कलाकारांचे बोलणे इतके का झोंबते..?

कला क्षेत्र आणि राजकारण यांचा भारतातील प्रवास तसा अधोरेखित करण्यासारखाच आहे. रोज एखाद्या वाहिनीवर किंवा कधी कधी चित्रपटातून ज्यांना पाहतो तेच जनतेचे प्रतिनिधी म्हणून देखील आपण स्वीकारतो. अनेकदा त्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने साकारलेली एखादी भूमिका हि थेट त्यांचे खरे आयुष्य वर्तवणारी आहेत असा आपला समज होतो आणि त्यानुसार अनेकदा मतदान देखील.

पण एक गोष्ट मात्र आपल्याला चिंता व्यक्त करायला लावणारी आहे, ती म्हणजे कलाकारांची समाजिक भूमिका. कलाकारांनी सामाजिक भूमिका मांडायला हवी, त्यांची देखील समजतील एक घटक म्हणून हि जबाबदारी आहे पण त्याबाबतीत मात्र बहुतांश रित्या उदासीनता दिसते. अशी ओरड नेहमीच होत असते. पण दुसरीकडे मात्र कलाकारांना, लेखकांना, विचारवंतांना विचार मांडण्यापासून थांबवले जाते.

असाच एक प्रकार शनिवारी प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते अमोल पालेकर यांच्याबातीत घडला. नेमके हे प्रकार वारंवार का घडत असावेत? यातून सिद्ध काय होते? राजकरणातील मंडळीना याचा इतका त्रास का होत असावा? अशाच काही मुद्यांचा विचार करण्यासाठी घातलेला हा लेखाचा घाट.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याआधी नेमके अमोल पालेकर यांच्या सोबत काय घडले हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे…

अमोल पालेकरांना शनिवारी मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट येथील एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. प्रभाकर बारवे यांच्या स्मृतिदिनामित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स’ या विषयवर पालेकर बोलत होते. भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यास सुरुवात केली. परंतु, व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. केंद्र सरकारवर या कार्यक्रमात टीका करू नका, असे पालेकर यांना बजावले.

भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक रोखल्याने पालेकर चांगलेच संतापले. पालेकरांना बऱ्याचदा रोखल्याने अखेर त्यांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले व खूर्चीवर जावून बसले. अमोल पालेकर यांचा अर्धवट भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बाबतीत अमोल पालेकर यांनी आपला संताप देखील व्यक्त केला आहे.

पण हि अशी प्रवृत्ती बळावते कशामुळे. आपल्या देशात लेखक, विचारवंत, कलाकार यांची भाषणे थांबवणे, काही ठिकाणी त्यांना बोलूच न देणे, कधी कधी बोले म्हणून त्यांना अटक करणे अशी अनेक प्रकरण गाजली. म्हणजे असहिष्णुतेच्या मुद्य्यावरुन केलेली पुरस्कार वापसी आणि त्यानंतर उधळेल एकंदरीत सामाजिक राजकीय वातावरण असो अथवा नयनतारा सेहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून लांब ठेवणे असो. या जोडीलाच कलाकारांच्या बातीत देखील हेच झाले, अमीर खान जेव्हा असहिष्णुतेच्या मुद्द्यवर बोलला तेव्हा त्याला भारत सोडण्याचा दिला गेलेला सल्ला, अथवा नाना पाटेकर यांच्यावर असंख्य वेळा झालेली टीका आणि आता अमोल पालेकरांच्या बाबतीत घडलेला प्रकार. हि काही उदाहरण आहेत पण असे प्रकार घडतात का आणि कशासाठी?

हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट आधी सांगतो,

पिंट्या एकदा पोलीस चौकीत धावत पळत जातो साहेब विचारतात, “काय झाल?”

पिंट्या गडबडीने सांगतो “साहेब माझ्या गलीत लई मोठा गोंधळ चालाय लवकर चला”

साहेब पुन्हा विचरतात

“नेमक झाल काय?”

पिंट्या सांगतो

“साहेब माझ्या बाबांना शेजारचा माणूस बेदम मारतोय”

साहेब विचारतात “किती वेळ झाला?”

पिंट्या सांगतो,“अर्धा तास झाला चला लवकर”

साहेब म्हणतात,“एवढा वेळ काय करत होतास?

पिंट्या उत्तर देतो “गेले अर्धा तास माझा बाप त्याला मारत होता आता तो माझ्या बापाला मारतोय म्हणून आलो.” 

अशीच काहीशी हि अवस्था आताच्या वातावरणातील आहे. ते कसे हा पिंट्याचा बाप म्हणजे हे आमचे सुजान राजकीय नेते आणि त्यांचे तत्सम समर्थक, हे जो पर्यंत समोरच्याला मारत होते तोपर्यंत त्याबद्दल कुणीच बोलत नव्हते पण जेव्हा यांच्या विरोधात थेट कलाकार, सहित्यिक, लेखक, विचारवंत उतरायला लागले तेव्हा मात्र अडचणीची खरी सुरवात झाली.

या कथेत पिंट्या न्यायव्यवस्थेची मदत घेण्यास धावतो पण राजकारणातील सध्याचा एखादा पिंट्या मात्र न्याय थेट तोंड बंद करूनच करतो.

खरे तर कलाकर जो पर्यंत आपले चित्रपट, नटनट्यांची लफडी, आणि पुरस्कार सोहळ्यात व्यस्त होते तो पर्यंत त्यांच्याबाबतीत कुणालाच धास्ती नव्हती पण आता मात्र ह्या सगळ्या बरोबर ते जेव्हा सामाजिक भूमिका मांडू लागले, राजकारणाच्या गादीवर बसू लागले तेव्हा मात्र अनेकांना याची अडचण होऊ लागली.

आता मूळ प्रश्न असा कि राजकीय नेते एकमेकावर टीका करतात, शिव्या देतात थेट अख्ख खानदान काढतात. असे असतांना, 

 कलाकारांची टीकाच का झोंबतात इतकी ?

तर याचे कारण आपण थोडे पाठीमागे जाऊन पाहू आपल्या पैकी अनेकांना शक्तिमान आठवत असेलच. हि मालिका म्हणजे माझ्या बालपणाची फुल इंन्जॉयमेंट होती. पण नंतर मात्र चक्क मी दिवाळीला शक्तिमानचा ड्रेस घातला आणि माझ्या एक मित्राने हा ड्रेस घालून थेट गच्चीवरून हवेत उडी मारली आणि खाली कोसळून कायमचा गेला.

आज या घटनेचा विचार केला कि एक गोष्ट लक्षात येते कि आपण सहज चित्रपट, मालिका यांचायावर विश्वास ठेवतो आणि त्याचे अनुकरण देखील करतो. तेव्हा शक्तिमान होता मग नंतर आम्हाला नायक सारखा मुख्यमंत्री हवा झाला आणि मग कलाकार राजकारणात भरगोस मतांनी विजयी देखील होऊ लागले. पण आपल्या पक्षातून तिकीट घेऊन निवडून आलेल्या कलाकार राजकीय नेत्यांबाबत कुणला कसलीच अडचण नसते. अडचण असते ती भूमिका मांडून एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री समजाचे रॉल मॉडेल होऊ नये याची.

कारण सध्या राणादा आता प्रत्येकाच्या गावात आहे, लागीर झालं जी मधला अज्या फौजी प्रत्येकाच्या गल्लीत आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे पात्र साकारणारे अमोल कोल्हे आता व्याख्याते झालेत एवढच नव्हे त्यांना संभाजी महाराजच समजणारे कित्येक आहेत. हि पात्र जशी प्रत्येकाच्या घरात आता रुतून बसलेत तसेच हीच माणस जेव्हा एखादे राजकीय किंवा सामाजिक मत मांडतात तेव्हा रोज टीव्ही पाहणारे मतदार सहज आपल मत या अभिनेत्यांच्या मताप्रमाणे तयार करतात आणि त्याचा थेट परिणाम देखील दिसायला वेळ लागत नाही.

याचे उदाहरण पाहिजे असेल तर महाराष्ट्र सरकारचे जलयुक्त शिवार आणि अमीर खानच्या पाणी फौंडेशनचे काम पहा.

हि दोन्ही कामे एकाच हेतू साठी महाराष्ट्रात शेतकरी जगावा म्हणून, पण लोकांनी मात्र अमीर खानच्या पाणी फौंडेशनवरच अधिक विश्वास ठेवला, याचे कारण तो लोकांचा रॉल मॉडेल आहे. असेच नाना पाटेकर यांच्या नाम बाबतीत हि घडले. पण हि परिवर्तने राजकीय धोरणांना जड जाणारी नव्हती म्हणून त्यांचा विरोध होण्याऐवजी तारीफच जास्त झाली.

पण जेव्हा अमोल पालेकर यांच्या सारखा अभिनेता थेट कला क्षेत्रात घुसलेल्या राजकीय घुसखोरी बद्दल बोलायला लागतो तेव्हा मात्र सहाजिक अडचण होणार म्हणूनच हे भाषण थांबवले गेले. आता भाषण का थांबवले, पालेकरांचा हा अपमान आहे, कला विश्वाला लागलेलं गालबोट आहे अशा नानातरेच्या गोष्टी अवतीभवती चालू होतील आणि कालांतराने शांत देखील.

याचा फरक आता न लोकांना पडेल न ज्यांनी केले त्यांना न ज्यांनी करायला भाग पडले असेल त्यांना. कारण वर्तमानपत्रात आलेली सकाळची बातमी हि सुर्यास्ताबरोबर शिळी होते. तसेच अशा अनेक घटना आपल्या कडे शिळ्या झाल्या. आता हे थांबणार कसे याचे आत्मचिंतन मात्र करायला हवे सामान्य नागरिक आणि या कलाकार, लेखक, विचारवंत या मंडळींचे अनुकरण करणारे चाहते म्हणून, तसेच अमोल पालेकर यांना खाली बसवणाऱ्या त्या राजकीय कटपुतळ्यांनी देखील आणि या प्रकरणाबाबतीत मौन बाळगलेल्या सर्व कलाकार मंडळींनी देखील.

अन्यथा परत कुणला तरी असेच खाली बसावे लागले, आणि विचार आणि भूमिका यांचा सगळ्यात जास्त मिजास बाळगणाऱ्या आपल्या देशात त्यांचाच अंत होईल.

  •  ज्ञानेश भुकेले. 

हे ही वाचा. 

1 Comment
  1. प्रविण शिंदे says

    ????????????????????

Leave A Reply

Your email address will not be published.