अनेक ठिकाणी डॅमेज झालेले झेंडे मिळालेत.. ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा अपमान केव्हा मानला जातो?

यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होतायेत. जल्लोषाचं कारण असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा स्वातंत्र्य दिवस जंगी साजरा करण्याचं आवाहन अक्ख्या भारताच्या जनतेला केलंय. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या अंतर्गत तयारी सुरु झाली असून देशभरातील नागरिकांना राष्ट्रध्वज वितरणाची सुरुवात झाली आहे.

मात्र ही घाई चुकीची ठरत असल्याचं दिसतंय. सर्वांना झेंडे वेळेत पुरवण्याच्या गडबडीत चुकीचे ध्वज तयार केले जात आहेत आणि वितरित केले जात आहेत. घराघरांवर ध्वज फडकवायचा आहे परंतु तो शासकीय नियमानुसारच असला पाहिजे. मात्र देशभरातून ठिकठिकाणाहून डॅमेज ध्वज मिळाल्याची माहिती मिळतीये.

काही ठिकाणी राष्ट्रध्वज चुकीच्या आकाराचे, फाटलेले, डाग पडलेले, अशोक चक्र मध्यभागी नसलेले, ध्वजांचा रंग एकमेकांमध्ये मिसळलेले, टीप उसवलेले, तीनही बाजूंनी शिलाई आवश्यक असताना ती न मारलेले तसंच तिन्ही रंगांच्या पट्ट्या भिन्न आकाराच्या असलेले आहेत, असं समोर आलं आहे.  

चुकीचे ध्वज म्हणजे राष्ट्रचिन्हाचा अपमान असं समजलं जातं. राष्ट्रध्वज म्हणजे देशाची आन-बाण-शान. तेव्हा त्याचा अपमान केला जाऊ नये हे लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणूनच भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा असावा? याबद्दल ध्वजसंहितेमध्ये नियम देण्यात आले आहेत. 

हे नियम इतके कडक आहेत की नियम मोडले तर शिक्षेची देखील तरतूद आहे. 

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून सुरुवातीला राष्ट्रीय प्रतिकं आणि नावं कायदा १९५० आणि The Prevention of Insults to National Honour Act, 1971 नुसार नियम घालून देण्यात आले होते. नंतर २६ जानेवारी २००२ मध्ये ध्वजसंहिता अस्तित्वात आली, यामध्ये सर्व नियमावली देण्यात आली.

ध्वज संहितेच्या भाग II मधील कलम २ मध्ये असं नमूद केलं आहे की, खराब झालेला, विकृत झालेला अन्यथा रंग नसलेला ध्वज फडकवू नये.

ध्वजाचा अपमान केव्हा समजला जाईल?

  • ध्वज निर्माण करताना तो ठरवून दिलेल्या कापडाने तसंच ठरवून दिलेल्या आकारात तयार न करणं
  • ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला असणं
  • तिरंगा कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला सलाम करण्यासाठी फडकवणं
  • तो योग्य ठिकाणी न फडकवणं. विशिष्ट प्रसंग वगळता अर्ध्या उंचीवर तो फडकवणं
  • राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकवणं
  • एकाच वेळी दोन ध्वज एकाच काठीवर फडकावणं 
  •  सशस्त्र दले, इतर निमलष्करी किंवा कोणत्याही सरकारी अंत्यविधी वगळता त्याचा ड्रेपरी म्हणून वापर करणं 
  • ध्वजावर कोणत्याही प्रकारच्या आकृती काढणं
  • त्याचा वापर पुतळा, स्मारक किंवा व्यासपीठ झाकण्यासाठी करणं
  •  उशी, रुमाल, नॅपकिन किंवा कोणत्याही ड्रेस मटेरियलवर त्याची प्रिंट वापरणं 
  • कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर ध्वजाचा वापर करणं. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळणं
  • ध्वज जमिनीला टेकू देणं, पाण्यात वाहून देणं किंवा उलट्या पद्धतीने फडकावणं (केशरी रंग खाली असणं)
  • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या महत्त्वाच्या व्यक्तींच्याच व्यतिरिक्त अन्य कोणीही आपल्या गाडीवर ध्वज लावणं 
  • राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत नसणं 
  • १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर फुलं ठेवणं

अशा सगळ्या गोष्टींचा अपमानाच्या प्रकारांत समावेश करण्यात आला आहे. 

भारतीय राष्ट्रध्वज आयताकार असावा आणि त्याच्या उंचीचं व लांबीचं प्रमाण २:३ असं ठरवून देण्यात आलं आहे. तिन्ही रंग क्रमाने असावे, तिन्ही पट्या समान आकाराच्या असाव्या. अशोकचक्र मध्यभागी असावं आणि त्यातील रेषा २४ च असाव्या.  तर त्याला तयार करण्यासाठी लोकर, कापूस, रेशीम, खादी आणि आता पॉलिस्टर अशा कापडांना परवानगी आहे. 

शिवाय ३० डिसेंबर २०२१ च्या सुधारणेनुसार मशीन मेड झेंड्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. 

नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला लागतो. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला लागतो.

आधी सूर्योदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणं कायद्याने बंधनकारक होतं. मात्र २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे नियम पळाले नाही तर काय होईल?

ध्वजसंहितेतील कायद्याच्या कलम २ मध्ये म्हटलंय की, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जो कोणी व्यक्ती ध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करताना दिसेल त्याला ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील.

अशात आता ठिकठिकाणी निकृष्ट ध्वज मिळाले आहेत. घाई गडबडीत तयार केलेले नियमबाह्य ध्वज पुरवले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाला बारकाईने ध्वजांची तपासणी करावी लागत आहे.

मात्र ध्वजाच्या निर्मितीतच चूक झाल्यामुळे ध्वजाचा अपमान मानला जात आहे. त्यात आता नवीन आव्हान आहे ते म्हणजे… हे झेंडे अपमान न होता कसे नष्ट करावे? शिवाय सामान्य नागरिकांकडे असलेले झेंडे देखील जर डॅमेज झाले असतील तर त्यांनी काय करावं? 

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कुठेही फेकणे हा खरं तर गुन्हा आहे. 

तेव्हा ध्वजसंहितेत सन्मानपूर्वक ध्वज नष्ट करण्याचे, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे नियम देखील आहेत. त्यानुसार राष्ट्रध्वज खराब झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे दोन मार्ग सांगितले गेले आहेत. 

पहिला मार्ग म्हणजे ध्वजाला दफन करणं. 

ध्वज दफन करण्यासाठी खराब असलेले ध्वज लाकडी पेटीत गोळा केले जातात, त्यानंतर ते योग्य प्रकारे दुमडले जातात आणि बॉक्समध्येच ठेवले जातात. त्यानंतर तिच पेटी जमिनीमध्ये पुरली जाते. ध्वज जमिनीत पुरल्यानंतर काही काळ मौन पाळावं लागतं आणि ही प्रक्रिया करताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पूर्णपणे शांतात पाळणं गरजेचं असतं.

दुसरा मार्ग म्हणजे ध्वज योग्य प्रकारे जाळणं. 

ध्वज जाळण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित जागा निवडावी लागते. त्यासाठी ध्वजाची व्यवस्थित घडी करावी लागते. त्यानंतर ज्या ठिकाणी ध्वजाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागते त्या ठिकाणी आगीच्या मध्यभागी दुमडलेला ध्वज ठेवावा लागतो.

देशाचा ध्वज थेट जाळणं म्हणेज तो कायदेशीर गुन्हा आहे. 

हर घर तिरंगा अंतर्गत राष्ट्रध्वजाचा अपमान न करता सर्वांना झेंडा फडकावणं गरजेचं आहे. तेव्हा हे नियम सांगितले आहेत. मात्र फडकावल्यानंतर जेव्हा केव्हा ध्वज उतरवाल त्याचेही नियम आहेत. 

देशाचा राष्ट्रध्वज गतीने फडकवला जातो पण तो उतरवताना तो हळूहळू खाली उतरावावा लागतो, हेही प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाय ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो सुरक्षित ठिकाणी ठेवणं अवश्यक आहे.

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या या मोहिमेच्या वेळी देशाचं राष्ट्रीय चिन्ह, मान आपण हाताळणार आहोत तेव्हा त्याचा सन्मान राखणं क्रमप्राप्त आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.