितले की, ही एक मोठी खेळाडू बनू शकेल.

यावर त्यांनी सहमती दर्शवत मितालीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं.

वयाच्या दहाव्या वर्षापासून मितालीने क्रिकेट ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली. आपल्या क्रिकेट ट्रेनिंगमुळे तिला भरतनाट्यमच्या क्लासेसपासून बराच काळ दूर राहावं लागायचं.

तेव्हा तिच्या भरतनाट्यम प्रशिक्षकांनी तिला भरतनाट्यम आणि क्रिकेट पैकी काही एक निवडण्याच्या सल्ला दिला.

मितालीने क्रिकेट निवडलं आणि ते योग्य ठरवत इतिहास घडवला.

१९९९ मध्ये सचिनप्रमाणे फक्त साडे सोळा वर्षांची असतांना तिने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केलं. पर्दापणातील आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये दमदार नाबाद ११४ धावा काढून क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. पुढे २००२ मध्ये ती इंग्लंड विरुद्ध पहिली टेस्ट मॅच खेळली.

ज्यात तिने २१४ धावा कुटल्या. जो महिला टेस्ट क्रिकेट मधील दुसरा सर्वात मोठा स्कोर आहे.

त्यानंतरही तिची घोडदौड चालूच राहिली.  सर्वाधिक वनडे खेळण्याचा आणि वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन्स बनवण्याचा विक्रम तिच्याच नावावर आहे. आत्तापर्यंत ती २०३ वनडे खेळली असून त्यात ५१.३८च्या सरासरीने ६,७३१ रन्स काढले आहेत.

२०० मॅचेस खेळणारी ती जगातील एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय ती टी-२० मध्ये ८९ मॅचेस खेळली असून त्यात २,३६४ रन्स काढले आहेत.

मितालीने २० वर्षांच्या कारकिर्दीत १३२ मॅचेस मध्ये टीमचं नेतृत्व केलेलं. ज्यात भारतने ८२ मॅचेस जिंकल्या तर ४७ मॅचेसमध्ये पराभव बघावा लागला. त्यात जिंकण्याचं प्रमाण ६३.५६ टक्के इतकं राहिलेलं.

मितालीच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट टीम २०१७ च्या फायनलमध्ये पोहचली होती.

२०१५ साली तिला केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय अर्जुन अवॉर्डसह इतर अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. बीबीसीने २०१७ साली जाहीर केलेल्या जगभरातील १०० स्त्रियांच्या यादीत मितालीचा समावेश केला होता.

सहा वर्ल्डकप खेळलेली, T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक 2 हजार धावा करणारी, वनडे मध्ये भारतासाठी सर्वाधिक ७ हजार ८०५ रन्स केलेली आणि सलग २० वर्ष भारताच क्रिकेट गाजवणारी मिताली राजने अखेर सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली.

जसं क्रिकेटमधून सचिन जाणं, गांगुली जाणं, द्रविड जाणं आपल्यासाठी महत्वाच होतं तसच मितालीचं जाणं देखील महत्वाचं वाटावं इतकच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.