अत्रे होते म्हणूनच जॉर्ज सारखा नवखा माणूस स.का. पाटलांना हरवू शकला

गोष्ट १९६७ सालची. देशातल्या चौथ्या लोकसभा निवडणुकीची. मुंबईत ज्यांना हरवणं शक्य नाही अशी ओळख असणारे स.का. पाटील. सलग तीन वेळा निवडुन आले होते. त्यांना निवडणुकीत हरवणं हे कोणालाही अशक्य वाटत होतं. आणि याच निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध जाॅर्ज फर्नांडीस हा उमेदवार उभा होता.

जाॅर्जने अत्यंत हुशारीने स.का.पाटील यांच्याविरोधात प्रचारसभा, निवडणुक रॅली आयोजीत केली होती.

या निवडणुकीत जाॅर्ज फर्नांडीसच्या पाठीशी होता स्वतःच्या शब्दांनी लोकांची मनं जिंकणारा एक व्यक्ती अर्थात आचार्य अत्रे.

आचार्य अत्रे यांचं ‘मराठा’ वृत्तपत्र खुप लोकप्रिय होतं. ‘श्यामची आई’ सिनेमामुळे अत्रेंची सिनेदिग्दर्शक म्हणुन वेगळी ओळख जनमानसात निर्माण झाली होती. अत्रेंच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक उत्तम वक्ते होते. कुठे, कधी, काय बोलायचं आणि शब्दकोटी करुन सभेला आलेल्या लोकांची मनं कशी जिंकायची याची अत्रेंना पक्की जाण होती.

१९६७ च्या निवडणुकीत आचार्य अत्रे सुद्धा उमेदवार म्हणुन उभे होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला स.का.पाटील यांचा ठाम विरोध होता. तसेच ‘मुंबई महाराष्ट्राला मिळु देणार नाही’, अशी वादग्रस्त भुमिका त्यांनी घेतली. स.का. पाटील जरी ‘मुंबईचे अनभिषिक्त राजा’ म्हणुन ओळखले जात असले तरी जनतेने स.का.पाटलांच्या या भुमिकेचा कडाडुन विरोध केला. त्यामुळे स.का.पाटलांविरोधात जनतेच्या मनात नाराजी निर्माण झाली होती.

याच निवडणुकीदरम्यान अत्रे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेत होते. जाॅर्ज फर्नांडीसला अत्रेंचा पूर्ण पाठिंबा होता. अत्रे सभेत जाॅर्जला पाठींबा देताना स.का.पाटलांवर त्यांच्या खास शैलीत टिका करायचे. एकदा अत्रे सभेत म्हणाले,

‘मी १३ ऑगस्टला जन्मलो. १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींमध्ये एक वाईट गोष्ट घडली म्हणजे १४ ऑगस्टला स.का.पाटील यांचा जन्म झाला.

अत्रेंनी खास शालजोडीतलं हे वाक्य उच्चारताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

आणखी एका भाषणात अत्रे म्हणाले,

‘स.का.पाटील हा लोकसभेत जायला निघालाय. मी याला शोकसभेत पाठवतो.’

शब्दकोटी करुन एखाद्यावर टिका करण्याचं उत्तम कौशल्य अत्रेंजवळ होतं. जाॅर्ज फर्नांडीस सुद्धा त्यांच्या पद्धतीने हुशारीने १९६७ च्या निवडणुकीसाठी लोकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करत होते. अत्रेंसारखा कुशल वक्ता त्यांच्या पाठीशी होता.

१९६७ चा निकाल जाहीर झाला. कोणालाच कल्पना नव्हती असा निकाल लागला. तीस हजार मतांनी स.का.पाटलांचा पराभव झाला आणि जाॅर्ज फर्नांडीस निवडुन आले. अत्रेंना खबर मिळाली की ते सुद्धा निवडणुकीत जिंकले आहेत. अत्रेंच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अत्रेंची पत्नी त्यांना औक्षण करत होती.

अचानक अत्रेंना खबर मिळाली की त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

हि बातमी कळताच औक्षण करता करता अत्रेंची पत्नी थांबली. अत्रे लगेच पत्नीला म्हणाले,

‘अगं थांबलीस का? ओवाळ ओवाळ. स.का.पाटलांना मीच पाडलंय. जाॅर्जने थोडीच पाडलंय.’

अत्रेंच्या बोलण्याने पुन्हा सगळे खुश झाले. अत्रे स्वतः निवडणुकीत हरले असले तरीही जाॅर्ज जिंकल्याचा आनंद त्यांनी साजरा केला.

पुढच्या दिवशी अनेक वृत्तपत्रांनी या निवडणुकीचं नाट्यमय वर्णन केलं. अत्रे स्वतः ‘मराठा’ वृत्तपत्राचे संपादक. त्यांनी लिहिलेले अग्रलेख हा प्रत्येकाच्या चर्चेचा विषय. त्यामुळे अत्रे या निवडणुकीवर काय लिहितात याकडे सगळ्यांचं लक्ष.

जाॅर्ज फर्नांडीस च्या विजयावर आणि स्वतःच्या पराभवावर अत्रेंनी अग्रलेख लिहिला.

लेखाचं शीर्षक होतं ‘आम्ही जिंकलो.. आम्ही हरलो..’

इतकी मोठी निवडणुक स्वतः हरलेला असतानाही दुस-याच्या आनंदात समाधान शोधणारा अत्रेंसारखा माणूस, विशेषतः राजकारणी व्यक्ती आता सापडणं हि दुर्मिळ गोष्ट आहे.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.