कसब्यातून मैदानात उतरलेल्या हेमंत रासने यांची राजकीय ताकद किती आहे…
मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा आहे ती कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूका लागल्या आणि शर्यत रंगली ती उमेदवारी कुणाला जाहीर होणार याची.
कसबा पेठ हा तर भाजपचा बालेकिल्ला. १९९५ पासून सलग ५ टर्म गिरीश बापट या मतदारसंघाचे आमदार होते, त्यांची खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर माजी महापौर मुक्ता टिळक कसब्याच्या आमदार झाल्या, तेही जवळपास २८ हजारांचं मताधिक्य घेऊन.
पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, मात्र भाजपनं नाव जाहीर केलं नगरसेवक हेमंत रासने यांचं.
टिळक कुटुंबातली दोन नावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अशी ओळख असणारे धीरज घाटे यांना पिछाडीवर टाकत उमेदवारीची माळ रासने यांच्या गळ्यात पडलीये आणि साहजिकच चर्चा सुरु झालीये ती रासने यांच्या राजकीय ताकदीची.
२००२ मध्ये रासने पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकांमध्येही त्यांनी यश मिळवलं. त्यांच्या प्रभागातला शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ हे भाग आहेत. जुने वाडे, ट्रॅफिकची समस्या आणि पाणीपुरवठा या स्थानिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेमुळे रासने कायम चर्चेत राहीले.
मात्र त्यांनी आपला होल्ड प्रस्थापित केला, तो पुण्याच्या महानगरपालिकेवर. महानगर पालिकेची आर्थिक तिजोरी म्हणजेच स्थायी समिती. २०१९ मध्ये रासने पहिल्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पुणे महानगर पालिकेत कुठल्याच नगरसेवकाला स्थायी समितीच्या अध्यक्षपदी दोनदा संधी मिळाली नव्हती, मात्र हेमंत रासने यांनी सलग चार टर्म स्थायी समितीचं अध्यक्ष भूषवलं.
सत्ताधारी भाजपकडून अनेक जण इच्छुक असले, तरी स्थायी समितीवर आणि पर्यायानं पुणे महानगरपालिकेवर त्यांचा होल्ड कायम राहिला.
विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट कसबा पेठेचे माजी आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचा प्रभाग कसबा पेठ मतदार संघात येतो, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांचाही प्रभाग कसबा मतदारसंघात आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून संधी मिळालेल्या हेमंत रासने यांचाही. एवढी सगळी ताकद भाजप एकाच मतदारसंघात लावत असल्यानं पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चा होऊ लागल्या, त्यातून इतरांचे पत्ते कट झाले मात्र हेमंत रासने यांचं पद पक्षाच्या हायकमांडकडून कायम ठेवण्यात आलं.
स्थानिक राजकारणातही हेमंत रासने यांचा दबदबा आहे, याचं कारण म्हणजे त्यांचा प्रभाग येतो शनिवार आणि सदाशिव पेठेत. या दोन्ही पेठामध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अधिक आहे, जे भाजपचे पारंपारिक मतदारही आहेत. पूर्ण कसबा पेठ मतदारसंघाचंच बोलायचं झालं, तर इथंही ब्राह्मण टक्का आणि भाजपचे पारंपारिक मतदार मोठ्या संख्येनं आहेत, ज्याचा रासनेंना साहजिकच फायदा होऊ शकतो.
रासने यांची ताकद तगडी असण्याचं कारण म्हणजे पुण्यातली गणेशोत्सव मंडळं
पुण्यात येणारे मोठे राजकीय नेते किंवा उच्चपदस्थ हे हमखास दगडूशेठ गणपतीला भेट देतात. या ट्रस्टला वर्षाकाठी काही कोटी रुपये दानातून मिळतात. हेमंत रासने हे दगडूशेठ गणपती ट्रस्टचे ट्रस्टी आहेत, वेगवेगळ्या पदांवर कामही केलं आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांपासून राज्यातले नेतेही पुण्यात आल्यावर दगडूशेठ गणपतीला भेट देतात त्यावेळी साहजिकच हेमंत रासने यांचा त्यांच्याशी थेट संबंध येतो. त्यामुळं सगळ्याच नेत्यांशी चांगले संबंध ठेवणं त्यांना जमत असल्याची चर्चा असते.
सोबतच पुण्यात मोठ्या संख्येनं असलेल्या गणेशोत्सव मंडळांमध्येही रासने यांची उठबस आहे, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे, ज्याचा फायदा त्यांना या पोटनिवडणुकीसाठी होऊ शकतो.
सोबतच दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टनं स्थापन केलेल्या सुवर्णयुग सहकारी बँकेचेही ते अध्यक्ष आहेत. जवळपास २००९ पासून ते या बँकेच्या संचालक मंडळाचा भाग आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार या बँकेच्या २२ शाखा, १३३५ कोटींचा व्यवसाय आणि ८०९ कोटींच्या ठेवी आहेत.
२०१९ पासून हेमंत रासने हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आहेत, महापालिकेची मुदत संपल्यानंतरही स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे रहावं यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती.
त्यांच्याच कार्यकाळात पुण्यात मेट्रो सुरू झाली, लॉकडाऊनच्या काळातही पुणे महानगरपालीकेनं विक्रमी महसूल मिळवला, नवे रस्ते आणि उड्डाणपूलही उभे राहिले.
या सगळ्या विकासकामांचा कसबा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारात रासने यांना आणि पर्यायानं भाजपला फायदा होऊ शकतो, यासाठीच टिळक कुटुंबियांना डावलून रासने यांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.
हे ही वाच भिडू:
- चर्चा १० वर्ष आणि काम ५ वर्षांत, असा झाला पुणे मेट्रोचा प्रवास
- बँगलोर नंतर ‘आयटी हब’ होण्याचा चान्स पुणे घालवतंय का ?
- काँग्रेसचा गड असणारं पुणे, भाजपचा बालेकिल्ला कसं बनत गेलं..?