पैज लावून सांगतो, तुमच्या तालुक्यातून ४-५ पोरं रशियाला डॉक्टर व्हायला गेली असतील

किसनाची तशी शेती ठीकठाक तीन भावात वाटणी होऊन पण तो आज १० एकर शेतीचा मालक. पण शेती कोरडवाहू असल्यानं काबाडकष्ट करून हाताला काही लागत नव्हतं. मग गावात कालवा आला आणि शेतीसाठी पाण्याची सोया झाली. आज ऊस, द्राक्षांच्या जीवावर गावाच्या वेशीला किसनाचा बंगला डोलात उभा आहे. एवढं असूनही आपल्या पोरांनी शेतीत राहवं अशी त्याची इच्छा नव्हती. सुरवातीला बेताची आर्थिक परिस्तिथी असतानाही त्यानं आपली पोरं बाजारगावच्या इंग्लिश शाळेत घातली होती.

पोरगी डॉक्टर आणि पोरगा इंजिनिअर हे शहरातल्या मिडलक्लास सारखंच किसनाचं पण स्वप्न

पण किसनाच्या पोरीनं प्रयत्न केले पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय ऍडमिशन भेटलं नाही. प्राव्हेटला चौकशी  केली तर नुसते ४०-५० लाख डोनेशनच मागत होते. आणि त्याच वेळी किसनाच्या डोक्यात कोणतरी आयडिया घातली रशियातनं MBBS करण्याची. किसनाला आयडिया एवढी पटली की रविवारच्या बाजराला आजीबरोबर जाण्यापलीकडे गाव नं सोडलेली किसनाची पोरगी, आमची साक्षी थेट रशियाला गेली.

”लग्नात हुंड्यात घालायचं हुतं ती शिक्षणात घातलं”

कोणी पोरीच्या MBBS वर प्रश्न विचारलं का किसनाचं ठरलेलं उत्तर.

अवघ्या १८ वर्षाची साक्षी आमच्या भागातल्या आणखी ५-६ जणींबरोबर रशियाला गेलेय. आधी शहरात लिमिटेड असलेलं बाहेरून शिक्षण घेण्याचं फॅड आता गावातही पसरायला लागलंय.

दक्षिण भारतातील रशियन फेडरेशनचे कॉन्सुल जनरल ओलेग एन. अवदेव यांच्यानुसार आजच्या घडीला भारतातले १५,००० विद्यार्थी रशियामध्ये मेडिकल मध्ये शिक्षण घेत आहेत. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रशियाला MBBS करायला जाण्यामागे प्रामुख्याने ही कारणं दिसत आहेत.

तर पहिलं महत्वाचं कारण दिसून येतं ते म्हणजे तुलनेनं कमी असलेल्या MBBS च्या सीट्स.

महाराष्ट्रात NEET जी MBBS ला ऍडमिशन घेण्यासाठी एकमेव आणि कंपलसरी एन्ट्रान्स टेस्ट असते तीला २०२१ मध्ये महाराष्ट्रातून २ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला केवळ नऊ हजारांच्या आसपास सीट्स आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थाना आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदेशाचा आसरा घ्यावा लागतो.

आता मग रशियालाच का निवडतात याची कारणं जरा बघू 

  • सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रशियामध्ये असलेली माफक फी.

मेडिकलचं शिक्षण तसं महागडंच असतं. एक मेडिकल कॉलेजच्या उभारण्यासाठी शेकडो कोटींचा खर्च येतो. त्यामुळं जर गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळली तर ५ ते ६ लाखांच्या आसपास तुमचं MBBS होऊ शकतो. मात्र महाराष्ट्रात प्राव्हेट कॉलेजमध्ये कॉलेज फीचा हा आकडा ८० ते ९० लाखांच्या घरात जातो आणि वरतून डोनेशन वेगळं. मग इथे रशिया सिनमध्ये येतो. रशियामध्ये हा खर्च खूप कमी आहे.

एडु रशिया या शैक्षणिक कन्सल्टंसीचे मनोज पत्की सांगतात,

” रशियामध्ये सगळे मेडिकल कॉलेजेस हे गव्हर्नमेन्टचे आहेत. तसेच भारत सरकारनं रशियाशी केलेल्या MOU मुळे भारतीय विद्यर्थ्यांनाही रशिया सरकार देत असलेल्या ग्रॅन्टचा फायदा मिळतो. त्यामुळे फी ही वर्षाला साधारणपणे ३ ते ४ लाख रुपये एव्हढीच असते. यामध्ये कॉलेज फी, हॉस्टेलमध्ये राहण्याची फी आणि मेडिकल इन्शुरन्स हे सगळं येतं.”

म्हणजे ५ वर्षांचा MBBS चा कोर्स पूर्ण करण्यासाठी २० लाखांपर्यंत खर्च येतो. आता नुसतं फी कमी आहे हेच कारण नाहीये.

रशियातले मेडिकल कॉलेजमधल्या शिक्षणाचाही दर्जा असल्याचं सांगितलं जातं.

स्किल्ड प्रोफेसर्स, विद्यार्थी आणि प्रोफेसर यांचा कमी असलेला रेशीओ, अत्याधुनिक लॅब यामुळं रशियातलं मेडिकल शिक्षण अजूनही क्वालिटी राखून आहे. अजून एक महत्वाचं गोष्ट म्हणजे रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना कोर्स साठी इंग्लिश भाषेचा पर्याय निवडता येतो. त्यामुळे भाषेचेही अडचण दूर होते.

  • रशियामध्ये मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रियापन बऱ्यापैकी सोपी आहे.

यासाठी रशियन युनिव्हर्सिटीकडून कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. मात्र आता भारत सरकारने बाहेर शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही NEET क्वालिफाय करणं कंपलसरी केलं आहे. आणि तिथे मग तुम्हाला तुमच्या १२ वीच्या मार्कांवर ऍडमिशन घेता येतं.

तसेच रशियात मिळालेली डिग्री युरोपातील आणखी ४० देशांमध्ये वैध मानण्यात येते. 

त्यामुळे ज्यांना भारताबाहेर काम करायचं आहे त्यांचाही रशियातून MBBS घेण्याकडे ओढा असतो. अजून एक महत्वाचा भाग म्हणजे भारत आणि रशिया यांचे चांगले असलेलं द्विराष्ट्रीय संबंध. यामुळेच अगदी १९७०-८० पासून भारतीय विद्यार्थी रशियामध्ये शिक्षणासाठी जात आहेत.

तसेच ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात अमेरिकेमध्ये भारतीयांना जो वर्णभेदाचा सामना करावा लागतो त्या घटना रशियामध्ये अत्यंत कमी आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी अवघ्या १७-१८ वर्षाच्या आपल्या पोरांना लोकं सातासमुद्रापार पाठवायला तयार होतात. तसेच थंडी जरी जास्त असली तरी रशियातले वातावरण अल्हाददायक असल्याचं सांगण्यात येतं.

मात्र अनेक वेळा रशियातले शिक्षणासाठी तुम्हाला एजन्ट कडून गंडाही घातला जाऊ शकतो. 

तसेच अनेकवेळा भाषेचेही समस्या होऊ शकते. सगल्याच रशियन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ५ वर्षे इंग्लिशचा पर्याय मिळेल का हे पाहणं क्रमप्राप्त ठरतं. काही युनिव्हर्सिटीमध्ये सुरवातीचे  इंग्लिशमध्ये कोर्स ऑफर करण्यात येतो मात्र नंतर शेवटच्या दोन वर्षांसाठी विद्यार्थ्यांना लोकल भाषेचा वापर होतो. तुम्हाला इंग्लिशमध्ये सर्व शिक्षण घेणं याच्यासाठी गरजेचं आहे  कारण पुन्हा भारतात येऊन प्रॅक्टिस देण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते.

परदेशातून पदवी घेतल्यानंतर, वैद्यकीय व्यावसायिकांना FMGE ही स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

ज्यामुळं  त्यांना भारतात प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळतो. म्हणजे नुसती रशियातून डिग्री घेतली तिथं प्रश्न संपत नाही. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन कडून ही FMGE म्हणजेच फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम घेतली जाते.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) च्या आकडेवारीनुसार २०१५-१८ FMGE  परीक्षा  उत्तीर्ण होण्यारांची टक्केवारी १४.२२% इतकीच होती.

रशियाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास २०१५ ते २०१८च्या दरम्यान रशियातून शिक्षण घेऊन परतलेल्या ११७२४ भारतीय विद्यार्थ्यांपैकी १५१२ विद्यार्थी FMGE पास होऊन डॉक्टर होण्यासाठीचं लायसन मिळवू शकले होते.

आता ही माहिती घेतल्यानंतर जे रशियामध्ये जाऊन आलेत त्यांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. रशियातून MBBS घेतलेले बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावातून या गावाचे डॉक्टर आशिष विलासलाल कोठारी सांगतात,

“माझा रशियातील एकंदरीत अनुभव चांगला होता. मला सुरवातीला रशियाच्या MBBS कोर्सबद्दल पेपरमधून कळलं. MBBS चं शिक्षण घेण्यासाठी मला ३५ लाखांचा खर्च आला. रशियातले लोक, तिथले वातावरण यांच्याबद्दल मी समाधानी होतो असे ते सांगतात.

भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले,  MBBS च्या शेवटच्या वर्षांमध्ये प्रॅक्टिकल जास्त असल्याने तिथल्या लोकल लोकांशी संबंध येतो त्यासाठी कामचालऊ रशियन यावी लागते आणि सुरवातीच्या २-३ वर्षांच्या राहण्याने तुम्ही तेवढी भाषा शिकून जाता.

तर आता तुम्हाला सांगितलं हे रशियाचे फॅड का आहे ते. त्यामुळं घाई घाईत निर्णय घेण्याच्या आधी पूर्ण माहिती घ्या .

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.