ज्या कॉलेजने ऍडमिशन दिलं नव्हतं, आज तिथेच त्यांचं स्मारक उभारण्यात आलंय.

कॉमन मॅन ! या दोन शब्दांमध्ये एका माणसाचं संपूर्ण आयुष्य सामावलं आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असावं. हा माणूस म्हणजे आर. के. लक्ष्मण. काही व्यक्तींच्या नावापुढे जी उपाधी लागते तीच त्यांची ओळख बनते. अशावेळी वेगळं नाव सांगायची गरज उरत नाही. लोकमान्य उच्चारल्यावर जसे बाळ गंगाधर टिळक आठवतात. किंवा शिवसेनाप्रमुख म्हटल्यावर क्षणार्धात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.

अगदी तसंच, कॉमन मॅन नाव घेताक्षणी आर. के. लक्ष्मण आठवतात. आर.के.लक्ष्मण यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यातील विसंगती शोधून ती रेखाचित्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली.

याच आर. के. लक्ष्मण यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अशीच एक मोठी विसंगती घडली. 

व्यंगचित्रकारांची एक उत्तम फळी महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवली आहे. यापैकी बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण या दोघांची जोडी तर प्रचंड गाजली. फ्री प्रेस जर्नल मध्ये दोघे एकमेकांचे सहकारी होते. त्यामुळे शिवसेना स्थापनेच्या आधीपासून या दोघांची घट्ट मैत्री होती. आर. के. यांनी अजरामर केलेला कॉमन मॅन ही त्यांची ओळख बनली. हा आर. के. लक्ष्मण यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील किस्सा.

२३ ऑक्टोबर १९२४ साली मैसूर येथे आर. के. लक्ष्मण यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण. वडील शाळेत मुख्याध्यापक. मोठा भाऊ आर. के. नारायण एक उत्तम लेखक. त्यांची ‘मालगुडी डेज’ ही कादंबरी लोकप्रिय आहे.

वडील आणि मोठा भाऊ दोघेही प्रतिभावंत असल्याने आर.के.लक्ष्मण यांच्या आयुष्यावर सुद्धा त्यांचा प्रभाव पडला.

वडील मुख्याध्यापक असल्याने त्यांच्या घरी देशी – विदेशी भाषेमधील नियतकालिके येत. आर.के. खूप वेळ त्या मासिकांमधील चित्र पाहण्यात गुंग होऊन जात. आपण सुद्धा अशीच चित्र काढून पाहावी, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.

आर.के. यांना इतके मित्र नव्हते. किंबहुना ते माणसांमध्ये इतके रमायचे नाहीत. पण तरीही प्रत्येक माणसाचं निरीक्षण करण्याचा त्यांचा स्वभाव होता.

कधीही कुठेही कोणत्याही हॉटेलमध्ये जेवायला गेले, तर तिथे सुद्धा त्यांचे डोळे आणि विचार सुरूच राहत असत. आजूबाजूंच्या लोकांची पर्वा न करता ते हॉटेलमधल्या वेटरशी गप्पा मारत. त्याची थट्टामस्करी करत. नानाविध तऱ्हेच्या माणसांशी बोलल्यामुळे त्यांच्या मनात विविध प्रकारच्या माणसांच्या प्रतिमा, त्यांचे स्वभाव असं चित्र तयार होत असे. मनात उमटलेल्या प्रतिमा आर.के. व्यंगचित्रातून उतरवत असत.

प्रत्येक कला ही माणसाला अभिव्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. व्यंगचित्र ही सुद्धा अशीच एक कला. आर. के. लक्ष्मण यांनी या कलेचा वापर करून राजकीय आणि सामजिक परिस्थितीवर ताशेरे ओढले.

सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या मांडण्यासाठी त्यांनी कॉमन मॅन जन्माला घातला. कधी हातात छत्री, अंगावर घातलेलं शर्ट वजा कोट, पायामध्ये धोतर, डोळ्यांवर चष्मा, केसाला टक्कल असं कॉमन मॅन चं अस्सल रूप त्यांनी चितारलं. जवळपास ५० वर्ष टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात त्यांचा कॉमन मॅन सभोवतालच्या परिस्थितीवर तिरकस अंगाने भाष्य करत होता.

जगण्यातला विरोधाभास व्यंगचित्रातून दाखवणाऱ्या आर. के.लक्ष्मण यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेली एक विसंगती. झालं असं.. चित्रकला किंवा एकूणच रेषांचा अभ्यास करण्यासाठी आर के लक्ष्मण यांना मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घ्यायची इच्छा होती. ते प्रवेश घेण्यासाठी गेले.

“तुमची चित्रकला आमच्या अपेक्षांना खरी उतरली नाही.”

असं म्हणून निवड करणाऱ्या माणसांनी आर. के. लक्ष्मण यांना प्रवेश दिला नाही. त्यांचं अॅ डमिशन नाकारण्यात आलं. यामुळे आर के लक्ष्मण निश्चित निराश झाले.

अमिताभ बच्चन एका मुलाखतीत म्हणाले होते,

“जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकत नाही. आणि ती गोष्ट न शिकता जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा चुकांची जाणीव आपल्याला होते. त्या गोष्टीचं शास्त्रशुद्ध ज्ञान घेतलं की कदाचित एक साचेबद्धपणा येऊ शकतो. पण ज्ञान न घेता ती गोष्ट करायला लागलो की त्यात एक उत्स्फूर्तपणा असतो.

बच्चन साहेबांचं म्हणणं मध्येच सांगायचं कारण असं, आर के लक्ष्मण यांची रेषाकला ही अनुभवातून आली आहे.

मैसुरच्या बाजारपेठेत, स्टेशनवर ते जात असत. तिथे गेल्यावर तऱ्हेतऱ्हेच्या माणसांना ते पाहून त्यांची चित्र काढायचे. त्यामुळे या कलेचं ज्ञान न घेतल्याने आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमध्ये एक उत्स्फूर्तता दडलेली आहे. पुढे आर. के. लक्ष्मण यांनी फिलॉसॉफी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातून पदवी घेतली.

आर.के. लक्ष्मण हळूहळू लोकप्रिय व्यंगचित्रकार झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजने चित्रकला बरोबर नाही असं सांगून त्यांना प्रवेश दिला नव्हता, त्याच कॉलेजने आर.के. यांना रेषांवर व्याख्यान देण्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते.

यावेळेस त्यांच्यासमोर अनेक चित्रकार बसले होते. ज्या कॉलेजने प्रवेश दिला नव्हता त्याच कॉलेज सोबत पुढे असं नातं जोडलं जाईल, हे आर. के. यांच्या ध्यानीमनी पण नसावं. स्वतःच्या आयुष्यात घडलेली ही मोठी विसंगती ते मानतात.

JJ School

२६ जानेवारी २०१५ रोजी त्यांचं निधन झालं. यानंतर महाराष्ट्र सरकारने जे जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या आवारात आर. के. यांचं स्मृतिस्थळ उभारण्याची घोषणा केली होती.

आजही पुण्याच्या सिंबॉयसिस कॉलेजच्या आवारात किंवा मुंबईच्या वरळी सी फेस वर आर.के. लक्ष्मण यांनी जन्म दिलेला कॉमन मॅन चा पुतळा लक्ष वेधून घेतो. आसपासच्या परिस्थितीचं निरीक्षण करत तो निवांत बसलेला दिसतो. सध्या आजूबाजूला इतकं घडतंय की, त्याला पुन्हा एकदा अभिव्यक्त होण्याची इच्छा निश्चित होत असावी…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.