५ दिवस ८४ मृत्यू.. दरड कोसळल्यापासून तळीये गावात काय काय घडलं ?

तळीये गावात सध्या बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,

या दुर्घटनेत आत्तापर्यंत ५२ मृतदेह सापडले आहेत तर अद्याप ३२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. मात्र सध्या इथलं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. सोबतच या ३२ बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे तळीये दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा ८४ वर गेला आहे.

मृत आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांसह गावचे सरपंच आणि स्थानिक आमदारांनी हे बचाव कार्य थांबवण्याची मागणी केली होती. मृतदेह काढताना ४ ते ६ फूट खोदल्यानंतर मृतदेह सापडत आहेत, त्यावेळी त्यांची विटंबना होत आहे. त्यामुळे ही शोध मोहिम थांबवून बेपत्ता आहेत त्यांना मृत घोषीत करण्यात यावं आणि त्याच ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे अवघ्या ६०० लोकसंख्या असलेल्या गावात ५ दिवसात तब्बल ८४ जण मृत झाले आहेत…

डोंगर कपारीत वसलेल्या तळीये गावावर पाच दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी साधारण ४ च्या दरम्यान दरड कोसळली. अवघ्या १७३ कुटुंबांचं आणि ६७३ लोकसंख्येच्या या गावात दरड कोसळल्यानं दरडीखाली तब्बल ३५ घर दबली गेली. त्यात जवळपास ८४ जण लोक या ढिगाऱ्याखाली अडकले गेले.

त्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला या घटनेची माहिती दिली, पण महाड आणि या भागात प्रचंड पाऊस आणि महापूर यामुळे गावाकडे येणारे रस्ते पॅक झाले होते. त्यामुळे मदतकार्य मिळण्यास बराच वेळ लागत होता. मात्र गावकरी याची वाट बघत थांबले नाहीत. त्यांनी स्वतःचं हे ढिगारे उपसायला सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत स्थानिकांनी तब्बल ३१ मृतदेह बाहेर काढले. 

तोपर्यंत शासकीय पातळीवरून नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री या गावात दाखल होऊ लागले. 

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यंत्रणा पोहचण्याच्या आधी या गावात दाखल झाले होते. या घटनेची माहिती मिळताच महाडच्या दौऱ्यावर असलेले दरेकर तळीयेमध्ये दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ गाठत गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. मात्र त्यावेळी तिथं शासन किंवा प्रशासन यांच्याकडून कोणतेही मदत कार्य पोहोचले नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला.

पाणी ओसरल्यानंतर प्रशासन इथं पोहोचायला सुरुवात झाली.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, 

ही घटना घडल्यानंतर आम्ही एनडीआरएफच, नेव्ही आणि एअरफोर्सच्या संपर्कात होतो. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकत नव्हतं आणि पुरामुळे रोड ब्लॉक होते. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांना मदत करू शकलो नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी रस्ते उघडल्यानंतर एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं.

त्यानंतर शुक्रवारी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन इथला बचावकार्याचा आढावा घेतला. 

https://www.facebook.com/iadititatkare/posts/2284307468366332

त्यानंतर २४ जुलैच्या मध्यरात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन इथल्या बचावकार्याचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील तळीये गावाला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला, सोबतच मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. 

https://www.facebook.com/dioraigad06/videos/878553179678211/

 

शासनाकडून काय काय मदतीची घोषणा करण्यात आली आहे?

तळीये गावाप्रमाणेच महाडमधील पोलादपूर आणि साताऱ्यातील आंबेघर या भागात देखील दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली आहे. या घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यात मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सोबतच राज्य सरकारकडून देखील दरड कोसळून मृत्यमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

https://www.facebook.com/dioraigad06/posts/3103237539904372

 

तर संपूर्ण तळीये गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे.  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली होती.

 

तर तळीये गावातील घर पंतप्रधान आवास योजनेतून बांधली जातील अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यांनी देखील रविवारी २५ जुलै रोजी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तळीये गावाला भेट देऊन इथल्या मदत कार्याचा आढावा घेतला.

दरड कोसळणाऱ्या गावांच्या यादीत तळीये गाव नसल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा… 

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दरड कोसळणाऱ्या गावांच्या यादीत तळीये गाव नसल्याचा दावा केला होता. त्या म्हणाल्या होत्या,

पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याला सहा दिवसांपासून रेड अॅलर्ट देण्यात आला होता. सोबतच आम्ही जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांची यादी तयार केली होती. ज्या ९ गावांना दरड कोसळण्याचा प्रचंड धोका आहे, त्या गावांच्या यादीत तळीयेचा समावेश नव्हता. तसचं दरड कोसळण्याची शक्यता, सौम्य शक्यता असणाऱ्या गावांच्या यादीतही तळीयेचा समावेश नव्हता. तरीही ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना अत्यंत अनाकलनीय आणि अनपेक्षित अशीच होती.

मात्र सध्या याच अनाकलनीय घटनेनेच ८४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अवघ्या ५ दिवसांमध्ये तळीये गावाच स्मशानात रूपांतर झालं आहे. इथले सरपंच संपत तानलेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना जेसीबीच्या माध्यमातून एकत्रित खड्ड्यात पुरण्यात आलं. मुसळधार पावसामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी सामानाची व्यवस्था करणं देखील आम्हाला जमलं नाही…..

 

Leave A Reply

Your email address will not be published.