पंतप्रधानांनी ज्या स्टॅचूचं उदघाटन केलं, ते संत नेमके आहेत तरी कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत रामानुजाचार्य यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ चं उदघाटन केलं. हैदराबादमधला संत रामानुजाचार्य यांचा हा स्टॅच्यू जगातला सगळ्यात मोठा सीटिंग स्टॅच्यू असल्याचं म्हटलं जातंय, ज्याची उंची २१६ फूट असल्याचं समजतंय. हा स्टॅच्यू सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांचं मिश्रण असलेल्या ‘पंचधातू’पासून बनलेला आहे, ज्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं समजतंय.
संत रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यूची ही कन्सेप्ट श्री रामानुजाचार्य आश्रमाचे श्री चिन्ना जेयर स्वामी यांनी केलीये, हा स्टॅच्यू ४० एकर क्षेत्रात बसवण्यात आलाय. तसेच १२० किलो सोन्याचा वापर करून आचार्यांची छोटी मूर्तीही तयार करण्यात आली आहे. अश्या या बड्या स्टॅच्यूची अख्ख्या देशात चर्चा होतेय. पण ज्यांचा एवढा मोठा स्टॅच्यू उभारण्यात आलाय, त्यांच्याबद्दल मात्र अनेकांना माहितीही नाही.
तसं पाहिलं तर आपल्या भारत भूमीत अनेक संत-महात्म होऊन गेले. ज्यांनी आपल्या चांगल्या आचरणाने आणि कर्माने लोकांना संदेश दिला. अनेक वर्षे इतर लोकांना धर्माच्या मार्गाने जोडण्याचे काम केले. असेच एक महान संत म्हणजे श्री रामानुजाचार्य .
हिंदू मान्यतेनुसार, त्यांचा जन्म १०१७ मध्ये तामिळनाडूच्या श्री परमबुदूर इथल्या ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव भट्ट. रामानुजाचार्य खूप लहाने होते, तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनतर त्यांनी कांची येथील यादवप्रकाश गुरूंकडून वेद शिकले.
हिंदू पुराणानुसार, रामानुजाचार्य यांचे आयुष्य सुमारे १२० वर्षे होते. रामानुजम यांनी जवळपास नऊ पुस्तके लिहिलीत, ज्यांना नवरत्न म्हणतात. ते आचार्य अलवंदर यमुनाचार्य यांचे प्रमुख शिष्य होते. गुरूंच्या इच्छेनुसार रामानुजांनी त्यांच्याकडून तीन गोष्टी करण्याचा संकल्प केला होता. पहिले ब्रह्मसूत्र, दुसरे विष्णु सहस्रनाम आणि तिसरे भाष्य दिव्य प्रबंध लिहिणे.
रामानुजाचार्य अतिशय विद्वान आणि उदार होते. चारित्र्य आणि भक्तीमध्ये ते अद्वितीय होते. त्यांना योगसिद्धीही होती. ‘श्रीभाष्य’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहे. जे पूर्णपणे ब्रह्मसूत्रावर आधारित आहे. याशिवाय वैकुंठ गद्यम्, वेदांत सार, वेदार्थ संग्रह, श्रीरंग गद्यम्, गीता भाषा, नित्य ग्रंथम, वेदांत दीप, इत्यादी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथ आहेत.
रामानुजाचार्य हे श्रीयमुनाचार्यांच्या शिष्य परंपरेतील होते. जेव्हा श्रीयमुनाचार्य यांचा मृत्यू जवळ आला तेव्हा त्यांनी रामानुजाचार्य यांना त्यांच्या शिष्याद्वारे बोलावले पाठवलं, परंतु रामानुजाचार्य येणार तोवर श्रीयामुनाचार्य यांचे निधन झाले. तिथे पोहोचल्यावर रामानुजाचार्य यांनी पाहिलं की, श्रीमुनाचार्यांची तीन बोटे वाकलेली आहेत.
रामानुजाचार्यांना समजले की, श्रीयामुनाचार्य यांना ‘ब्रह्मसूत्र’, ‘विष्णुसहस्त्रनाम’ आणि अलवंदरांचे ‘दिव्य प्रबंध’ यांचं ज्ञान मिळवायचं आहे. त्यांनी श्रीयमुनाचार्यांच्या मृतदेहाला नमन केले आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली.
रामानुजाचार्य यांनी श्रद्धा, जात यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समानतेचा विचार मांडला होता. त्यामुळेच त्यांच्या या स्टॅच्युला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असं नाव देण्यात आलंय .
वयाच्या १६ व्या वर्षी रामानुजाचार्य यांनी सर्व वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. पुढे त्यांनी गृहस्थाचा आश्रम सोडला आणि श्रीरंगमच्या अग्रराज भिक्षूकडून दीक्षा घेतली. म्हैसूरमधील श्रीरंगम येथून गेल्यानंतर रामानुजाचार्य शालग्राम नावाच्या ठिकाणी राहू लागले. रामानुजाचार्य यांनी त्या भागात १२ वर्षे वैष्णव धर्माचा प्रचार केला, त्यानंतर त्यांनी वैष्णव धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण देशाचा दौरा केला.
हे ही वाच भिडू :
- छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातला सर्वात मोठा पुतळा महाराष्ट्राच्या या अवलियाने घडवलाय…
- दिल्लीत सुभाषबाबूंचा पुतळा ज्या जागेवर उभारण्यात येणार आहे त्यालाही इतिहास आहे
- चौकात पुतळा बसवायचा आहे ? नेमकी प्रक्रिया काय आहे ते बघा