अख्ख्या आयपीएलचं गणित बदलायला झहीर खानचा एक बॉल कारणीभूत आहे

टी२० क्रिकेट आणि विशेषतः आयपीएल आल्यापासून क्रिकेटचं पारडं बॅट्समनच्या बाजूने झुकलेलं आहे. कारण क्रिकेट झालंय फास्ट. आता कमी वेळात लोकांना जास्तीत जास्त एंटरटेनमेंट पाहिजे असते.

मग एंटरटेनमेंट म्हणजे काय? तर बॅट्समननी मारलेले फोर आणि सिक्स.

त्यामुळं क्रिकेटचे नियम बॅट्समन लोकांना फेव्हर करणारे बनवले गेले. ग्राउंडचे आकार कमी झाले.

साहजिकच जगातल्या बाप बाप बॉलर्सचं धुलाई मशीन झालं.

आयपीएलच्या जत्रेत तर ख्रिस गेल, एबी डिव्हीलीयर्सनं सुरू केलेली परंपरा रिषभ पंत, राहुल तेवातिया सारखे बॅट्समन छोट्या ग्राउंडवर बॉलर लोकांची बेक्कार धुलाई करत सुरू ठेवतात.

पण बॅलन्स हा सृष्टीचा नियम आहे. जेव्हा जेव्हा एक बाजू कमकुवत होते तेव्हा कोणीतरी तारणहार येतो आणि दुसरी बाजू सांभाळून धरतो.

आयपीएलमध्ये बॉलर्ससाठी तारणहार ठरला, झहीर खानचा नकल बॉल.

नकल बॉल म्हणजे नकली बॉल नाही किंवा हिंदीत म्हणतात तसं कोणाची नकल केलेला बॉल नाही तर तो म्हणजेच इंग्रजी knuckle मध्ये पकडलेला बॉल आहे.

जेव्हा मॅच रंगात आलेली असते, बॅट्समन आक्रमक झालेले असतात तेव्हा या बॉलचा प्रयोग करतात. बॉलरचा हात वेगात फिरतो पण बॉल पडल्यावर अचानक स्लो होतो. बॅट्समन कन्फ्युज होऊन आउट.

हा खरंतर क्रिकेटमधला नाही, तर बेसबॉलमधला प्रकार आहे.

तिथं बॉल पिच करताना ही सिस्टीम वापरतात. असं म्हणतात की, डेनिस लिलीनं एकेकाळी हा प्रकार नेट्समध्ये ट्राय करून पाहिला होता पण त्याला तो इफेक्टिव्ह वाटला नाय.

अनेक बॉलर्स स्लोवरवन टाकायचे पण दक्षिण आफ्रिकेचा एक बॉलर स्लो बॉल टाकताना एक वेगळाच प्रकार करायचा. झहीर खानने ते पाहिलं होतं.

यातूनच जन्म झाला नकल बॉलचा!

२०११ च्या वर्ल्डकप ची तयारी सुरू होती. भारताचा बॉलिंग कॅप्टन समजला जाणारा झहीर खान आपल्या नव्या अस्त्राला म्हणजेच नकल बॉलला धार लावत होता.

झहीरनं तेव्हाचे कोच गॅरी कर्स्टन यांना सोबत घेऊन अनेक महिने प्रॅक्टिस केली आणि थेट २०११ च्या वर्ल्डकप मध्ये हे पहिल्यांदा हे अस्त्र वापरलं.

नुसतं वापरलं नाय, तर इयान बेल, पॉल कॉलिंगवूड, डेव्ह स्मिथ आणि क्वार्टर फायनलमध्ये माईक हसी यांना या बॉलनं आउट काढलं.

झहीरनं या वर्ल्डकप मध्ये सर्वात जास्त म्हणजे २१ विकेट काढल्या.

भारतानं वर्ल्डकप जिंकण्यात युवराज सिंग, सचिनच्या बॅटिंग बरोबर सगळ्यात मोठा वाटा झहीरच्या नकल बॉलचा होता.

झहीरची ही स्कीम धुलाई मशिन झालेला प्रत्येक फास्ट बॉलर टी२० मध्ये वापरू लागला. हमखास विकेट घेणारा बॉल म्हणून नकल बॉल ओळखला जाऊ लागला.

धडकी भरवणारा यॉर्कर टाकणारा, दोन्ही बाजूनं बॉल स्विंग करणारा झहीर खान आपल्या स्लो बॉलनं बॅट्समनच्या बत्त्या ढीम केल्या होत्या.

या एका बॉलनं झटकन बॉलर बॅट्समनची लढाई समान लेव्हलला आणून ठेवली.

आयपीएलमध्ये बॅट्समन बॉलरच्या चिंधड्या उडवत होते ते काही प्रमाणात कमी झालं. भुवनेश्वर कुमार तर अगदी पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा नकल बॉल टाकतो आणि विकेटही काढतो. डेथ ओव्हर्समध्ये तर हा बॉल एकमेव आधार असतो.

प्रत्येक खेळात काही खेळाडू असतात जे आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी खेळाचा इतिहास बदलून टाकतात.

क्रिकेटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी लावलेला रिव्हर्स स्विंगचा शोध, सकलेन मुश्ताकचा दुसरा, डिव्हीलीयर्सचा 360 डिग्री शॉट, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट या प्रमाणंच झहीर खानच्या नकल बॉलनं आयपीएलचा इतिहास बदलला आणि कित्येक बॉलर्सना धुलाई मशीन होण्यापासून वाचवलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.