जगातल्या कुठल्याच देशाच्या झेंड्यात जांभळा रंग का नसतो ?

लहानपणी राष्ट्रीय सणांच्या दिवशी चित्रकला आणि निबंध स्पर्धा असायचा, त्यात एक विषय हमखास असायचा तो म्हणजे ‘आपला राष्ट्रध्वज.’ आपणही आपल्या तिरंग्याबद्दल लिहिताना भगवा रंग शौर्याचं, पांढरा रंग त्याग आणि शांततेचं, हिरवा रंग समृद्धीचं आणि अशोक चक्र हे सत्त्याचं प्रतीक आहे, असं हमखास लिहायचो.

नुकत्याच कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडल्या, तेव्हा  भारताच्या प्रत्येक गोल्ड मेडल विजयावेळी भारताचं राष्ट्रगीत वाजलं आणि इतर देशांच्या मधोमध असलेला तिरंगा उंचावला. या सगळ्या गोष्टी बघताना, वाचताना आपल्या अंगावर काटा येतो आणि आपण तिरंग्याबद्दल आणि आपल्या देशाबद्दल अभिमान वाटतो.

ही भावना फक्त भारतीयांचीच नाही, तर कुठल्याही नागरिकाची आपल्या देशाच्या झेंड्याबद्दल असतेच. जगात सध्या १९३ देश आहेत, प्रत्येक देशाचा झेंडा वेगळा आहे. अर्थात सारखाच इतिहास आणि भौगोलिक स्थानामुळे काही झेंड्यांमध्ये साधर्म्य असलं, तरी आणखी एक समान धागा आहे तो म्हणजे या झेंड्यांमध्ये असलेली एका रंगाची अनुपस्थिती.

कुठल्याही देशाचं नाव सर्च करुन त्यांचा झेंडा बघा, तुम्हाला त्यात जांभळा रंग दिसणार नाही.

जगातला सगळ्यात जुना झेंडा आहे डेन्मार्कचा, पार १२१९ साली डेन्मार्कला त्यांचा झेंडा मिळाला. तेव्हापासून ८०० पेक्षा जास्त वर्ष उलटली, तरी कुठल्याच झेंड्यात जांभळा रंग  का नाही यामागे अनेक कारणं आहेत.

ही कारणं समजून घेण्याआधी झेंड्यांमध्ये असलेलं साम्य पाहायला हवं…

इराक, संयुक्त अरब अमिराती, येमेन, इजिप्त,  कुवैत या अरबी देशांचे झेंडे पाहिले, तर त्यात हिरवा, काळा, लाल आणि पांढरा हे रंग दिसून येतात. कारण दुसऱ्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्या विरोधात अरब एकत्र लढले होते आणि तेव्हा त्यांच्या झेंड्यात हेच ४ रंग होते. जे नंतर स्वतंत्र देशांनी आपापल्या झेंड्यात समाविष्ट करुन घेतले.

युरोपमधल्या अनेक ख्रिश्ननबहुल देशांच्या झेंड्यामध्ये आपल्याला क्रॉस दिसतात, तर मुस्लिम देशांच्या झेंड्यामध्ये चंद्रकोर दिसते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या झेंड्यातही साम्य आढळून येतं.

थोडक्यात देशांच्या झेंड्यामध्ये रंग, डिझाईन सारखी असते, तरीही जांभळा रंग का नाही ?

याचं कारण सापडतं इतिहासात… 

१९ व्या शतकापर्यंत जांभळा रंग हा सहज उपलब्ध होणारा रंग नव्हता. लोक नैसर्गिक रंगांवर अवलंबून होते. त्याआधी अनेकदा जांभळा रंग तयार करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र ते अपयशी ठरले होते. नैसर्गिक जांभळा रंग मिळवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे भूमध्य समुद्रामध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ समुद्री गोगलगायी.

या जांभळ्या रंगाच्या गोगलगायी आजही अत्यंत दुर्मिळ आहेत. १० हजार गोगलगायींमधून फक्त १ ग्रॅम जांभळा रंग मिळू शकतो. आजच्या काळात या एका ग्रॅमची किंमत जवळपास ६० हजार यूएस डॉलर्सच्या घरात जाऊ शकते. 

साहजिकच हा रंग त्यावेळीही प्रचंड महाग होता आणि सामान्यांना सहजासहजी उपलब्धही होत नव्हता.

इंग्लंडची राणी एलिझाबेथनं तर राणी आणि राजघराण्यातले लोक वगळता इतर कुणालाही जांभळा रंग वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळं फक्त रॉयल लोकंच जांभळ्या रंगाचे कपडे वापरु शकत होती.

 इतिहासात आणखी एक किस्सा सापडतो, तो म्हणजे तिसऱ्या शतकात एका रोमन राजानं आपल्या बायकोला एक जांभळ्या रंगाची शाल विकत घेण्यास नकार दिला होता, कारण सांगितलेलं की ही शाल प्रचंड महाग आहे.

आता जिथं रोमन साम्राज्याच्या राजाला जांभळ्या रंगाच्या वस्तू घेणं परवडत नव्हतं, तिथं सामान्य माणसाचा प्रश्नच नव्हता. त्यामुळं फक्त अतिश्रीमंत राजघराणी जांभळा रंग वापरत आली आणि जांभळा रंग श्रीमंतीचंच प्रतीक बनला.

काही देशांमध्ये जांभळा हे श्रीमंतीचं प्रतीक बनलं, तर काही देशांमध्ये जांभळ्या रंगाचा संदर्भ मृत्यूशी लावला जातो. इटली आणि थायलंडमध्ये अंत्ययात्रेवेळी जांभळ्या रंगाचे कपडे वापरण्याची प्रथा आहे. साहजिकच या कारणामुळेही जांभळा रंग बहुतांश देशांच्या झेंड्यामध्ये वापरण्यात आला नाही, ही परंपरा आजही कायम आहे.

आता प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोय, तसा या गोष्टीला पण आहेच..

कॅरेबियन बेटांवर डॉमिनिका नावाचं स्वतंत्र बेट आहे, ज्यांच्या झेंड्यात मधोमध एक पोपट आहे, ज्याची मान जांभळ्या रंगामध्ये आहे.

WhatsApp Image 2022 08 13 at 4.30.07 PM 1
Flag of Dominica

 तर निकारगुआ नावाच्या मध्य अमेरिकेतल्या स्वतंत्र बेटाच्या रंगात इंद्रधनुष्य आहे, ज्याच्यात जांभळ्या रंगाचा समावेश आहे.

WhatsApp Image 2022 08 13 at 4.30.38 PM 1
Flag of Nicaragua

हे झालं झेंड्याचं, पण आपण जांभळा रंग वापरतो त्याचा शोध कसा लागला ?

१८५६ मध्ये एक विषय झाला. इंग्लंडमध्ये एक १८ वर्षांचा केमिस्ट काही प्रयोग करत होता. त्याचं नाव विलियम हेन्री पर्किन. त्याच्याकडून प्रयोगात घोळ झाला आणि जांभळा रंग निर्माण झाला. पर्किन भाऊ हुशार निघाला त्यानं लगेच रंगाचं पेटंट बनवलं आणि लाखोत पैसे छापले. पण त्यानंतरही कुठल्या देशानं आपल्या झेंड्यात जांभळ्या रंगाचा समावेश केला नाही.

म्हणूनच डॉमिनिका आणि निकारागुआ सोडले, तर इतर १९३ देशांच्या झेंड्यात आपल्याला जांभळा रंग दिसत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.