वडिलांचा त्रास, पण आईची खंबीर साथ… आज अमृता जोशी २२ परदेशी भाषांची अभ्यासक
मुंबई-पुणे-मुंबई बस स्टँड. एक फाॅरेनर तिथे उभी. थोडी गांगरलेली. तिला काहीतरी हवं होतं. एक मराठी मुलगी तिच्यापाशी जाते.
‘हाऊ कॅन आय हेल्प यु ?’ तिला विचारते.
फाॅरेनर अजुनही गोंधळलेलीच. हिची काहीतरी अडचण आहे हे मराठी मुलीला कळतं. ‘विच लँग्वेज डु यु स्पीक?’ असं तिने विचारताच फाॅरेनर ‘हिला काय येतंय?’ अशा आविर्भावात ‘स्पॅनिश, पोलीश’ असं उत्तर देते.
मराठी मुलीला स्पॅनिश येत असतं. ती स्पॅनिश भाषेत संवाद साधुन फाॅरेनर मुलीची अडचण दूर करते. फाॅरेनर मुलगी एकदम आश्चचर्यकीत. दोघी पुण्याचा प्रवास एकत्र करतात. यानंतर फाॅरेनर तिला पोलीश भाषा शिकवते. मराठी मुलगी तिला मराठी शिकवते. दोघांमधली संवादाची भाषा असते ती स्पॅनिश.
हि मराठी मुलगी अमृता जोशी. आज अमृता जगभरातील २२ परदेशी भाषा बोलणारी आणि जगात मराठी, हिंदी अशा भारतीय भाषांचा प्रसार करणारी स्त्री म्हणुन ओळखली जाते.
अमृताची आई ज्योती पाठारे या दूरदर्शनवरील निवेदिका. अमृताच्या आईने प्रेमविवाह केला. परंतु लग्नानंतर गोष्टी बदलल्या. नव-याचा प्रचंड जाच, मारहाण आईला सहन करावी लागायची. पण अमृताच्या आईने अमृताला याची कधीही झळ बसु दिली नाही. ती अमृताजवळ नेहमी खुश असायची.
अमृताच्या वडिलांचे शाळेत पैशांच्या कारणांवरुन काही वाद झाले. यामुळे पाच वर्षांच्या असणा-या अमृताला शाळेच्या गॅदरींगमध्ये होणा-या डान्स ग्रुप मधुन काढुन टाकण्यात आलं. अमृताचं वय लहान. त्यामुळे असं का झालं? हा प्रश्न तिच्या निरागस मनात आला.
यावेळी सुद्धा आईने अमृताच्या मनावर याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणुन तिला जादुचे आणि कठपुतळ्यांचे प्रयोग दाखवले.
यानंतर आईने अमृतासाठी जादुचं काही सामान आणलं. याचा परिणाम असा झाला की, वयाच्या पाचव्या वर्षी आईच्या भक्कम पाठींब्यामुळे अमृताने संपुर्ण भारतभर जादुचे प्रयोग केले. यामुळे पाचव्या वर्षी भारतातला सर्वात लहान जादुगार होण्याचा सन्मान तिला मिळाला.
दुसरी मराठी जागतिक परिषद माॅरीशसला होणार होती.
त्यावेळेस विनय आपटे, मोहन जोशी तिथे होणा-या एका नाटकासाठी बाल शिवाजी आणि संभाजींची भुमिका करणा-या बालकलाकाराचा शोधात होते. त्यांना जेव्हा कळालं अमृता माॅरीशसला येतेय तेव्हा अमृताचं नाव नाटकासाठी पक्क झालं. अमृताच्या आईने भारत-माॅरिशस विमानप्रवासात अमृताकडुन नाटकाची संहिता पाठ करवुन घेतली.
यानंतर अमृताने काही नाटकांमध्ये बाल संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या भुमिकेत अभिनय केला.
अमृताच्या घरी वडिलांचा त्रास सुरुच होता. यामुळे अमृताच्या आईने तिला दिवसभर वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवले. अमृता स्विमींग, जिम्नॅस्टिक, बास्केटबाॅल, मल्लखांब असे अनेक खेळ खेळुन रात्री गृहपाठ करायची. अमृताच्या वडिलांच्या स्वभावाची समाजामध्ये खुप चर्चा व्हायची. त्यामुळे त्या वयात अमृताशी तिच्या वयातले मुलं-मुली मैत्री करत नसत. एकदा अमृता आईला म्हणाली,
” आई, मला जगभरातले बरेच मित्र-मैत्रीणी हवे आहेत. जे माझ्याशी बोलतील.”
तिथेच तिने आईसमोर परदेशी भाषा शिकण्याचा निर्धार केला.
अमृताच्या या उद्देशाला तिच्या आईच्या वडिलांनी पाठबळ दिलं. अमृताचे आजोबा फ्रेंच, जर्मन भाषेचे अभ्यासक. ते लहानग्या अमृताला जर्मन भाषेशी संबंधित अशा ‘मॅक्स म्युलर भवन’ला घेऊन गेले. तिथे अमृताला जर्मन भाषा शिकण्याची आवड निर्माण झाली.
आजोबांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आठवीला असताना परदेशी भाषा शिकण्याची अमृताने सुरुवात केली.
अमृता हळुहळु मोठी होत होती. आईला वडिलांपासुन होणारा त्रास तिला कळत होता. वडिल आता अमृतालाही खोचक बोलायचे. ‘तु कुरुप आहेस, तुझ्यात आत्मविश्वास नाही.’ असे टोमणे तिला वडिलांकडुन मिळायचे.
यानंतर वडिलांना आणि विशेषतः स्वतःला सिद्ध करण्यासाठी अमृताने स्वतःचं फोटोशूट करुन मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत अमृताने मजल मारली. यानंतर अमृताला अनेक सिनेमांच्या, जाहिरातींच्या ऑफर्स आल्या. परंतु अमृताचं लक्ष्य भाषा शिकण्याचं होतं. त्यामुळे तिने येणा-या ऑफर्स नाकारुन परदेषी भाषा शिकण्याकडे स्वतःचं लक्ष केंद्रित केलं.
२००३ साली अमृताच्या वडिलांचं निधन झालं. अमृता आणि विशेषतः तिच्या आईने वडिलांकडुन होणारा त्रास खुप सहन केला होता. परंतु कधीही इतरांकडे त्याचं गा-हाणं गायलं नाही. अमृताने परदेषी भाषा शिकण्याचं तिचं काम सुरुच ठेवलं. जगभरात बड्या अधिका-यांना परदेशी भाषा आणि संस्कृतींची ओळख करुन दिली, तसेच अनुवादक, दुभाषक आणि टूरिस्ट गाईड म्हणुनही अमृताने काम केलं.
आज अमृता जवळपास २२ परदेषी भाषांची जाणकार आहे.
आज ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी तिच्याकडुन परदेशी भाषा शिकतात. ‘अमृतालँग्स’ या नावाने ती आज पुस्तकं सुद्धा लिहिते.
भारतीय शिक्षण पद्धतीची ढासळलेली व्यवस्था बघता अमृता तिच्या मुलांना आज घरीच शिक्षण देते. अभ्यासाबरोबर खेळ आणि इतर उपक्रमांचा भर तिच्या मुलांच्या शिक्षणात असतो. अमृताच्या या संपुर्ण प्रवासात तिच्या आईची तिला मोलाची साथ लाभली. पुण्यातल्या एका फाॅरेनरची अडचण तिच्या भाषेत दूर करणारी अमृता आज जगभरात परदेशी भाषा शिकणा-या अनेक व्यक्तींसाठी एक दुवा म्हणुन काम करत आहे.
- देवेंद्र जाधव
हे ही वाच भिडू.
- शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या प्रेमात पडलेला बेल्जीयन अवलिया !!
- मुंबईचा आयुक्त असणाऱ्या या इंग्रज अधिकाऱ्याने मराठी पोवाड्यांना जगभरात पोहचवलं .
- सातारची प्रियांका ठरली मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला.
- सातासमुद्रापार आलेल्या या इंग्रजांने जिद्दीने मराठी भाषेतील पहिलं पुस्तक छापून दाखवलं.