शिंदे गटानं अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक का लढवली नाही ?

एकनाथ शिंदेंनी बंड केलं, १२ खासदार, ४० आमदार, अनेक नगरसेवक-पदाधिकारी अशी उभी फूट शिवसेनेत पडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर झालेच, पण त्यांनी थेट शिवसेना पक्षावरही दावा केला. मूळ शिवसेना कुणाची हा वाट कोर्टात गेला.. पण या सगळ्यात प्रकरण गाजलं ते चिन्ह गोठवण्याचं.

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली. ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं, तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं.

आमदारांच्या निलंबनाचा आणि वैधतेचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असतानाही निवडणूक आयोगानं हा अंतरिम आदेश दिला या मागचं कारण होतं,

अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक

बंड झाल्यापासून दोन्ही गट दावा करतायत की, मतदारांचा पाठिंबा आम्हालाच आहे. कुणाचा दावा किती खरा ? याची चाचपणी या पोटनिवडणुकीत होणार असं सांगितलं जात होतं. ठाकरे गट अजूनही महाविकास आघाडीत आहे, त्यात अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके हे शिवसेनेचेच होते. त्यामुळं ठाकरे गट या मैदानात उतरणार हे निश्चितच होतं, पण बंडामुळं त्यांचा सामना नेमका शिंदे गटाच्या उमेदवाराशी होणार की भाजपच्या हे स्पष्ट नव्हतं.

ज्या आक्रमकपणे शिंदे गट ठाकरे गटाविरुद्ध प्रचार करत आहे, ते पाहता भाजप-शिंदे गट युतीमधून शिंदे गटाच्या उमेदवाराला मैदानात उतरवण्यात येईल अशी चर्चा होती.

ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आधीच उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र अर्ज भरायच्या आदल्या रात्री पर्यंत शिंदे गट-भाजपचा प्लॅन ठरत नव्हता.

अखेर अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी, १४ ऑक्टोबरला भाजपचे मुरजी पटेल या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे नक्की झालं आणि सोबतच या पोटनिवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना रंगणार नाही हे स्पष्ट झालं.

पण आमदारांची मागणी असताना, मतदारांचा पाठिंबा कुणाला आहे हे पाहण्याची संधी असताना शिंदे गटानं अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक का लढवली नाही ? याची कारणं पाहुयात

मतदारसंघाचा इतिहास

अंधेरी मतदारसंघ हा पूर्वीपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९९९, २००४ आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ मध्ये पुन्हा एकदा असे सलग तीन वेळा कॉंग्रेसचे सुरेश शेट्टी या मतदारसंघातून निवडून आले. अंधेरी पूर्वमध्ये मराठी भाषिक मतदारांचा मोठा टक्का आहे. त्यानंतर उत्तर भारतीय, गुजराती, ख्रिश्चन, पारसी, पंजाबी, मुस्लिम असे सगळ्याच समाजातले मतदार इथं आहेत.

२००९ मध्ये ५ हजार मतांच्या फरकानं दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रमेश लटकेंनी २०१४ मध्ये बाजी मारत हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकून दिला. पण त्यांना टक्कर देणाऱ्या भाजपच्या सुरेश शेट्टींना त्यांच्यापेक्षा फक्त ५ हजार मतंच कमी पडली होती. २०१९ मध्ये सेना-भाजप एकत्र लढले. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला, पण भाजपच्या मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून उभे राहिले.

अपक्ष असतानाही त्यांनी ४५ हजार ८०८ मतं मिळवली, तर रमेश लटकेंना ६२ हजार ७७३ मतं मिळाली.

थोडक्यात काय तर इथं कोणत्याही एका पक्षाचं पक्कं वर्चस्व आहे असं गृहीत धरता येत नाही. त्यामुळं मतदारांचा अंदाज घेऊनच मैदानात उतरणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणावर मतदार काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडे वळलेला आहे, ठाकरे गटाला काँग्रेसची मदत मिळेलच, त्याचा सामना करायला मुरजी पटेल यांचा व्यक्तिगत करिष्मा आणि भाजपची ताकद महत्त्वाची ठरेल, हा इतिहास बघता शिंदे गटानं एक पाऊल मागं टाकल्याचं दिसून येतं.

नवीन चिन्ह

या निवडणुकीत जर शिंदे गटाचा उमेदवार असता, तर त्याला ढाल-तलवार या नव्या चिन्हावर मैदानात उतरावं लागलं असतं. साहजिकच हे नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे गटाला कमी वेळात जास्त कसरत करावी लागली असती. जी अर्थातच ठाकरे गटाला करावी लागणार आहे. या चिन्हाचं महत्त्व सांगायचं झालं तर या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि सेनेचं एकगठ्ठा मतदान भरपूर आहे.

अशावेळी जर ऋतुजा लटके काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर उभ्या राहिल्या असत्या, तर त्यांना फायदा झाला असता असं सांगण्यात येतं. कारण पंजा हे चिन्ह आधीच घरोघरी पोहोचलं आहे. तसंच भाजपचं कमळही आणि जर मुरजी पाटील यांचा निवडणुकांमधला इतिहास पाहिला, तर चिन्ह नसतानाही मुरजी पटेल यांनी मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती. त्यामुळं शिंदे गटानं नव्या चिन्ह्यावर लढण्याची जोखीम पत्करण्याऐवजी भाजपच्या कोर्टात चेंडू सोपवला.

सहानुभूतीची लाट आणि उमेदवाराची वानवा

सलग दोन टर्म आमदार असलेल्या रमेश लटकेंचं अंधेरी पूर्व मतदारसंघात चांगलं काम आणि जनसंपर्क असल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर ठाकरे गटानं त्यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली, साहजिकच ऋतुजा लटकेंच्या मागे मोठी सहानुभूती असणार आहे. त्यात शिवसेनेचं नाव, चिन्ह गोठवल्यामुळं आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळं शिवसेनेच्या पारंपारिक मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

त्यात विभागप्रमुख म्हणून ठाकरे गटातले आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्याकडे जबाबदारी आहे. अनिल परब हे मातोश्रीचे निकटवर्तिय म्हणून ओळखले जातात. त्यामुळं तेही या प्रतिष्ठेच्या लढाईत आपली ताकद लावणार हे निश्चित आहे.

पण सहानुभूतीची लाट आणि ताकद असली तरी निवडणूक जिंकणं अशक्य असतं असं नाही. उदाहरण द्यायचं झालं, तर पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भरत भेलके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली.

तेव्हा राष्ट्रवादीनं त्यांचे पुत्र भगीरथ भेलके यांना उमेदवारी दिली, पण भाजपनं समाधान आवताडे यांच्या रूपात स्थानिक उमेदवार उभा करत त्यांना ताकद दिली आणि हि जागा खेचून आणली.

मात्र या पॅटर्नची पुनरावृत्ती करण्यासाठी शिंदे गटाकडे तगडा स्थानिक उमेदवार नाही. हा स्थानिक उमेदवार आहे भाजपकडे. त्यामुळं साहजिकच लढाई विरुद्ध मशाल विरुद्ध ढाल तलवार नाही, तर मशाल विरुद्ध कमळ अशी आहे.

मुरजी पटेल यांची ताकद

स्थानिक उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांचं नाव पुढं आलं, याचं कारण म्हणजे त्यांची मतदारसंघातली ताकद. आधी कॉंग्रेसमध्ये असणारे मुरजी पटेल आपल्या पत्नी केशरबेन यांच्यासह साधारण २०१५-१६ मध्ये भाजपमध्ये आले. केशरबेन पटेल २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये पटेल पती-पत्नी भाजपच्या तिकिटावर नगरसेवक झाले. पण जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्या दोघांचं नगरसेवकपद रद्द झालं.

२०१९ मध्ये बंडखोरी करत मुरजी पटेल रमेश लटकेंविरुद्ध लढले आणि चिन्हाचं पाठबळ नसतानाही ४५ हजार मतं घेतली. थोडक्यात पक्ष किंवा चिन्ह यापलीकडे मुरजी पटेल यांचा वैयक्तिक दबदबा आणि ताकद या मतदारसंघात आहे.

पराभवाची जोखीम

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत जर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना झाला असता, तर विजेत्या गटालाच खरी शिवसेना म्हणून मतदारांचा पाठिंबा आहे, असं नॅरेशन सेट करणं सोपं झालं असतं. यात विजयाची संधी असली, तरी पराभवाची भीतीही आहे.

कारण इथल्या पराभवामुळं जर नकारात्मक प्रतिमा तयार झाली, तर त्याचा मोठा फटका आगामी मुंबई महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीतही बसू शकतो.

सध्याच्या घडीला ठाकरे गटासाठी ‘आर या पार’ अशी लढाई आहे, त्यामुळं या निवडणुकीत ते पूर्ण जोर लावणार. अशावेळी स्थानिक ताकद आणि सहानुभूतीची लाट विरोधात असताना रिंगणात उतरण्याचा धोका जास्त होता. शिंदे गटाला जर पराभव स्वीकारावा लागला असता, तर जनमत ठाकरेंच्या बाजूनंच आहे असा मेसेज राज्यभरात पोहोचला असता आणि त्यामुळं अजूनही सीमारेषेवर असलेल्या नेते-आमदार आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटापासून अंतर राखलं असतं, अशी शक्यता वर्तवण्यात येते.

भाजपची या मतदारसंघात ताकद आहे, त्यामुळं भाजपच्या मागं शिंदे गटानं आपली ताकद लावली, तर भाजपचा विजय हा त्यांचाही विजय असेल, पण पराभव झाला तर त्यानं शिंदे गटाला थेट डॅमेज पोहोचणार नाही.

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कमळ आहे, मशाल आहे पण ढाल-तलवार नाही ते यामुळेच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.