काँग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्री झाले तरीही हे नेते भाजपमध्ये का गेलेत

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश केला. साधारण वर्षभरापूर्वी कॉंग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदाचा द्यायला लावलेला राजीनामा त्यानंतर भाजपशी जवळीक, पंजाब लोक कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
अमरिंदर सिंग यांच्या रूपाने आज भाजपला पंजाबमध्ये एख शीख चेहरा मिळाला. पंजाब मध्ये भाजपला कधीही एकहाती सत्ता मिळाली नाही.२ ०२७ मध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपने आत्तापासूनच हालचाली चालू केल्या आहेत.
गेल्या ५ वर्षांमध्ये जे देशभरात नेत्यांचं जे पक्षांतर पाहायला मिळाल त्यात सर्वाधिक पक्षांतर हे भाजपात झालय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉंग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री झालेले अनेक नेते भाजपात सामिल झाले.
जे कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री होते आणि नंतर भाजपात सामिल झाले, त्यामागची कारण काय होती आणि आज ते नेते भाजपात काय करत आहेत
१) यांत पहिल नाव येतं ते N D Tiwari यांचं
साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या राजकीय इतिहासातील असे एकमेव नेते राहिले आहेत. ज्यांनी २ वेगळ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. आधी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर उत्तराखंडचे.
प्रजा सोशालिस्ट पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तिवारींचा राजकारणातील प्रवेश स्वातंत्र्यपूर्व काळात केला. १९९१ सालच्या नैनिताल येथून लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नसता तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी तिवारी हे निश्चितपणे देशाचे पंतप्रधान झाले असते. असं अनेक जेष्ठ राजकीय विश्लेषक मानतात.
१९९४ साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी ‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस’ (तिवारी) नावाच्या नवीन पक्षाच्या स्वरुपात आपली वेगळी चूल मांडली. अर्थात पुढच्या २ वर्षातच ते काँग्रेसमध्ये परतले देखील. नंतरच्या काळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. राज्यपाल असताना सेक्स स्कॅंडलचा आरोप, त्यांचा मुलगा रोहितने त्यांच्यावर केलेले आरोपही गाजले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांना कॉंग्रेसमध्ये अपमान होत असल्याच कारण देत मुलगा रोहितसोबत भाजपात प्रवेश केला पण त्यानंतर १ वर्षांने एनडी तिवारी यांचं निधन झालं आणि २०१९ मध्ये रोहित तिवारी यांची हत्या झाली.
२) दुसरं नाव आहे विजय बहुगुणा यांचं
उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले विजय बहुगुणा यांचे वडिलही उत्तराखंडचे कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री होते.परंतू १९९५ मध्ये त्यांना इंदिरा गांधींनी राजीनामा द्यायला लावला. असच काहीस विजय बहुगुणा यांच्याबाबतीतही झालं.
कॉंग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केलेल्या विजय बहुगुणा यांचा ३ वेळा लोकसभेला पराभव झाला होता. मात्र त्यानंतंर २००२ आणि २००७ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले. २०१२ मध्ये कॉंग्रेसच सरकार आल्यानंतर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार होते. कॉंग्रेस हायकमांडने विजय बहुगुणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
२ वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतंर उत्तराखंडच्या पुराचं ढसाळ नियोजन केल्याची चौफेर टिका त्यांच्यावर झाली त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हाव लागलं. त्यांच्या जागी कॉंग्रेसने हरिश रावत यांना मुख्यमंत्री केलं.
हायकमांडच्या या निर्णयावरून कॉंग्रेसमध्ये वातावरण पेटलं आणि २०१७ मध्ये विधानसभा निवडणूकांच्या आधी ते भाजपात सामिल झाले. भाजपने त्यांना न तिकीट देता त्यांच्या मुलाला तिकीट दिल आणि मुलगा आमदार झाला.
३) या यादीत तिसरं नाव येत गोव्याचे दिगंबर कामत यांचं
गोव्यात कॉंग्रेसमधून आपल्या राजकीय वाटचालीची सुरूवात केलेल दिगंबर कामत यांचा राजकीय प्रवास कॉंग्रेस – भाजपा – कॉंग्रेस – भाजपा असा राहिलेला आहे. कॉंग्रेस मध्ये काम करताना १९९५ मध्ये ते भाजपच्या युती सरकारमध्ये सामिल झाले. त्यानंतर २००५ मध्ये पुन्हा त्यांनी कॉंग्रेसची वाट धरली.
कॉंग्रेस आणि भाजपा सरकारमध्ये अनेक वेळा मंत्रीपद भूषवल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या निवडणूकांमध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वातील भाजपने गोव्याची सत्ता काबिज केली आणि पर्रिकर मुख्यमंत्री झाले.
२०१९ मध्ये दिगंबर कामत यांना कॉंग्रसने विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली. पण गेल्या ४ वर्षांच्या काळात गोवा कॉंग्रेसमध्ये मोठी पडझड झाली. आणि याच पडझडीत गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी असलेले दिगंबर कामत आणखीन ७ आमदारांसोबत भाजपात सामिल झाले.
त्यांचा भाजप प्रवेशही चर्चेत राहिला तो त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे… भाजपमध्ये सामील होण्यासाठी देवानेच आपल्याला परवानगी दिली असे विधान कामत यांनी केल. निवडून आल्यानंतर भाजपमध्ये सामील होणार नाही अशी शपथ आधी काँग्रेस उमेदवारांनी मंदिर, दर्गा आणि चर्चमध्ये जाऊन घेतली होती. आता मात्र देवाच्या परवानगीने आपण आलो या त्यांच्या वक्तव्यांची चांगलीच चर्चा झाली.
याशिवाय दिगंबर कामत यांच्या आधी दोन वेळा गोव्यात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले रवी नाईक यांनीसुद्धा भाजपात प्रवेश केलेला
४) चौथ नाव येत ते पंजाबमधील कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचं..
कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या राजकारणातलं आणि घराणेशाहीतलं महत्वाचं नाव. माजी मुख्यमंत्री असलेले कॅप्टन एकेकाळी पंजाब काँग्रेसचा चेहरा मानले जायचे. त्यांनी दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलाय. काँग्रेस हायकमांडचा सगळ्यात विश्वासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. पण यंदा निवणुकीच्या ऐन टायमाला पक्षांतर्गत वाद झाले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागलं. एवढंच नाही तर त्यांनी पक्षाला सुद्धा रामराम ठोकला.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कॅप्टन भाजपमध्ये सामील होणार अश्या चर्चा होत्या, पण त्यांनी कुठल्याही पक्षात सामील न होता स्वतःचा वेगळा ‘पंजाब लोक काँग्रेस’ हा पक्ष स्थापन केला विधानसभा निवडणूकाही लढवल्या पण त्यांचा आणि पक्षाचा दारूण पराभव झाला त्यानंतर ते आता भाजपात सामिल झाले.
१९८० च्या दशकांत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमरिंदर सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर चार वर्षांनंतर सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई झाली तेव्हा कॅप्टन काँग्रेसवरच चिडले. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अकाली दलात प्रवेश केला.
अकाली सरकारमध्ये ते मंत्री नक्कीच झाले, पण त्यांची स्वप्ने मोठी होती. या कारणास्तव, पंजाबच्या राजकारणात स्वत: ला सेटल करण्यासाठी, कॅप्टन यांनी १९९२ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. नाव ठेवलं अकाली दल पथक. ६ वर्षे अमरिंदर सिंग या पक्षाच्या माध्यमातून स्वतःला पंजाबचा राजा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले. पण राजा होण्यापासून दूर राहिल्याने त्यांच्या राजकारणाची सर्वात मोठी पडझड त्या काळात दिसून आली.
१९९८ साली त्यांचा राजकीय कारकीर्दीतला सगळ्यात मोठा पराभव झाला. त्यांना फक्त ७५६ मते मिळालेली. त्यांनतर कॅप्टन यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यानंतर पंजाबच्या राजकारणात त्यांचा दर्जा वाढवला. जस कि आधी सांगितलं, ते दोन वेळा मुख्यमंत्री झाले, पंजाब काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आणि अनेक प्रसंगी पक्षाला अडचणीत साथ सुद्धा दिली. परंतु नवज्योतसिंग सिद्धू, राहूल गांधींसोबत मतभेद अशा अनेक कराणांमुळे पंजाबचं मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर, नविन पक्ष काढल्यानंतर अखेर भाजपात सामिल झाले.
हे ४ नेते जे कॉंग्रेसमध्ये असतांना मुख्यमंत्री होते पण त्यानंतंर ते भाजपात सामिल झाले
थोडक्यात इतके मोठे नेते कॉंग्रेसने गमावले आणि भाजपने कमावले. पण भाजपात गेल्यानंतंर त्यांना भाजपने फार मोठी संधी दिलीये असही दिसत नाहीय. याशिवाय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हेही भाजपात जातील अशा चर्चा झाल्या, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हेही भाजपात जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती..तुम्हांला काय वाटत कॉंग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले हे नेते भाजपात का जात असतील ?
हे ही वाच भिडू
- यूपी काँग्रेसमध्ये असेही मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांना नेहरूंच्या आधी नमन केलं जायचं
- ओरिसाची भाषा ही बोलू न शकणारे नवीन पटनाईक पाचव्यांदा तिथले मुख्यमंत्री बनले आहेत.
- किस्से त्या नेत्याचे, ज्यांच्यामुळे मोदींना गुजरात सोडावं लागलं…