बँगलोर नंतर ‘आयटी हब’ होण्याचा चान्स पुणे घालवतंय का ?
आता पुन्हा बँगलोरची पावसामुळे शहराची दाणादाण उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शहरातील रस्त्यांवरून तुडुंब पाणी वाहतेय, त्यामध्ये वाहनं वाहून जात आहेत, बिल्डिंगचं पार्किंग पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. आणि यावर प्रशासनानं उत्तर दिलेलं असतंय शहरं तुंबली नाहीयेत तर पाऊस जास्त झालाय.
त्यात या टेक सॅव्ही शहरांमध्ये हे पूर आल्याने त्यांची जागतिक स्तरावर चर्चा होत आहे.
सप्टेंबर महिन्यात तेव्हा वॉशिंग्टन पोस्टसारख्या पेपर्सनी भारतातील सिलिकॉन व्हॅली पावसाने तुडुंब भरली या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळे भारताची सिलिकॉन व्हॅली अशी जी बॅंगलोरची जी इमेज होती तिला पुरता तडा गेला.
बॅंगलोरमधून जेव्हा IT कंपन्यांचे कर्मचारी पाण्यातून मार्ग काढून ट्रॅक्टरने कामावर पोहचत होते तेव्हा त्यांचे अमेरिकेत बसलेले CEO शहराच्या अवस्थेचे वाजलेले तीन-तेरा त्यांच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर पाहत असणार एवढं नक्की. यात बँगलोरच्या ट्रॅफिकचा विषय, शहरातल्या अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाण्याची टंचाई आणि कोणत्याही प्रकारचं नियोजन नसताना वाढणारं शहर ही बँगलोर पुढची आव्हनं होतीच त्यामध्ये आता या पुराची भर पडली आहे. आधीपासूनच गंभीर होती त्यातच आता या पुराची भर पडली आहे.
१९९० मध्ये जेव्हा बँगलोर अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीला ऑप्शन म्हणून पुढं येत होतं तेव्हा मात्र बंगलोरचं रुपडं असं नव्हतं.
१९९० च्या दशकात बागांचे, तलावांचे आणि अल्हाददायक हवामानाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बॅंगलोरकडे जगातील काही मोठ्या IT कंपन्यांचे हेडक्वार्टर्स आणि त्यांच्याबरोबर लाखो इंजिनिअर्स बँगलोरकडे शिफ्ट होत होते. बेंगलोरच्या हवामानामुळॆ पेंशनर्स प्याराडाइज म्हणून ज्याचा उल्लेख केला जायचा ती गार्डन सिटी बेंगलोर आता एक IT हब म्हणून समोर येत होती. डिक्टो अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाची कॉपी.
मात्र या बदलांचा महानगरावर देखील दीर्घकालीन प्रभाव पडला. शहराच्या IT हब म्हणून पुढे येत असल्याने शहरात पैसा येत होता पण त्याचबरोबर देशभरातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. त्यामुळे शहराची लोकसंख्येने ५५ लाखांचा आकडा ओलांडला होता.
त्यामुळे शहराच्या बांधकाम सेक्टरमध्येही बूम आली होती.
शहराचं काँक्रीटकरण जोरात चालू झालं. १९७० मध्ये बॅंगलोरच्या ६७% भागावर जंगल होतं. १९९० नंतर ते ४७% पर्यंत खाली आलं आणि आता २०२१ मध्ये फक्त ३% जागेवर हिरवळ राहिली आहे. या दरम्यान शहरातील आणि आजूबाजूची तलाव आणि दलदलीच्या जमिनी देखील मोठ्या प्रमाणत बुजवण्यात आल्या. यामुळे तलाव आणि दलदलीच्या जमिनी, जंगलं मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घ्यायच्या मात्र आता ती परिस्तिथी राहिली नाही आणि थोडा जरी जास्त पाऊस झाला तर शहर तुंबू लागलं.
सारखं शहर तुंबण्याचा मोठ्या कंपन्यांना चांगलाच झटका बसू लागला आहे. सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरानंतर मोठ्या कंपन्या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल तक्रार करत आहेत, त्यांचं म्हणणे आहे की त्यांना पुरामुळे एका दिवसात लाखो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.
आऊटर रिंग रोड कंपनीज असोसिएशन (ओआरसीए) च्या मते आऊटर रिंग रोड परिसरात पुरामुळे आयटी कंपन्यांना 225 कोटी रुपयांचे सामूहिक नुकसान झाले होते.
फ्लिपकार्ट, जे पी मॉर्गन, ANZ, सिस्को, इंटेल , आयबीएम , ऍक्सेंचर, गोल्डमन सॅक, मायक्रोसॉफ्ट , सॅमसंग आणि डेलसारख्या कंपन्यांची कार्यालये आऊटर रिंग रोडवर आहेत.
याला जोड आहे बॅंगलोरच्या ट्रॅफिकची. २०१८ मध्ये बँगलोरच्या ट्राफिकमुळे वर्षाला ३८,००० कोटींचं नुकसान झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक कंपन्या आता दुसऱ्या शहरच्या ऑप्शनच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतं. बँगलोरमध्ये सध्या ७९ IT पार्कमध्ये ३५०० IT कंपन्या आहेत. आणि या सर्व सॉफ्टवेअर कंपन्यांची असोशिएशन असलेल्या नॉस्कॉमने NASSCOMने भारतातल्या १५ शहरांची निवड करण्यास देखील केली आहे.
आणि यामध्ये टॉपच्या चॉइसमध्ये आपल्या पुण्याचा नंबर असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससुद्धा पुण्यामध्ये शिफ्ट होण्यास कल दाखवत आल्याचं समोर आलं होतं. ‘Which City Next? 2022: Factors Determining Tech Talent’s Migration in India’ या सर्वेनुसार बँगलोरनंतर कामासाठी म्हणून शिफ्ट होण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर्स पुणे आणि हैद्राबादला पसंती देत आहेत. त्यासाठी पुण्यातली लो लिविंग कॉस्ट, पायाभूत सुविधा, इथलं पर्यावरण या गोष्टींचा हवाला दिला जात आहे.
बँगलोरनंतर दशकभरातच पुण्यामध्ये IT सेक्टर डेव्हलप होण्यास सुरवात झाली होती.
1998 साली जेव्हा IT झोनचा पाया रचला गेला तेव्हा हिंजवडीच्या उभारणीला सुरुवात झाली. 2000 च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारच्या IT/ITes धोरणामुळे शहरातील IT इंडस्ट्रीचा पाया मजबूत झाला. परिणामी हिंजवडी आयटी पार्क म्हणून ओळखले जाणारे राजीव गांधी इन्फोटेक पार्कचे 2800 एकर अस्तित्वात आलं . वेगाने वाढ होत असल्याने हिंजवडी हे लवकरच IT इंडस्ट्रीसाठी एक महत्वाचं गुंतवणुकीचे केंद्र बनलं.
जोडीला पुण्याची एक शैक्षणिक हब असलेली इमेज जोडीला होतीच.
त्यामुळे इथल्या इंजिनेरींग, मॅनेजमेंट कॉलेजेसमधून कुशल मनुष्यबळाचा पुरवठा देखील पुण्याला होत होता. २००२ साली उभा राहिलेला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, २००३ मध्ये हिंजवडीचा फेज ३ मध्ये झालेला विस्तार यामुळे सुरवातीपासून झपाट्याने IT क्षेत्राचा ओढा पुण्याकडे वाढत होता. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर, शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सोयी, बँगलोरसारखच आल्हाददायक वातावरण यामुळे देखील पुणे बंगलोरला स्पर्धा करण्यासाठी समोर येत होतं.
यामुळे पुण्यातही मोठ्या प्रमाणात लोंढे येऊ लागले १९९१ ला १६ लाखाच्या आसपास असणारी पुण्याची लोकसंख्या २०११ पर्यंत ३४ लाखाच्या पलीकडे गेली.
त्यामुळे पुण्यातही मोठ्या प्रमाणात बांधकाम इंडस्ट्रीत बूम आली . टेकड्यांचं शहर, मुळा -मोठा नदीच्या काठावर बसलेल्या हिरव्यागार पुण्यावर याचा दूरगामी परिणाम होऊ लागला. मोठ्या प्रमाणात टेकड्या तोडल्या गेल्या, तिथं अनधिकृत बांधकामाचं लोन पसरलं. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण होऊ लागले. यामुळेच आता थोडा जरी पाऊस जास्त झाला तरी शहर तुंबल्याच्या बातम्या येऊ लागतात.
दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याचं ट्राफिक.
पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी आहे हे आता सर्वमान्य बाब झाली आहे. २०१६ यामध्ये कुठे शिवाजीनगर -हिंजवडी मेट्रो प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात वाहनांची खाजगी वाहनांचा संख्या आणि वापर मोठा आहे. त्यामुळे शहराची ट्राफिक समस्या दिवसेंदिवस गंभीर चालली आहे. चांदणी चौकातलं ट्रॅफिकची तर दिल्लीत नोंद घेतल्यानंतर आता युद्धपातळीवर काम चालू असल्याचं सांगण्यात येत आहे. याचा फटका IT इंडस्ट्रीला देखील बसत आहे.
२०१८ यामध्ये हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशनने दावा केला होता की पुण्याच्या ट्रॅफिकमुळे दिवसाला जवळपास २५ कोटींचा लॉस होत असतो.
त्यामुळे जवळपास बॅंगलोरला जे प्रोब्लेम्स आहेत तेच पुण्यातही असल्याचं समोर येत आहे यामुळे पुण्याला जर बँगलोरशी स्पर्धा करून IT हब म्हणून स्थान बळकट करायचं असेल तर येत्या काळात पुण्याला पायाभूत सुविधा, टाऊन प्लॅनिग यांसारख्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागणार एवढं नक्की.
हे ही वाच भिडू :
- दिल्ली, मुंबई सोडून बंगलोर आयटी हब कस झालं माहितय का..?
- भारतात लाँच झालेल्या फाईव्ह जी बद्दलच्या ५ गोष्टी जाणून घ्या…