नूह हिंसाचारासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होतोय तो मोनू मानेसर कोण आहे…?
हरियाणाच्या नूह इथे ब्रिज मंडळ अभिषेक रॅली काढण्यात आली होती. यात ३ ते ४ हजार जमाव सामील होता. पण या मिरवणुकीवर काहींनी दगडफेक केली आणि या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराने जातीय हिंसाचाराचं रूप घेतलं. या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू झाला आहे आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या आहेत.
त्याचबरोबर दोन होमगार्ड सोबत एकूण सहा जणांचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे आणि १२ पोलिसांसोबत ३० हून अधिक जण यात जखमी झाले आहेत.
त्यानंतर या हिंसाचाराची आग गुडगाव पर्यंत पोहोचली. ७० ते ८० जणांच्या जमावाने गुडगाव मधल्या सेक्टर ५७ मध्ये असलेल्या जामा मशिदीला आग लावली. या आगीत नायाम इमाम या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नूह, गुडगाव आणि आसपासच्या परिसरात कलम १४४ लागू केलं आहे. त्याच बरोबर शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा प्रशासनाला घ्यावा लागला आहे. या हिंसाचाराला मोनू मानेसर कारणीभूत असल्याचं बोललं गेलं.
पण एकाएक ही दगडफेक सुरु का झाली? मोनू मानेसरचा यात काय सहभाग होता हे जाणून घेऊ.
सोमवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी ‘ब्रिज मंडळ अभिषेक रॅली’चं आयोजन केलं होतं. यासाठी हजारोच्या संख्येने लोकं नूहच्या चौकात जमले होते. या रॅलीसाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी नूहला लागून असलेल्या राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये गायींच्या तस्करी प्रकरणात नसीर आणि जुनैद या दोन मुस्लिमांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी असलेला मोनू मानेसर हा सुद्धा या रॅली मध्ये सामील होणार होता.
मोनू मानेसर याने एक दिवस आधीच एका व्हिडीओ मधून याची माहिती दिली होती. तेव्हापासूनच तणाव पसरायला सुरुवात झाले होती. सोशल मिडियावर सुद्धा दोन समुदायांमध्ये आव्हानं आणि धमक्या द्यायला सुरुवात झाली होती. मोनू मानेसर हा नसीर आणि जुनैदच्या हत्येनंतर फरार आहे.
त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर राजस्थानमधल्या भरतपूरचं पोलीस पथक मोनूला पकडण्यासाठी नूहला पोहोचलं होतं. पण मोनू रॅली मध्ये आलाच नव्हता. स्थानिक मुस्लिमांनी आधीच मोनू मानेसरच्या सहभागावर विरोध केला होता. पण जेव्हा मोनू मानेसर या रॅलीत सहभागी होणार असल्याची बातमी पसरॅली तेव्हा स्थानिक मुस्लीम आक्रमक झाले.
नूह हरियाणा मधला एकमेव सर्वाधिक मुस्लिम असलेला जिल्हा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद असा दोन्ही समुदायाचा जमाव एकत्र येणार म्हटल्यावर या रॅलीवर ठिणगी पडणार होतीच आणि त्यात या रॅलीमध्ये दोन मुस्लिमांच्या हत्येसाठी आरोपी असलेला मोनू मानेसर येणार म्हटल्यावर या ठिणगीचं रुपांतर आगीत होणार होतंच.
त्यामुळे ब्रिज मंडळ अभिषेक रॅलीचा जमाव नूह चौकात आला तेव्हा नूहच्या स्थानिक १०-१५ लोकांच्या जमावाने या रॅलीवर दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्यामुळे प्रकरण पेटलं.
त्यांनी नूह रॅली साठी जमा झालेल्या जमावावर दगडफेक तर केलीच पण तिथे उभ्या असलेल्या अनेक गाड्यांनासुद्धा पेटवून देण्यात आलं. हल्लेखोरांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. नूहपासून गुडगावपर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक आणि गोळीबार झाला. या हिंसाचारात दोन होमगार्ड सोबत एकूण पाच जण मारले गेले. होडलचे डीएसपी सज्जन सिंग यांच्या डोक्यात गोळी लागली तर गुडगावच्या क्राईम युनिटच्या इन्स्पेक्टरच्या पोटात गोळी लागली आणि १२ पोलिसांसह अनेक जण जखमी सुद्धा झाले.
तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ३ ते ४ हजार लोकांच्या जमावाने तिकडच्या नरहर मंदिरात आश्रय घेतला.
तब्बल पाच तासांनी पोलिसांनी त्यांची तिथून सुटका केली. मोनू मानेसरच्या त्या एका व्हिडीओ मुळे नूह सोबत गुडगाव पेटलं होतं पण मोनू मानेसरने एका वूत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, तो नूह मध्ये गेलाच नव्हता. त्यामुळे या हिंसाचाराशी त्याचा काहीच संबंध नाही आहे. या हिंसाचाराचा परिणाम तिसऱ्या दिवशीही पलवल जिल्ह्यात दिसून आला. पलवल शहरातील एका मशिदीवर मंगळवारी रात्री उशिरा हल्लेखोरांनी हल्ला करून त्याची तोडफोड केली आणि नंतर पेट्रोल बॉम्ब फेकून मोठं नुकसान केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण आहे त्यामुळे पोलिसांच्या तुकड्या सातत्याने गस्त घालत आहेत.
या हिंसक हल्ल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये संताप आहे. यासंदर्भात बुधवारी दुपारी चार वाजता मानेसरमध्ये मोठी महापंचायत बोलावण्यात आली होती. ज्यामध्ये मानेसरमधील सर्व गावातील लोक आणि हिंदू संघटनांशी संबंधित लोक सहभागी होणार होते.
पण ज्या मोनू मानेसरमुळे हा हिंसाचार झाला तो नक्की कोण आहे?
मोनू मानेसरचं खरं नाव मोहित यादव आहे. तो स्वतःला गोरक्षक आणि समाजसेवक म्हणवतो. २०११ पासून तो बजरंग दलाचा सदस्य आहे आणि मानेसर परिसरात खोल्या भाड्याने देऊन तो स्वतःचा उदरनिर्वाह करतो.
मोनू हरियाणामध्ये, मुख्यतः नूह मधल्या गोरक्षकांचा मुख्य चेहरा आहे. तो आपल्या काही साथीदारांसोबत गो-रक्षा साठी काम करत असल्याचं तो नेहमी सांगतो आपण गेल्या काही महिन्यांपासून गोतस्करी रोखण्यासाठीच्या मोहिमेत मोनू मानेसरचं नाव कायम चर्चेत राहिलं आहे आणि गोतस्करीच्या विरोधात नसीर आणि जुनैदचं अपहरण करून त्यांची एका गाडी मध्ये टाकून त्या गाडीला आणि त्यांना आग लाऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप सुद्धा मोनू मानेसरवर आहे.
पण मोनूच्या म्हणण्यानुसार हत्येवेळी तो गुरूग्राममध्ये होता आणि त्याचा या हत्यांशी काहीच संबंध नाही. असं असलं तरी संशयित म्हणून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण तो नसीर आणि जुनैदच्या हत्येनंतर फरार आहे. तसच नूह मध्येच २२ वर्षाच्या वारीस खानच्या हत्येप्रकरणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. याव्यतिरिक्त मोनू युट्युबवर आणि सोशल मिडियावर पण बराच फेमस आहे. त्याचे फेसबुक वर ८३ हजार आणि युट्युबवर २ लाखहून जास्त सब्स्क्राइबर्स आहेत.
यावरून तो नेहमी त्याच्या गोरक्षणासंबंधीचे व्हिडीओज शेअर करत असतो. हे सगळं पाहता मोनू मानेसर हा बजरंग दलासाठी आणि गो-रक्षकांसाठी किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं.
नूहच्या हिंसाचारानंतर नूह आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे आणि इंटरनेटवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तसेच शाळा, कॉलेज, सरकारी आणि खासगी कार्यालय सुद्धा पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सोबत निम लष्करी चौक्यांच्या २० तुकड्या आणि हरियाणा पोलीस दलाच्या २० तुकड्या संपूर्ण नूह जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
त्याचसोबत जिल्ह्यात ६ आयपीएस अधिकाऱ्यांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. यासोबतच या प्रकरणाची एसटीएफ आणि सीआयएफकडून कसून चौकशी केली जात आहे. ते म्हणाले की, इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याबाबत ३ ऑगस्ट रोजी परिस्थितीचा आढवा घेऊन निर्णय घेण्यात येईल. नूह जिल्ह्यात २६ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि ११६ आरोपींना नूहमधील ब्रिज मंडळ धार्मिक यात्रेदरम्यान झालेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.