इम्रान खाननं दिलेल्या धोक्यामुळं वसीम अक्रमनं व्हिव्ह रिचर्ड्सचा बॅटनं मार खाल्ला असता…

आपल्या जिंदगीत एक वांड दोस्त असतोय, जो असतोय बोलबच्चन. टेबलावरचा कार्यक्रम एकदम गच्च झाला की या भावाला गाडी चालवायची हुक्की येते, खिशात १०० रुपये असले तरी बिल भरण्याचं आश्वासन हा देऊ शकतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडणाच्या वेळी ‘मी आहे ना, तू नड’ असं म्हणूनही हाच शेपूट घालून गायब होत असतोय.

असाच किस्सा एकदा क्रिकेटच्या मैदानावर झालेला, जेव्हा बोलबच्चन देणारा कार्यकर्ता होता इम्रान खान, ज्याला हवा मिळाली तो होता वसीम अक्रम आणि मॅटरच्या केंद्रस्थानी होता व्हिव्हियन रिचर्ड्स.

नेमका मॅटर असा झालेला की, हातात बॅट घेऊन व्हिव्ह रिचर्ड्स वसीम अक्रमला मारायला आलेला, तेही पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुम बाहेर…

गोष्ट एवढ्या हाणामारीपर्यंत गेली कारण मैदानात झालेला राडा तसाच होता…

आधी जरा बॅकग्राउंड बघू. सर व्हिव्ह रिचर्ड्स म्हणजे जागतिक क्रिकेटचा बादशहा. च्युईंगम चघळत याची मैदानावर एंट्री झाली की, सगळी दुनिया स्तब्ध व्हायची. त्याच्या बॅटिंगमध्ये किती टेरर होता, हे सांगण्याची कधी गरजही पडत नाही.

 स्टोरीमधलं दुसरं नाव होतं, इम्रान खान. चिकनाचोपडा पण तितकाच खुंखार ऑलराऊंडर. हा सगळा पिक्चर घडला, तेव्हा इम्रानच पाकिस्तानी टीमचा कॅप्टन होता. 

तिसरं लीड कॅरॅक्टर म्हणजे वसीम अक्रम. तेव्हा अक्रम वयानं लहान होता, पण स्पीडच्या बाबतीत खतरा. अचूकता आणि भेदकता या दोन गोष्टींमुळं त्याची सगळ्याच बॅट्समन्सवर जरब बसली होती.

आता मॅचकडे येऊ, एप्रिल १९८८. पाकिस्तान वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होतं. सिरीजची पहिली टेस्ट पाकिस्ताननं जिंकली, दुसरी टेस्ट झाली ड्रॉ.

विंडीजच्या इज्जतीचा प्रश्न होता, त्यामुळं त्यांनी तिसऱ्या टेस्टला बार्बाडोसची विकेट एकदम ग्रीन टॉप बनवली. माल्कम मार्शल, कर्टली अम्ब्रोस  आणि कर्टनी वॉल्श अशा तीन तोफा कॅप्टन व्हिव्ह रिचर्ड्सनं सेट केल्या होत्या. इम्रान खानकडंही वसीम अक्रम नावाची नाद तोफ होतीच.

पहिली बॅटिंग आली पाकिस्तानची. त्यांच्या बॅट्समननं टिकून राहण्याचं काम केलं आणि कसेबसे ३०९ रन्स बोर्डावर लावले, मार्शलनं किरकोळीत चार विकेट्स घेतल्या होता. विंडीजची नौका ३०६ रन्सपर्यंत पोहोचली, वसीम अक्रमनं रिचर्डसन, रिचर्ड्स आणि कार्ल हुपर अशा तीन मेन विकेट्स खोलल्या होत्या.

दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानला माल्कम मार्शल नावाच्या भुतानं झपाटलं आणि त्यांचा डाव २६२ वर संपला. विंडीजला जिंकायला २६६ रन्स हवे होते. वसीम अक्रमनं डेसमंड हेन्सला खोलत पहिला झटका दिलाच होता. त्यानंतर त्याचा सामना झाला व्हिव्ह रिचर्ड्सशी.

रिचर्ड्स स्विंगला दाद देणार नाही हे साहजिक होतं. अक्रमनं आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरला तो म्हणजे बाऊन्सर्स.

अक्रमचा क्वालिटी बाऊन्सर इतका जोरात गेला की तो चुकवायच्या नादात रिचर्ड्सची टोपी खाली पडली. अक्रमला बादशहा झाल्याची फिलिंग आली, तो थेट रिचर्ड्सला जाऊन बोलला,

“क्रिकेट खेळता येत नाही?”

हाडकुळी तब्येत असलेलं किरकोळ पोरगं व्हिव्ह रिचर्ड्सला क्रिकेट खेळण्याबाबत विचारत होतं. रिचर्ड्स होतं आडव्या डोक्याचं ते सनकलं. अक्रमला म्हणला, ‘Don’t do this with me man. I Will beat you up.’ हा तगडा राक्षस आपल्याला खरंच हाणू शकतोय हे समजल्यामुळं अक्रमच्या फ्युजा उडाल्या. तो गेला आपला कॅप्टन इम्रान खानकडं.

इम्रान त्याला म्हणला, ‘तू डर मत, बाऊन्सर्स डालता रेह.’

कॅप्टननं एवढी हवा दिली होती, त्यामुळं ह्यो गडी आणखी चेकाळला. परत बाऊन्सर टाकला, परत टोपी खाली पडली आणि आगाऊपणा करत रिचर्ड्सला बडबड केली. तो दिवस पुढच्या काही बॉलपर्यंत तरी अक्रमचाच होता, कारण त्यानं रिचर्ड्सला बोल्ड केलं. बोल्ड केल्यावरही बडबड करत सेंडऑफ दिला.

पुढं मात्र पाकिस्तान गंडलं, दहाव्या नंबरला आलेल्या विन्स्टन बेंजामिननं मॅच काढून दिली आणि विंडीज जिंकलं. सिरीज ड्रॉ झाली.

मॅच संपल्यावर अक्रम आपल्या ड्रेसिंग रुममध्ये गेला, तेव्हा एक माणूस त्याला बोलवायला आला आणि सांगितलं कुणीतरी तुला भेटायला आलंय. अक्रम आधी माज दाखवत नाही म्हणाला, पण शेवटी बाहेर गेलाच.

बाहेर दुसरं तिसरं कोण नाही, तर अंगावर टी शर्ट नसलेल्या अवस्थेत, हातात बॅट घेऊन व्हिव्ह रिचर्ड्स उभा होता.

अक्रमची बेक्कार फाटली, तो पळत इम्रान खानकडे आला आणि रिचर्ड्स आपल्याला मारायला आलाय हे सांगितलं.

मैदानात अक्रमच्या फुग्यात हवा भरणाऱ्या इम्राननं त्याला खतरनाक उत्तर दिलं,

 “भाई तुम्हारी लढाई है, तुम जाके लढो.” 

काही नाही होत, तू टाक बाऊन्सर्स… असं म्हणणाऱ्या इम्राननं अक्रमला गुलीगत धोका दिलेला. अक्रमला काय सुधारलं नाही, तो रिचर्ड्सकडे गेला आणि थेट त्याचे पाय धरले. इज्जतमध्ये माफी मागितली आणि परत असं करणार नाय म्हणला.

रिचर्ड्स रागातच होता, तो एवढंच म्हणला, “परत असं केलंस तर जीव घेईन तुझा.”

मॅटर निवळला, पण त्यानंतर अक्रम काय रिचर्ड्सच्या नादाला लागला नाय. कारण इम्रानच्या फुगीरीमुळं त्यानं केलेला नाद चांगलाच वाया गेला होता.

नाही म्हणायला त्या मॅचमध्ये एक हाणामारी झालीच होती, पाकिस्तानच्या अब्दुल कादिरनं एका फॅनला हाणला होता, त्या फॅनचं नशीब खराब होतं, अक्रमचं तेवढं चांगलं निघालं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.