रशिया-युक्रेनमध्ये युद्धला सुरवात झाली सामग्रीत नेमकं बाप कोण?

सध्या जग महायुद्धाच्या सीमेवर उभं असल्याचं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन हे दोन देश. या दोन्ही देशांच्या दरम्यान युद्धाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली आहे. ज्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडले आहेत. इतर देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरी कुणीही माघार घ्यायला तयार नाहीये.
रशिया तर उतावळा नवरा झाला आहे. केव्हा हल्ला करावं असं झालं होत. त्याच्या सेना युक्रेनच्या सीमेवर जाऊन थांबल्या होत्या. रशियाने युक्रेनमधील दोन फुटीरतावादी राज्यांना मान्यता दिली. त्यानंतर युक्रेनने यूएनएससीच्या बैठकीत आम्ही झुकणार नाही असं सांगितलं. आता दोघेही राष्ट्र शेरास सव्वाशेर व्हायला तयार आहेत. मात्र यात बाकीच्या देशांना प्रश्न पडतोय की, युद्ध झालं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? या दोघांमध्ये कोण जिंकणार?
आता याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर या दोन्ही राष्ट्रांची आधी ताकद बघावी लागेल.
जगातील सर्वात मोठ्या लष्करी शक्तींमध्ये रशियाचं नाव घेतलं जातं. तर छोटासा देश असणारा युक्रेन बिचारा यात कुठेच येत नाही. ना क्षेत्रफळाच्या दृष्टीने युक्रेन रशियापेक्षा भारी आहे ना युद्धाच्या सामग्रीमध्ये. आता यांची तुलना करणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट (FAS)ने एक यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील मुद्दे स्पष्ट होत आहेत.
रशियाकडे एकूण ६,२५७ अणुबॉम्ब आहेत. त्यापैकी १६०० बॉम्ब तैनात करण्यात आले आहेत, तर ४,४९७ बॉम्ब राखीव ठेवण्यात आले आहेत. तर युक्रेनकडे अण्वस्त्रेच नाहीत. रिपोर्टनुसार रशियाकडे मनुष्यबळ देखील जास्त आहे. जवळपास ८.५ लाख सैनिक रशियाकडे आहेत तर युक्रेनमध्ये सुमारे २ लाख सैनिक आहेत.
आता हवाई शक्तीकडे जर बघितलं तर रशियाकडे ७७२ तर युक्रेनकडे ६९ लढाऊ विमानं म्हणजेच फायटर एअरक्राफ्ट आहेत. रशियाकडे ५४४ अटॅक हेलिकॉप्टर आहेत, तर युक्रेनकडे याची संख्या फक्त ३४ इतकी आहे. शस्त्र असलेली लष्करी वाहनं देखील रशियाकडे जास्त आहे. रशियाकडे जवळपास ३०,१२२ सशस्त्र लष्करी वाहनं आहेत तर युक्रेनकडे यापैकी १२,३०३ वाहनं आहेत.
नौसेनेच्या बाबतीत तर रशिया बिनविरोध जिंकतो. रशियाकडे ७० पाणबुड्या आहेत आणि युक्रेनकडे एकही नाही. रशियाकडे ३३९१ मोबाइल रॉकेट प्रोजेक्टर आहेत तर युक्रेनकडे ४९० आहेत. आता आपण चित्रपटांत युद्धाचे सिन बघतो तेव्हा सर्वात आधी रणगाडे चालताना दिसतात. तेच रणगाडे रशियाकडे
युद्धासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते सैन्य बजेट किंवा संरक्षण बजेट.
रशियाची एकूण लोकसंख्या १४ कोटी असून त्यांचं बजेट ६.६३ लाख कोटींहून अधिक आहे. तर युक्रेन छोटा देश असल्याने त्याची लोकसंख्या ४.४१ कोटी असून लष्करी बजेट ४५ हजार कोटी आहे.
अशाप्रकारे युद्धाच्या दाराशी उभे असलेल्या या दोन्ही राष्ट्रांतील सविस्तर आकडेवारी या रिपोर्टमध्ये मांडण्यात आली आहे. ज्यात युक्रेन सर्व बाबतीत रशियाच्या मागे पडतो. मात्र इतकी कमी शक्ती असताना जर युक्रेन रशियाला आव्हान देतोय तर ते कशाच्या जोरावर? हा प्रश्न पडतो. याचं उत्तर आधीच सांगितलं आहे. ते म्हणजे अमेरिका आणि नाटो.
अमेरिका युक्रेनच्या बाजूने खंबीरपणे उभे असल्याची विधाने करत आहे. तर नाटोने आधीच त्यांना युद्धासाठी लागणाऱ्या सामग्रीचा पुरवठा करण्याची हमी दिलीये. यामुळेच युक्रेन रशियासारख्या शक्तीसमोर उभा आहे. शिवाय अमेरिकेसोबत ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी अशा देशांनीही युक्रेनला पाठिंबा दर्शवलाय. तुम्हाला जर पहिल्या दोन युद्धांचा इतिहास माहित असेल आणि सध्याची या देशांची ताकद माहित असेल तर तुम्हाला जाणवूच शकतं हा लढा म्हणजे काय असणार आहे.
तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करता रशिया युद्धासाठी धजावणार का? की हे दोन्ही देश काही तोडगा काढणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाच भिडू :
- रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतांना देश म्हणून मान्यता दिलेय पण नवीन देश जन्माला येतात तरी कसे?
- रशिया-युक्रेन युद्धामुळं डिझेल-पेट्रोलच्यापलीकडे या गोष्टी आपल्या घरातलं बजेट बिघडवू शकतात
- जगातल्या या श्रीमंत फॅमिलीनं चक्क एक महायुद्ध घडवून आणलं होतं