एकेकाळी सुनील गावसकर आणि अशोक सराफ नाटकात एकत्र काम करायचे.

१० जुलै १९४९. मुंबई 

मनोहर आणि मीनल गावसकर या जोडप्याला बाळ झालं होतं. मुलगा होता. सगळे जवळपासचे पाहुणे बाळाला बघायला हॉस्पिटलला आले होते. यात होते नारायण मसुरेकर काका. बाळ बाळंतिणीला जनरल वॉर्डात ठेवलेलं. डॉक्टरांनी रागवल्यावर या पाहुण्यांनी थोडी गर्दी कमी केली.

काही दिवसांनी मसुरेकर काका परत एकदा दवाखान्यात चक्कर मारण्यासाठी आले. त्यांनी बाळाला उचललं. त्याला बघताच ते ओरडले,

“हे बाळ आमच नाही. कुठल्या तरी दुसऱ्या मुलाशी याला बदललं गेलंय.”

अख्ख्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ झाला. नेमक झालय तरी काय. बाळाची आई रडू लागली. डॉक्टर नर्स यांच्यात त्रेधा उडाली.

तर झालं काय होतं की तर या काकाची नजर घारीसारखी तेज होती. त्यांनी पहिल्या दिवशी पोराला उचलून घेतलं तेव्हा त्याच्या डाव्या कानाजवळ एक भोक असलेलं त्यांनी टिपलं होतं. त्यादिवशी परत आल्यावर ते कानाजवळचं भोक दिसलं नाही. याचा अर्थ बाळ बदललय. गावसकरांचा हा मुलगा नव्हे.

सगळीकडे शोध घेतला तेव्हा त्याच वॉर्डात एका कोळीणीच्या शेजारी शांत निवांत ते बाळ झोपलेलं आढळल. सगळ्या बाळाना अंघोळ घालायच्या वेळी नर्सने चुकून मुलांची अदलाबदल केली होती. त्या दिवशी नारायण मसुरेकर यांच्या लक्षात हा गोंधळ आला नसता तर भारताला जगज्जेता बट्समन मिळाला नसता.

त्याच नाव सुनील गावसकर.

मुंबईच्या ताडदेवमधील चिखलवाडी भाग.  सुनीलच्या रक्तातचं क्रिकेट वहात होतं. त्याचे वडील हे क्लबलेव्हल चे क्रिकेटर होते पण त्याचा मामा माधव मंत्री हा  भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला होता. त्याहून महत्वाच सुनीलची आई मीनल ही क्रिकेट वेडी होती.

अगदी लहानपणी सुनील आणि त्याच्या मित्रांबरोबर ती क्रिकेट खेळायची. कोणी नसेल तर ती सुनील ला बॉल टाकायची आणि त्याच्या बहिणी फिल्डिंग करायच्या. एकदा तर सुनीलने मारलेल्या बॉल लागून तिच्या नाकाचा घोळना फुटला. पूर्ण चेहरा रक्ताने माखला. सुनील घाबरून रडू लागला. पण तीने त्याला शांत केले, काहीही झालं नसल्याप्रमाणे जाऊन आपला चेहरा धुतला व परत बॉलिंग करू लागली.

फक्त सुनीलच्या घरातचं नव्हे तर अख्ख्या चिखलवाडीमध्ये क्रिकेट हा एका धर्म असल्याप्रमाणे होता.

त्याकाळच्या मुंबई रणजी टीमपैकी निम्मे तरी प्लेअर्स त्या भागातले होते. सुनीलची भागीरथी बिल्डींग असो वा शेजारपाजारील ग्राउंड. बघेल तिथे फक्त आणि फक्त क्रिकेट खेळल जायचं.  सुनीलचं शालेय क्रिकेटपासून तिथे बरच नाव होतं.

इंग्लंडमधून आलेल्या स्कूलबॉयज टीमची त्याने त्याकाळात पिटाई केली होती. शालेय स्तरावरचा मुंबईचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देखील त्याला मिळाला.

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ सुद्धा तेव्हा चिखलवाडी मध्येच राहायला होते. ते सांगतात,

“लहानपणी बऱ्याचदा रविवारी सुनीलची टीम विरुद्ध आमची टीम अशी क्रिकेटची मॅच व्हायची. त्यात खेळायचा सुनीलचं. आमच काम फक्त बॉल शोधून आणणे इतकच असायचं. तो कधीच आउट व्हायचा नाही. त्याकाळातही त्याचे शॉटस, त्याचा स्टान्स याची चर्चा असायची.”

खर तर सुनील गावसकर आणि अशोक सराफ यांनी गणपतीमध्ये एका नाटकात एकत्र सुद्धा काम केलं होतं. नाटकाच नाव होतं गुरुदक्षिणा. यात गावसकर कृष्ण तर अशोक सराफ यांनी त्याच्या मोठ्या भावाची म्हणजेच बलरामाची भूमिका केली होती.

पुढे सुनील गावसकर कॉलेजमध्ये गेल्यावरही सुनीलने क्रिकेटमध्ये आपल नाव गाजवलं. त्याच्यावर त्याचे मामा माधव मंत्री यांचा पूर्ण प्रभाव होता. तेच त्याचे कोच गुरु मार्गदर्शक सगळ काही होते. 

एकदा तो आपल्या मामांच्या घरी गेला होता तेव्हा त्याने त्यांच्या कपाटात भारतीय संघाची टोपी बघितली. ती त्याने मागितली. पण माधव मंत्री यांनी त्याला नकार दिला,

“बाळा ही कॅप अशी मिळत नाही.ती कमवावी लागते. तुही कष्ट कर, भारताच्या टीममध्ये सिलेक्ट हो आणि ती कॅप मानाने घाल .”

सुनील गावसकर आयुष्यात कधीच ही घटना विसरू शकला नाही. त्याने जबरदस्त मेहनत घेतली, प्रत्येक सामन्यात खोऱ्याने धावा गोळा करतच राहिला. त्याच्या या कामगिरी मुळे मुंबईच्या रणजी टीममध्ये सिलेक्ट झाला. त्याकाळात माधव मंत्री रणजीच्या निवड समिती मध्ये होते.

पुढे जेव्हा गावसकरची पहिली रणजी मॅच कर्नाटकविरुद्ध झाली त्यात तो डक वर आउट झाला. लोक म्हणाले मामाच्या वशिल्याने संघात आलेल्या खेळाडूकडून दुसरी काय अपेक्षा असणार?

सुनीलच्या मनाला ही गोष्ट फार लागली. त्याने तिथून पुढे लगेचच झालेल्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज शतक ठोकले आणि यानंतर झालेल्या प्रत्येक सामन्यात त्याची सेंच्युरी होती. सलग तीन शतकानंतर त्याची निवड सरळ भारतीय टीममध्ये झाली.

१९७० साली वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या संघात सुनील गावसकर यांचा समावेश होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.